ब्रिटीश ब्युटी अॅमी जॅक्सन ही ब्रिटनच्या अब्जाधीश व्यावसायिकाला डेट करत असल्याची चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये ऐकायला मिळत आहे. यापूर्वी प्रतीक बब्बरशी अॅमीचं नाव जोडलं गेलं होतं, परंतु आता अॅमी ही ब्रिटीश अब्जाधीश जॉर्ज पानायिटूसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जात आहे. अॅमीनं आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्येही अनेकदा जॉर्जचे फोटो अपलोड केले आहेत. व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छाही अॅमीनं जॉर्जला दिल्या होत्या.

त्यामुळे अॅमी डेट करत असलेला जॉर्ज नक्की आहे तरी कोण याचं कुतूहल अनेकांना आहे. जॉर्ज ब्रिटीश प्रॉपर्टी डेव्हलपर अँड्रस पानायिटूचा मुलगा आहे. त्याचबरोबर हिल्टॉन, डबल ट्री, पार्क प्लाझा यासारखी अनेक आलिशान हॉटेल्स जॉर्जच्या मालकीची आहेत. जॉर्जला एक भाऊ आणि तीन सावत्र बहिणी आहेत. अॅबिलीटी ग्रुपचा तो संस्थापक असून वयाच्या १६ वर्षी तो या ग्रुपमध्ये सहभागी झाला होता. ज़ॉर्जच्या वडिलांची संपत्ती ही ४०० मिलिअन पाऊंड असल्याचं म्हटलं जात आहे.

जॉर्जकडे अनेक आलिशान आणि जगातल्या सर्वात महागड्या गाड्या देखील आहे. अॅमीला डेट करण्याआधी जॉर्जचं नाव अनेक महिलांसोबत जोडलं गेलं आहे. पोलिसांना गंभीर मारहाण केल्याप्रकरणी जॉर्ज ६ महिने तुरूंगातही होता. काही दिवसांपूर्वी हे जोडपं मॅक्सिको आणि कॅनडात सहलीसाठी गेलं होतं. अॅमी ही सध्या २.० चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यग्र आहे. रजनीकांत, अक्षय कुमार आणि अॅमीची प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट या वर्षात प्रदर्शित होत आहे. त्याचबरोबर २०१९ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या ‘किक २’ या चित्रपटात अॅमी दिसणार असल्याच्याही चर्चा ऐकायला मिळत आहेत.

https://www.instagram.com/p/BfLsgQRlj-V/