सुपरहिरो चाहत्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे ‘बॅटमॅन’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट आजवर प्रदर्शित झालेल्या कुठल्याही बॅटमॅनपेक्षा अधिक गडद असेल असा विश्वास अभिनेता अँडी सर्किस यांनी व्यक्त केला आहे.

अँडी चित्रपटात बॅटमॅनच्या सहाय्यकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या आगामी चित्रपटावर भाष्य केलं. ते म्हणाले, “बॅटमॅन म्हणजे शिस्त आणि भीती यांचं प्रतिक आहे. हे प्रतिक आणखी चमकदार पद्धतीने चित्रपटात दाखवलं जाणार आहेत. बॅटमॅनचा जन्म कसा होतो? भीतीच्या गर्द छायेत सापडलेला एक १० वर्षांचा मुलागा बॅटमॅन होण्याचा निर्णय का घेतो? या प्रश्नांची उत्तर प्रेक्षकांना चित्रपटात मिळतील. हा चित्रपट अॅक्शनने भरलेला परंतु अत्यंत डार्क असणार आहे. चित्रपट पाहताना प्रेक्षकांची भीतीने घाबरगुंडी उडेल अशा पद्धतीच्या कथानकाची निर्मिती करण्यात आली आहे. तुम्हाला खऱ्या भीतीचा अनुभव हा चित्रपट देईल.” असं अँडी सर्किस म्हणाले.

८० वर्षांपूर्वी एका कॉमिक स्टोरीच्या निमित्ताने ‘बॅटमॅन’चा जन्म झाला होता. पाहता पाहता हा सुपरहिरो लोकप्रिय झाला. कॉमिक्समधून कार्टून सीरिजमध्ये झळकला परंतु गेल्या आठ दशकांत ख्रिस्तोफर नोलानची डार्क नाईट सीरिज वगळली तर बॅटमॅनला चित्रपटांध्ये कधीच न्याय मिळाला नाही. ही भव्यदिव्य व्यक्तिरेखा नेहमीच सामान्य राहिली. परंतु आता वॉर्नर ब्रदर्स स्टुडिओने बॅटमॅन न्याय देण्याचा निर्णय घेतला आहे. बॅटमॅनची एक नवी चित्रपट सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेतील पहिला चित्रपट ‘द बॅटमॅन’ आजवरचा सर्वात डार्क चित्रपट असेल असा विश्वास अँडी सर्किस यांनी व्यक्त केला.