बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेता अनिल कपूरचे नाव घेतले की अजूनही खळखळत्या उत्साहाने भरलेला आणि तरुणांनाही लाजवेल असा फिटनेस याचं अचूक गणित जमलेला ‘टपोरी’ चेहरा डोळ्यासमोर येतो. अनिल कपूर यांनी बरेच वर्षे रुपेरी पडदा गाजवला. परंतु आजही अनिल त्यांच्या अभिनयाने तरुण पिढीवर भूरळ पाडतात. नुकताच अनिल कपूर यांनी चित्रपटसृष्टीमधील सुरुवातीचा प्रवास कसा होता हे सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टद्वारे सांगितले आहे.

अनिल कपूर यांनी ट्विटरद्वारे त्यांच्या अभिनयाच्या दुनयेतील सुरुवातीचा १९७७ पासून १९८३ पर्यंतचा काळ फार कठीण असल्याचे सांगितले. ‘मी १९७७ ते १९८३ पर्यंत फार मेहनतीने काम करत होतो. मी अशा संधीची वाट पाहात होतो जी माझे आयुष्य बदलेल आणि अखेर ती संधी मला वो ७ दिन चित्रपटात काम करण्याने मिळाली. त्या चित्रपटातील भूमिका आणि अभिनयाने माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली’ असे अनिल कपूर यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे.

‘वो सात दिन’ चित्रपटात अनिल कपूर यांनी ‘प्रेम प्रताप’ची भूमिका साकारली होती. या प्रेमच्या भूमिकेने अनिल कपूरने अनेकांना प्रेमात पाडले होते. त्यानंतर अनिल कपूर यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. या चित्रपटात अभिनेते नसीरुद्दीन शाह आणि अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे मुख्य भूमिकेत होत्या.

अनिल कपूर यांनी त्यांच्या ४० वर्षाच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले. ‘मशाल’, ‘तेजाब’, ‘बेटा (Beta)’, ‘मेरी जंग’, ‘कर्मा’, ‘जांबाज’, ‘दिल धड़कने दो’ आणि ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. तसेच त्यांनी ‘बधाई हो बधाई’ आणि ‘आयशा’ या चित्रपटांची निर्माती देखील केली.