ऑनलाइन अभ्यासासाठी चंदीगडमधील सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना स्मार्टफोन्सचे वाटप केल्यानंतर बॉलिवूड अभिनेता सोनू सूद यानं आणखी एक कौतुकास्पद कामगिरी केली आहे. त्यानं एका गावात विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासात येणारी मोबाईल नेटवर्कची अडचण सोडवण्यासाठी चक्क एक मोबाईलचा टॉवरच बसवून दिला आहे.

चंदीगडस्थित करन गिलहोत्रा या मित्राच्या मदतीने सोनू सूदने मोरनी या गावात ही कामगिरी केली आहे. या गावातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन अभ्यासात वारंवार नेटवर्कची अडचण येत असल्याने या दोघांनी गावात थेट मोबाईल टॉवरच उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार नेटवर्कमध्ये खंड पडू नये यासाठी त्यांनी इंडस टॉवर्स आणि एअरटेलच्या मदतीने गावात मोबाईल टॉवर उभारला आहे.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, यामध्ये मोरनी येथील दपना गावातील एक चिमुकला इतर लहान मुलांना ऑनलाईन अभ्यासासाठी नेटवर्क येत नसल्याने ते मिळवण्यासाठी एका झाड्याच्या फांदीवर जाऊन बसला होता. हा व्हिडिओ ज्या युजरने अपलोड केला होता त्याने तो सोनू सूद आणि करन गिलहोत्रा यांना ट्विटरवर टॅग केला होता. या व्हिडिओने या दोघांचे लक्ष वेधून घेतले होते.

याबाबत करन गिलहोत्रा यांनी म्हटलं की, “मूलभूत शिक्षण घेण्यासाठी मुलांना अशा प्रकारे अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे पाहून मन खट्टू होतं. अशा बिकट परिस्थितीत आम्ही आमच्या ताकदीचा वापर अशा लोकांच्या अडचणी दूर करण्यासाठी करु. या गावातली परिस्थितीचं अवलोकन केल्यानंतर आम्ही इंडस टॉवर्स आणि एअरटेल कंपनीशी बोललो त्यानंतर त्यांनी टॉवर उभारण्यासाठी आम्हाला मदत केली. त्यांनी गावाचं सर्वेक्षण केलं आणि टॉवर कुठे उभारायचा याची जागा निश्चत केली. इंडसने आम्हाला गावात टॉवर उभा करुन त्यावर अॅक्टिव्ह इन्फ्रास्ट्रक्चर उभं करुन दिलं. याचा फायदा या भागात मोबाईल कव्हरेज वेगानं यायला मदत होईल. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे ऑनलाइन क्लासेस त्यांच्या घरात सुरक्षित राहून करता येतील.”

यावर सोनू सूद म्हणाला, “मुलं ही आपल्या देशाचं भविष्य आहेत त्यामुळे चांगल्या भविष्यासाठी त्यांना समान संधी मिळणं गरजेचं आहे. कोणीही आपल्यातील पूर्ण क्षमता वापरण्यापासून वंचित राहू नये यासाठी मी अशी आव्हानात्मक कामं स्विकारतो आहे. त्यामुळे अतिदुर्गम भागातील छोट्या मुलांना ऑनलाईन शिक्षणाकरीता त्यांच्या गावात मोबाईल टॉवर उभारण्यास मदत केल्याचा मला अभिमान आहे.”
करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन जाहीर झाला. तेव्हापासून सोनू सूद सातत्याने गरजवंतांना विविध प्रकारे मदत करीत आहे. त्याच्या या मदत कार्यात अध्यापही खंड पडलेला नाही.