11 December 2017

News Flash

सोनू तर दमदार बंदा – अनुपम खेर

अभिनेता रणदीप हुड्डा, रणवीर शोरे आणि निर्माती खुशबू यांनीही सोनूला पाठिंबा देणारे ट्विट केले

मुंबई | Updated: April 21, 2017 3:01 PM

सोनू निगमने ट्विट केल्यामुळे अजानवरून सध्या चर्चा सुरु झाल्याचे कळल्यावर आश्चर्य व्यक्त करणाऱ्या अनुपम यांनी सोनूची प्रशंसा केली आहे

गायक सोनू निगमच्या ट्विटमुळे सुरु झालेला अजान वाद थांबण्याची काही चिन्हं नाहीत. आपल्या विरोधकांना प्रत्युत्तर देण्यासाठी सोनू निगमने चक्क मुंडनही केले तरी त्याच्या विरोधातील प्रतिक्रिया काही केल्या थांबत नसल्याचेच चित्र आहे. पण, सोनूला विरोध होत असतानाच काही लोकांनी त्याला पाठिंबाही दिला आहे. आता तर अभिनेता अनुपम खेर आणि रणदीप हुड्डा हेदेखील निडरपणे ट्विट करणाऱ्या सोनूच्या पाठिशी उभे राहिले आहेत.

सोनू निगमने ट्विट केल्यामुळे अजानवरून सध्या चर्चा सुरु झाल्याचे कळल्यावर आश्चर्य व्यक्त करणाऱ्या अनुपम यांनी सोनूची प्रशंसा केली आहे. त्यांनी ट्विट केलंय की, ‘बंदे में है दम, जय हो सोनू निगम’. आपले ट्विट हे कुठल्याही धर्माच्या विरोधात नव्हते, हे स्पष्ट करण्यासाठी सोनूने मौलवींनी दिलेले आव्हान पूर्ण केले. त्याने पत्रकार परिषद घेऊन आपल्याला कोणच्याही धार्मिक भावना दुखवायच्या नव्हत्या हे स्पष्ट केले.

अभिनेता रणदीप हुड्डा, रणवीर शोरे आणि अभिनेत्री निर्माती खुशबू यांनीही सोनूला पाठिंबा देणारे ट्विट केले आहेत. रणदीपने लिहलंय की, ‘सोनूने केलेले ट्विट हे धर्माविरुद्ध नसून लाऊडस्पीकरच्या वापराविरोधात होते. याचा चुकीचा अर्थ लावणाऱ्यांना शिक्षा व्हायला हवी.’ तर रणवीरने सोनू निगमबद्दल आपल्या मनात खूप आदर असल्याचे म्हटले आहे. ‘तू नेहमी असतोस तसाच खंबीरपणे उभा रहा. कोणीही तुझं सामर्थ्य आणि हिंमत हिरावून घेऊ शकत नाही,’ असे ट्विट खुशबूने केले. भारतीय क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने हॉलिवूड कलाकार ड्वेन जॉन्सन आणि विन डिझेल यांचे फोटो ट्विट करत ‘सोनू निगम आम्हाला तुझा अभिमान आहे,’ असे लिहिलंय.

First Published on April 21, 2017 3:00 pm

Web Title: anupam kher calls sonu nigam damdaar banda ranvir shorey randeep hooda also support him