२०१९ या नवीन वर्षामध्ये ‘उरी’ आणि ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. हे दोन्ही चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीत उतरल्यामुळे या चित्रपटांना बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करण्याची संधी मिळाली. मात्र ‘उरी’ या चित्रपटाने तुफान कमाई करत ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ ला मागे टाकलं. विशेष म्हणजे उरीमध्ये अभिनेता विकी कौशलने केलेल्या अभिनयाचं सर्व स्तरावर कौतुक करण्यात आलं. त्यातच अभिनेता अनुपम खेर यांनीदेखील विकीवर स्तुतीसुमनं उधळली. मात्र या कौतुकामुळे अनुपम खेर यांच्यावर ट्रोल होण्याची वेळ आली.

‘उरी’ने केवळ १० दिवसांमध्ये १०० कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे. हा चित्रपट या आठवड्याभरामध्ये १५० कोटींचा टप्पा गाठेल अशी शक्यताही वर्तविण्यात येत आहे. अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या चित्रपटाचं कौतुक केलं आहे. त्यात अनुपम खेर यांनीही विकीचं कौतुक करत कलाविश्वात स्वागत असल्याचं म्हटलं आहे. मात्र खेर याचं ट्विट वाचताच नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठविली.

‘उरी’ या चित्रपटाची उत्तमरित्या मांडणी करण्यात आली आहे. विकी तुदेखील उत्तम अभिनय करुन स्वत:ला सिद्ध केलं आहे. प्रत्येक बाजूने तू या भूमिकेला न्याय दिला आहेस. त्यामुळे आता यापुढे तुझी स्पर्धा फक्त स्वत:शीच आहे. जेवढ्या आव्हानात्मक भूमिका स्वीकारशील तेवढ्याच तुला स्वत:ला सिद्ध करण्यासाठी रोज नव्या संधी तुला मिळतील. या कलाविश्वात तुझं स्वागत आहे’, असं ट्विट अनुपम खेर यांनी केलं .

दरम्यान, हे ट्विट वाचल्यानंतर अनेकांनी अनुपम खेर यांच्यावर टीका केली आहे. विकीने पहिल्या चित्रपटापासूनच स्वत:ला सिद्ध केलं आहे. त्यामुळे त्याला आता स्वत : सिद्ध करण्याची गरज नाही. मग तरीसुद्धा उरीनंतर त्याचं या कलाविश्वात स्वागत करण्याचा नक्की काय अर्थ आहे, असा जाब एका नेटकऱ्याने विचारला आहे.

तर आणखी एका नेटकऱ्याने अनुपम खेर यांना विकीच्या ‘मसान’, ‘संजू’, ‘राजी’ आणि ‘मनमर्जिया’ यासारख्या सुपरहिट ठरलेल्या चित्रपटांची आठवणही करुन दिली.  ‘उरी’ चित्रपटाचं दिग्दर्शन आदित्य धार यांनी केलं असून विकी कौशल या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. विकीसोबतच यामी गौतम, परेश रावलदेखील या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकले आहेत.