दिग्दर्शक झोया अख्तर, अनुराग कश्यप आणि अभिनेते अनुपम खेर यांना ऑस्कर अकादमीमध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रण देण्यात आले आहे. ऑस्कर अकादमीने या वर्षी ८४२ नव्या सदस्यांना ऑस्कर अकादमीमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे. यामध्ये लेखक-दिग्दर्शक रितेश बत्रा, व्हिज्युअल इफेक्टसाठी प्रसिद्ध असलेले शेरी भारदा आणि श्रीनिवास मोहन यांचाही समावेश आहे.

‘ऑस्कर’ या जागतिक स्तरावरील प्रतिष्ठेच्या चित्रपट पुरस्कारांसाठी परीक्षकांनाही तितकेच महत्त्व असते. अभिनेते अनुपम खेर यांचे नाव हिंदी आणि हॉलीवूड चित्रपटसृष्टीला परिचयाचे आहे. ‘हॉटेल मुंबई’ आणि ‘बिग सिक व्हाईल’ या हॉलीवूडपटांमुळे खेर यांना निमंत्रण देण्यात आले आहे. तर झोया अख्तर यांना ‘गली बॉय’ चित्रपटाच्या दिग्दर्शक म्हणून निमंत्रण मिळाले आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यप यांना लघुपट व अ‍ॅनिमेशन चित्रपट या विभागातून निमंत्रण देण्यात आले आहे. ‘लंचबॉक्स’ चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक रितेश बत्रा यांनाही निमंत्रितांच्या यादीत घेण्यात आले आहे. तसेच व्हिज्युअल इफेक्टसाठी प्रसिद्ध असलेले शेरी भारदा यांना ‘हिचकी’ चित्रपटासाठी आणि श्रीनिवास मोहन यांना ‘बाहुबली : द बिगिनिंग’ आणि ‘२.०’ मधील उल्लेखनीय कामगिरीमुळे निमंत्रित केले आहे. ऑस्कर अकादमीने ५९ देशांतील नव्या सदस्यांना निमंत्रण दिले असून यात निम्म्याहून अधिक स्त्री सदस्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी ऑस्कर अकादमीने अभिनेता शाहरुख खान, नसिरुद्दिन शाह व अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्यासह ९२८ मान्यवरांना निमंत्रण दिले होते.