बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपविरोधात लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यानंतर पूर्वाश्रमीच्या पत्नी कल्की आणि आरती बजाज समर्थनार्थ मैदानात उतरल्या आहेत. कल्की आणि अनुराग २०११ ते २०१५ दरम्यान नात्यात होते. तर आरती बजाज आणि अनुराग २००३ ते २००९ दरम्यान एकमेकांसोबत होते. दोघींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अनुरागचं समर्थन केलं आहे. अनुराग कश्यपवर अभिनेत्री पायल घोषने लैगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. अनुराग कश्यपने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

कल्कीने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “सोशल मीडियाची ही सर्कस तुझ्यापर्यंत येऊ देऊ नकोस. स्क्रिप्टच्या माध्यमातून तू महिलांच्या स्वातंत्र्यासाठी लढला आहेस. कामातून तसंच खासगी आयुष्यातही महिलांसाठी तू काम केलं आहेस”. कल्कीने २००९ मध्ये अनुराग कश्यपच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. याशिवाय अनेक चित्रपट तसंच वेब ‘सीरिज सेक्रेड गेम्स २’ मध्येही तिने काम केलं आहे.

कल्कीने अनुरागसोबतचा आपला अनुभव शेअर केला आहे. अनुरागने नेहमी कामातही आणि खासगी आयुष्यातही समान वागणूक दिल्याचं तिने सांगितलं आहे. घटस्फोटानंतरही तू माझ्यासाठी नेहमी हजर होतास, काम करताना जेव्हा कधी मला असुरक्षित वाटायचं तेव्हा तू मला पाठिंबा देत होतास असं कल्कीने सांगितलं आहे.

दुसरीकडे रविवारी अनुरागची पहिली पत्नी आरती बजाजने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर नोट शेअर करत अनुराग कश्यपला पाठिंबा दर्शवला होता. तू रॉकस्टार असून महिला सबलीकरणासाठी करतोस ते काम करत राहा असं तिने म्हटलं आहे. जर प्रत्येकाने आपली एनर्जी योग्य ठिकाणी वापरली तर जग एक सुंदर जागा होईल असं तिने म्हटलं आहे. हा एक स्टंट असल्याचा आरोप तिने केला असून अनुरागला आपला आवाज उठवत राहा असं म्हटलं आहे. याशिवाय अनुराग कश्यपसोबत काम करणाऱ्या तापसी पन्नू, राधिका, अमृता सुभाष यांनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अनुरागला पाठिंबा दिला आहे.

पायल घोषचा आरोप काय?
“अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केलं असून मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली आहे. कृपया या व्यक्तीविरोधात काही तरी कारवाई करा, ज्यामुळे या माणसाचं खरं रुप समोर येईल. मला माहित आहे यामुळे मला धोका असून माझ्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कृपया माझी मदत करा”, असं ट्विट पायलने केलं.

अनुरागने फेटाळले आरोप
“क्या बात है. मला गप्प करण्यासाठी बराच वेळ घेतलास. काही हरकत नाही. पण मला गप्प करता करता इतकं खोटं बोललीस की स्वत: सोबत अन्य महिलांनादेखील या वादात घेतलंस. थोडी तरी मर्यादा बाळगा मॅडम, बास्स इतकंच बोलू शकतो मी. जे काही आरोप केले आहेत ते सगळे अर्थहीन आहेत”, असं ट्विट अनुराग कश्यपने केलं आहे.