चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप याची गुरुवारी पोलीस चौकशी करण्यात आली. अभिनेत्री पायल घोष हिने अनुरागवर लैंगिक शोषण आणि गैरवर्तनाचे आरोप केले होते. सोबतच तिने एफआयआरदेखील दाखल केला होता. त्यामुळे गुरुवारी अनुरागची ८ तास चौकशी करण्यात आली.

अभिनेत्री पायल घोषने अनुरागवर लैंगिक शोषण व गैरवर्तनाचे आरोप केल्यानंतर अनुरागने ते फेटाळून लावले होते. मात्र, याप्रकरणी पायलने राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यानंतर अनुरागला बुधवारी चौकशीचे समन्स बजावण्यात आले होते. त्यानुसार, गुरुवारी अनुराग चौकशीसाठी वर्सोवा पोलीस ठाण्यात हजर झाला होता.

गुरुवारी (१ ऑक्टोबर) सकाळी १०.०५ वाजता अनुराग चौकशीसाठी पोलीस स्थानकात हजर झाला होता. त्यानंतर संध्याकाळी ६ वाजता तो पोलीस स्थानकातून बाहेर पडताना दिसला. त्यामुळे जवळपास ८ तास अनुरागची चौकशी करण्यात आल्याचं दिसून येत आहे. अनुरागला चौकशीसाठी बोलावल्यानंतर अभिनेत्री पायल घोषने मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत. मात्र, याच काळात अनुरागच्या वकिलांनी प्रियांका खिमानी यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अनुरागवरील आरोप फेटाळून लावले आहेत.

पायल घोषचा आरोप काय?

“अनुराग कश्यपने माझ्यासोबत गैरवर्तन केलं असून मला अत्यंत वाईट पद्धतीची वागणूक दिली आहे. कृपया या व्यक्तीविरोधात काही तरी कारवाई करा, ज्यामुळे या माणसाचं खरं रुप समोर येईल. मला माहित आहे यामुळे मला धोका असून माझ्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे कृपया माझी मदत करा”, असं ट्विट काही दिवसांपूर्वी पायलने केलं.

दरम्यान, अनुराग कश्यपवर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप करणाऱ्या पायल घोष हिने ‘वाय श्रेणी’तील सुरक्षेची मागणी केली आहे. अनुराग विरोधात पोलीस तक्रार केल्यामुळे तिला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. या धमक्यांमुळे तिच्या जीवाला धोका आहे. परिणामी सरकारने पायलला ‘वाय श्रेणी’तील सुरक्षा द्यावी, अशी मागणी तिचे वकिल नितिन सातपुते यांनी केली आहे.