करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. यावेळी मोदींनी ‘आत्मनिर्भर भारत अभियान’ या २० लाख कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजची घोषणा केली. करोना भारतात संधी घेऊन आला आहे, असं मोदींनी म्हटलं. मोदींच्या या आत्मनिर्भर अभियानाला दिग्दर्शक अनुराग कश्यपने टोला लगावला आहे.

‘पीएमओ इंडिया’च्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर मोदींच्या भाषणातील मुद्दे ट्विट केले गेले. ‘आज आपल्याकडे साधनं आहेत, आपल्याकडे सामर्थ्य आहे, आपल्याकडे जगातील सर्वांत उत्तम कौशल्य आहे. आपण सर्वोत्कृष्ट वस्तू बनवूया, आपली गुणवत्ता अजून सुधारुया, पुरवठ्याच्या साखळीला अजून आधुनिक बनवूया. हे आपण करू शकतो आणि करून दाखवूया’, असे मोदींच्या भाषणातील मुद्दे ट्विट केले गेले. या ट्विटला उद्देशून ‘फक्त पैसे नाहीत आता, खर्च झाले’ असं ट्विट अनुराग कश्यपने केलं.

या भाषणात मोदींनी लॉकडाउन वाढणार असल्याचे संकेतही दिले. लॉकडाउन ४ नव्या नियमांसह लागू केला जाईल. येत्या १८ मे पूर्वी लॉकडाउन ४ चे नवे नियम सांगितले जातील, असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.