अनेक बॉलिवूड कलाकार, दिग्दर्शक आज काल सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. यामधील एक कलाकार म्हणजे अनुराग कश्यप. अनुराग सतत सामाजिक विषयांवर सोशल मीडियाद्वारे व्यक्त होताना दिसतो. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात देशभरात अनेक ठिकाणी विरोध होत आहे. तर अनेक ठिकाणी याविरोधात केल्या गेलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. या आंदोलनात दिग्दर्शक अनुराग कश्यपने सहभाग दर्शवत ट्विट करत मोदींवर टीका केली होती. या ट्विटनंतर त्याच्या ट्विटरवरील फॉलोअर्सची संख्या कमी झाल्याचा अप्रत्यक्ष दावा त्याने केला असून ट्विटर इंडियावर निशाणा साधला आहे.

अनुराग कश्यपच्या ट्विटर फॉलोअर्सची संख्या ५ लाखांपेक्षा अधिक होती. मात्र या फॉलोअर्सची संख्या कमी होऊन ते जवळपास ७६ हजारांवर आली आहे. या प्रकरणी तक्रार करत अनुरागने ट्विट केले आहे. ‘आणि ट्विटर इंडियाने माझ्या फॉलोअर्सची संख्या कमी केली आहे’ असे त्याने फॉलोअर्सचा स्क्रिनशॉट शेअर करत लिहिले आहे.

सोशल मीडियावर अनेक यूजर्सने अनुरागच्या आत्ताच्या फोलोअर्सची संख्या आणि पहिलेच्या फॉलोअर्सच्या संख्येचा फोटो शेअर करत त्याला पाठिंबा दिला आहे. एका युजर्सने तर अनुरागने काही दिवसांपूर्वी ट्विटमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती म्हणून ट्विटर इंडियाने त्याचे फॉलोअर्स कमी केले असे म्हटले आहे.

आमचे प्रधान सेवक, आमचे पंतप्रधान मुके आणि बहिरे आहेत. ते भावनाशून्यही आहेत. ते केवळ नाटकी भाषण देऊ शकतात. बाकी सर्व त्यांच्या अवाक्याबाहेर आहे. त्यांना ना काही दिसत ना काही ऐकू येत. ते सध्या नव्या नव्या खोट्या गोष्टी शिकण्यात व्यस्त आहेत, अशा आशयाचे ट्विट अनुराग कश्यपने केले होते. नागरिकत्व सुधारणा कायद्याचा जो कोणी विरोध करत आहे तो गद्दार आहे. आपल्या संविधानासाठी लढणे, आपल्या हक्कांसाठी आवाज उठवणे आणि सरकारचा विरोध करणे हे जर गद्दारी असेल तर गद्दारच म्हणा. परंतु माझी गद्दारी ही तुमच्या मोदी भक्तीपेक्षा मोठी देशभक्ती आहे, असेही त्यानं दुसऱ्या ट्विटमध्ये म्हटले होते.