ए. आर. रेहमान हे भारतीय संगीतसृष्टीतील सर्वोत्कृष्ट संगीतकार आहेत. फक्त देशातच नाही तर संपूर्ण जगात त्यांचे चाहते आहेत. ए.आर. रेहमान सध्या ‘९९’ या चित्रपटातील गाण्यामुळे चर्चेत आले आहेत. ते या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी जाताना दिसतात. नुकत्याच एका प्रमोशनमध्ये ए.आर.रेहमान उपस्थित होते. त्यावेळी एक अँकर म्हणजेच सुत्रसंचालीकेने हिंदीत वक्तव्य केल्यामुळे ए.आर.रेहमान यांनी तिची खिल्ली उडवली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत ए. आर. रेहमान चेन्नईमध्ये चित्रपटातील कलाकारांसोबत प्रमोशन करत असल्याचे दिसत आहे. सुरूवातीला सुत्रसंचालक ए.आर.रेहमानशी तामिळ भाषेत बोलते. त्यानंतर ती जेव्हा अभिनेता एहान भट्टचे हिंदीत स्वागत करते. हे पाहून ए.आर. रेहमान चकीत होतात आणि म्हणतात हिंदीमध्ये बोलतेस? मुळात हा प्रश्न त्यांनी गंमत म्हणून केला. मी फक्त त्यांच स्वागत केलं अशी प्रतिक्रिया त्या सुत्रसंचालीकेने हसत-हसत दिली. त्यांच हे बोलणं गंमतीशीरपणे सुरू होतं. मात्र, त्याचा व्हिडीओ हा सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

दक्षिण भारतात मातृभाषेत बोलायला जास्त प्राधान्य दिले जाते. तिथे हिंदी भाषेचा वापर खूपच कमी केला जातो. एवढंच नव्हे तर चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये देखील कलाकार हिंदी किंवा इंग्रजी भाषे ऐवजी त्यांच्या मातृभाषेतच बोलतात. याच पार्श्वभूमीवर एका तामिळ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सुत्रसंचालक हिंदी बोलतेय हे ऐकून रेहमान यांना आश्चर्य वाटलं आणि त्यांनी तिची खिल्ली उडवली.