चीनच्या वुहान शहरातून फैलावलेल्या करोना विषाणूने जवळपास सगळ्याच देशांमध्ये पाय पसरले आहेत. भारतातही या विषाणूने शिरकाव केला आहे. आतापर्यंत या विषाणूचा अनेकांना संसर्ग झाला आहे. यात काही सेलिब्रिटींचाही समावेश आहे. अलिकडेच अभिनेता फ्रेडी दारुवाला याच्या वडिलांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे फ्रेडीचा बंगला सील करण्यात आला आहे.
फ्रेडीचे वडील करोना पॉझिटिव्ह असल्याचं निदर्शनास आल्यानंतर त्यांचा बंगला बीएमसीने सील केला असून फ्रेडीच्या संपूर्ण कुटुंबियांना होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. एका मुलाखतीत फ्रेडीने ही माहिती दिली.
‘हिंदुस्तान टाइम्स’नुसार, सुरुवातीला माझ्या वडिलांना ताप आणि अंगदुखीचा त्रास होत होता. मात्र वातावरणातील फरकामुळे हा त्रास होत असेल असं समजून आम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं. परंतु त्यांचं आजारपण कमी होत नसल्याचं आम्हाला जाणवलं. त्यामुळे दोन-तीन दिवसांनी आम्ही त्यांची करोना चाचणी केली तर त्यांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले. सध्या तरी त्यांना डॉक्टरांनी घऱीच आयसोलेट होण्याचा सल्ला दिला आहे, असं फ्रेडी म्हणाला.
पुढे तो म्हणतो, वडिलांना घरात आयसोलेशनमध्ये ठेवल्यामुळे आम्हाला त्याचा काही त्रास होत नाहीये. आमचं घरं मोठं असल्यामुळे सगळे व्यवस्थित स्वत:च्या आरोग्याची काळजी घेत आहेत. मात्र आम्हाला फक्त आमच्या बाळाची काळजी आहे, कारण तो फक्त १५ महिन्यांचा आहे.
दरम्यान, फ्रेडीने २०१४ साली ‘हॉलिडे : अ सोल्जर इज नेव्हर ऑफ ड्यूटी’ या चित्रपटात काम केलं होतं. यात तो खलनायकाच्या भूमिकेत झळकला होता. तर या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिकेत झळकला होता.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 13, 2020 9:51 am