‘स्लमडॉग मिलेनिअर’ हा अर्फी लांबाचा पहिला चित्रपट. त्याचे सहकलाकार देव पटेल आणि मधुर मित्तल दोघेही हॉलीवूडशिवाय काम करायचे नाही, असा हेका धरून बसलेत. तर स्लमडॉगनंतरही ‘प्राग’सारखा आंतरराष्ट्रीय चित्रपट केल्यानंतरही अर्फीला मात्र बॉलीवूड खुणावते आहे. अक्षयकुमार आणि अश्विनी यार्दीच्या ‘ग्रेझिंग गोट प्रॉडक्शन’ची निर्मिती असलेल्या ‘फगली’ चित्रपटातून अर्फी बॉलीवूडमध्ये पदार्पण करतो आहे. पण पंजाबमधून ‘हीरो’ बनण्यासाठी आलेला अर्फी एकेकाळी आपणही डोळ्यांत बॉलीवूडचे स्वप्न घेऊन मुंबई गाठणाऱ्या त्या वेडय़ा तरुण मुलांसारखेच होतो, असे सांगतो.
पंजाबमधून इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण केलेल्या अर्फीला लहानपणापासूनच ‘हीरो’ बनायचे होते. महाविद्यालयात शिकत असताना मीही माधुरी दीक्षितच्या ‘चोली के पिछे’सारख्या गाण्यांमागे वेडा होतो. ‘खलनायक’ची कथाच एकूण भन्नाट वाटायची. हे सगळं जिथे घडतं त्या मायानगरीत आपण असायला हवं, असं दिवसरात्र वाटायचं. वास्तवापासून कोसो दूर आणि आपल्याला जे हवंय त्यासाठी वाट्टेल ते करायची धमक या जोरावर आपण बॉलीवूडचे ‘हीरो’च आहोत हे मनात पक्कं बसलेलं होतं, अर्फी सांगतो. माझा चेहरा देखणा आहे. मी हीरो व्हायचं म्हणून चांगलं शरीर कमावलं होतं. आता फक्त यशराजमध्ये जाऊन आदित्य चोप्रासमोर उभं रहायचं म्हणजे आपली सहज छाप पडेल, या इतक्या बावळट कल्पनेने मी मुंबईत आलो होतो, अर्फी हसत हसत सांगतो.
आता इन-मिन तीन चित्रपटांनंतर माझ्यासाठी अभिनय हे वेगळंच विश्व बनलं आहे. मुंबईत आल्यावर जेव्हा मनातल्या सगळ्या कल्पना गळून पडल्या तेव्हा अर्फीने थिएटर सुरू केलं. ज्येष्ठ रंगकर्मी दिनेश ठाकूर यांच्याकडे अभिनयाचे धडे गिरवलेल्या अर्फीने बर्लिनमधून रीतसर चित्रपटनिर्मिती, दिग्दर्शन, अभिनय सगळ्याचे रीतसर प्रशिक्षण घेतले. तेव्हाच डॅनी बॉएलच्या ‘स्लमडॉग मिलेनिअर’मध्ये काम करण्याची संधी मिळाली. ती इतकी सहज संधी होती की केवळ डॅनी बोएलसारखा दिग्दर्शक असल्याने मी तो चित्रपट केला, असे त्याने सांगितले. पण या चित्रपटानंतर जग बदललं हेही तो मान्य करतो. ‘प्राग’ हा चित्रपट आपण जाणीवपूर्वक निवडला होता, असे तो म्हणतो. ‘प्राग’मध्ये जो मुख्य नायक आहे चंदन त्याच्या मनातील अपराधीपणा आहे त्या अपराधीपणाच्या भावनेची भूमिका मी केली आहे. हे जितकं सांगायला किचकट आहे तितकंच ते कल्पनेतून पडद्यावर उतरवणंही एक आव्हान होतं. आणि थिएटर केल्यानंतर अशा प्रकारे अभिनयाचं कडवं आव्हान पेलण्याचा आत्मविश्वास मला मिळाला होता. तरीही या भूमिकेसाठी सात वेळा ऑडिशन्स दिल्याचेही त्याने सांगितले. पण आता अभिनयाबद्दलची जाणीव इतकी पक्की आहे की मला फक्त तेवढंच करायचंय. मग तो चित्रपट प्रादेशिक असेल, हॉलीवूडपट असेल किंवा बॉलीवूडपट असेल. त्या कथेतली कल्पना पडद्यावर साकारण्यात गंमत वाटली पाहिजे. ‘फगली’ चित्रपटातली आदित्यची भूमिकाही याच विचारांतून आपण स्वीकारली असल्याचे अर्फीने सांगितले.
‘फगली’ ही चार मित्रांची कथा आहे. त्यातल्या आदित्यचा शौचालयाचे सामान विकण्याचा परंपरागत व्यवसाय आहे. एकीकडे आदित्यला आपल्या या व्यवसायाची माहिती इतरांना द्यायची लाज वाटते, आपलं चारचौघांत हसं होईल, अशी भीती त्याच्या मनात आहे. पण दुसरीकडे त्याला हा व्यवसाय मनापासून आवडतो त्यामुळे तो सोडायचा त्याची अजिबात तयारी नाही. आदित्यच्या स्वभावातला हा विरोधाभास मला फार गमतीचा वाटतो. दिग्दर्शक कबीर सदानंदने मला आदित्यची व्यक्तिरेखा ऐकवली तेव्हाच मी त्याला होकार देऊन मोकळा झालो, असे अर्फी सांगतो. पंजाबमधून आलेल्या अर्फीसाठी अक्षयकुमारला भेटणं एक स्वप्न होतं. ते नुसतंच पूर्ण झालेलं नाही आहे तर तो अक्षयच्या प्रॉडक्शनमध्ये काम करतो आहे. त्यामुळे त्याला भेटण्याची, त्याच्याकडून खूप काही शिकण्याची संधी आपोआप मिळाली, असेही तो म्हणतो. आता अजून एका पंजाब दा पुत्तरला भेटण्याचं स्वप्न अर्फीला पूर्ण करायचं आहे. मला ‘धरम’पाजींना भेटायची खूप इच्छा आहे, असे तो सांगतो. आणि त्याच वेळी यश चोप्रांना भेटण्याची इच्छा अपूर्ण राहिल्याबद्दल खंतही व्यक्त करतो.
माझं चित्रपटांचं वेडच यश चोप्रांपासून सुरू झालं होतं. त्यांना यशराजमध्ये एकदा भेटण्याची संधी मला मिळाली आहे खरी, पण त्यांना अजून भेटायचं होतं, त्यांच्याकडून काही जाणून घ्यायचं आणि काम करायचं स्वप्न मात्र अपूर्णच राहिलं हा सल कायम मनात राहील, असे तो सांगतो. के वळ अभिनयापुरती मर्यादित न राहता अर्फीने बर्लिनमधील एका दिग्दर्शिकेबरोबर स्वत:ची ‘बॉम्बे-बर्लिन प्रॉडक्शन’ कंपनीही सुरू के ली असून काही कथा-कल्पना खूप चांगल्या असतात. प्रत्येक चित्रपटात आपण काम करू शकत नाही. मात्र पैशाअभावी अडणाऱ्या अशा कलाकृतींशी निर्माता म्हणून का होईना जोडलं जाणं फार अभिमानास्पद वाटतं म्हणून चित्रपटांबरोबरच निर्मितीची जबाबदारीही सांभाळत असल्याचे अर्फीने सांगितले. आता ‘फगली’लाही तितकाच चांगला प्रतिसाद मिळाला तर न जाणो बॉलीवूडमध्येही आपली अशी वेगळी वाट सापडेल, अशी आशा तो बाळगून आहे.