सलमान खान आणि गायक अरिजीत सिंग यांच्यातील वाद अनेकांनाच माहित आहे. सोमवारी याच वादाने आणखी एक वळण घेतलं होतं. ‘वेलकम टू न्यूयॉर्क’ या आगामी चित्रपटात अरिजीतने गायलेलं गाणं सलमानने काढून टाकण्यास सांगितल्याचं म्हटलं जात होतं. मात्र, या सर्व अफवा असून अरिजीतने या चित्रपटात कोणतंच गाणं गायलं नसल्याचं निर्माते वाशू भगनानी यांनी स्पष्ट केलं.

सोनाक्षी सिन्हा आणि दिलजित दोसांज यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘वेलकम टू न्यूयॉर्क’ या चित्रपटातील ‘इश्तेहार’ या गाण्यावरून हा वाद रंगला होता. या चित्रपटात सलमानने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. पण अरिजीतसोबतचा वाद पाहता हे गाणं त्याने काढून टाकण्यास सांगितलं आणि पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांच्या आवाजात पुन्हा रेकॉर्ड करण्यात आल्याची चर्चा होती.
‘इंडियन एक्स्प्रेस’शी साधलेल्या संवादात निर्माते म्हणाले की, ‘अरिजीत सिंगने गायलेलं गाणं काढून टाकल्याच्या बातम्या वाचून मला धक्काच बसला. कारण त्याने आमच्या चित्रपटासाठी कोणतंच गाणं गायलं नव्हतं. संगीतकार शामिर टंडन आणि मी सुरुवातीपासूनच राहत यांच्यासाठी आग्रही होतो आणि त्यांच्याकडून रेकॉर्ड करून घेतलं. जर अरिजीतने कोणतं गाणं गायलंच नव्हतं, तर ते काढून तरी कसं टाकणार?’

दुसरीकडे राहत फतेह अली खान यांनी गायलेलं गाणं चित्रपटातून काढून टाकण्यात यावं आणि दुसऱ्या भारतीय गायकाकडून रेकॉर्ड करावं अशी मागणी केंद्रीय राज्यमंत्री बाबूल सुप्रियो यांनी सोमवारी केली. भारत- पाकिस्तान सीमेवर तणावपूर्ण परिस्थिती असताना, आपले जवान शहीद होत असताना पाकिस्तानी कलाकारांना का प्राधान्य दिलं जातं, असा सवालही त्यांनी केला होता.