‘स्टुडंट ऑफ द इअर २’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी चंकी पांडेची मुलगी आणि अभिनेत्री अनन्या पांडे सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे. अमेरिकेतील प्रतिष्ठित विद्यापीठाच्या प्रवेशावरून अनन्या वादात सापडली आहे. अनेकांनी तिच्या शिक्षणावरुन तिची खिल्ली उडविली होती. या प्रकरणी अनन्याने आपल्या प्रवेशाबाबतचे काही फोटोदेखील शेअर करत ट्रोलर्सला उत्तरही दिलं होतं. मात्र आता अर्जुन कपूरने अनन्याला एक मोलाचा सल्ला दिला आहे.

अनन्याने तिच्या प्रमाणपत्रांच्या काही फाईल्स समोर ठेऊन याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. या पोस्टवर अर्जुन कपूरने कमेंट करत तिला मोलाचा सल्ला दिला आहे. ‘तू कोणतं शिक्षण घेतेस याविषयी तुझ्या घरातल्यांना आणि मित्रपरिवाराला माहित आहे. त्यामुळे प्रत्येकाला या गोष्टीचं स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. जे लोक तुझ्यावर टीका करतायेत त्यांना करु दे. तू कायम पुढे जाण्याचा प्रयत्न कर’, असं म्हणत अर्जुनने अनन्याला सल्ला दिला आहे.

‘स्टुडंट ऑफ द इअर २’ च्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये अनन्याने तिच्या शिक्षणाविषयी काही गोष्टींचा खुलासा केला होता. त्यावेळी तिला ‘युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियामध्ये प्रवेश मिळाला होता. मात्र चित्रपटाच्या चित्रीकरणामुळे तिला शिक्षण पूर्ण करता आलं आहे, असं तिने सांगितलं होतं. मात्र, अमेरिकेतील विद्यापीठात प्रवेश घेतला असल्याची खोटी माहिती अनन्या देत असल्याचं काहींचं म्हणणं आहे. या विद्यापीठातील एका विद्यार्थीनीनं अनन्या नावाच्या कोणत्याही व्यक्तीनं प्रवेश घेतला नसल्याचा दावा केला होता. त्यानंतर अनन्याला ट्रोल करण्यात आलं होतं.

दरम्यान, ‘स्टुडंट ऑफ द इअर २’मधील अनन्याच्या अभिनयाची प्रेक्षकांकडून प्रशंसा झाली. ती ‘पती पत्नी और वो’ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये झळकणार आहे. यामध्ये तिच्यासोबत कार्तिक आर्यन आणि भूमी पेडणेकर यांच्याही मुख्य भूमिका आहेत.