सोनाक्षी सिन्हा ते अथिया शेट्टी, अर्जुन कपूरचं नाव कोणत्या अभिनेत्रीसोबत जोडलं गेलं नाही असं तर झालंच नाही. पण तरीही तो सिंगलच आहे. त्याच्या रिलेशनशिपच्या अनेक बातम्या बॉलिवूड जगतात फिरत होत्या, पण कोणतीही बातमी त्याला रिलेशनशिपमध्ये अडकवू शकली नाही. पण असे नाही की तो कधी रिलेशनशिपमध्ये नव्हता. पण तरीही काही कारणांमुळे त्यांचं ते नातं पुढे गेलं नाही.

सध्या तो खऱ्या प्रेमाच्या शोधात आहे. आयुष्यातली प्रेमाची पोकळी त्याला सध्या अधिक जाणवते. ‘मिड- डे’ वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्याने आपले मन मोकळे केले. ‘आयुष्याच्या एका टप्प्यात तुम्ही ज्याच्यासोबत तासनतास बोलू शकता अशी व्यक्ती जवळ असावी असं नेहमीच वाटतं. एखाद्यावर जिवापाड प्रेम करायला, त्या व्यक्तीला सरप्राइज डिनरला घेऊन जायला मला नक्कीच आवडेल. मी नेहमीच बोलतो की तो दिवस माझ्या आयुष्यात नक्की येईल आणि त्यावर माझा विश्वास आहे.’

या खलनायकाला मिळायचे नायकांपेक्षा अधिक मानधन

तो कदाचित याआधीच रिलेशनशिपमध्ये असलाही असता पण त्याच्या व्यग्र वेळापत्रकामुळे तो यासाठी वेळ देऊ शकला नाही. ‘मी २०१२ पासून सिनेमांमध्ये काम करायला सुरूवात केली. यादरम्यान मला स्वतःला असा वेळच देता आला नाही. जर मी मलाच वेळ देऊ शकत नाही. तर मी त्या व्यक्तीला तरी काय देणार. २०१६ मध्ये आलेल्या ‘की अॅण्ड का’ या सिनेमाच्या चित्रीकरणाआधी फक्त मी स्वतःसाठी थोडा वेळ काढला होता.

याशिवाय ‘मुबारका’ या सिनेमानंतर मला दोन महिन्यांचा मोकळा वेळ आहे. त्यानंतर मी दिबाकर बॅनर्जीचा ‘संदिप और पिंकी फरार’ या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरूवात करणार आहे. माझं करिअर घडवण्यासाठी मी माझं वैयक्तिक आयुष्य बाजूला ठेवलं आहे.’
३२ वर्षीय अर्जुनचा लग्न संस्थेवर विश्वास आहे. ‘लग्न करण्याआधी मला किमान २ वर्ष रिलेशनशिपमध्ये राहायचं आहे. ते नातं मला पूर्णपणे तपासून पाहायचं आहे. लग्नासाठी जेव्हा मी २०० टक्के तयार असेन तेव्हाच मी लग्न करेन.’

सध्या अर्जुन कपूर अनीस बाझमी यांच्या ‘मुबारका’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या सिनेमात तो दुहेरी भूमिका साकारणार आहे. या सिनेमातून अनिल आणि अर्जुन ही काका- पुतण्यांची जोडी पहिल्यांदा एकत्र दिसणार आहे. अनिझ बाझमी यांचा ‘मुबारका’ या सिनेमाची कथा अशा क्रेझी कुटुंबाभोवती फिरत असते.

सर्जरीदरम्यान झाला मृत्यू, १०० हून जास्त केल्या प्लॅस्टिक सर्जरी

या कुटुंबामध्ये करण आणि चरण अशी जुळी मुलं असतात. या जुळ्या मुलांची व्यक्तिरेखा अर्जुनने साकारली असून त्याच्या काकांची म्हणजेच करतार सिंग ही व्यक्तिरेखा अनिल कपूरने साकारली आहे. या दोघांमुळे कुटुंबात किती गोंधळ उडतो ते दाखवण्यात आले आहे. अनिझ यांच्या नावावर ‘नो एण्ट्री’, ‘सिंग इज किंग’, आणि ‘रेडी’ अशा अनेक यशस्वी विनोदीपटांची यादी आहे. २८ जुलैला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.