अभिनेता अर्जुन रामपालची आई ग्विन रामपाल यांचे मुंबईत निधन झाले. त्या ६७ वर्षांच्या होत्या, दीर्घ काळापासून ग्विन रामपाल ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत होत्या. मात्र अखेर त्यांची प्राणज्योत रविवारी मालवली. ग्विन रामपाल यांची अंत्ययात्रा वरळी भागातून काढण्यात आली होती. या अंत्ययात्रेत हिंदी सिनेसृष्टीतले काही कलाकारही सहभागी झाले होते. तसेच अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गैब्रिएलाही या ठिकाणी दिसली एवढेच नाही तर अर्जुन रामपालची घटस्फोटित पत्नी जेसिया मेहेरही अंत्यसंस्कारांसाठी आली होती. वरळीच्या स्मशानभूमीत ग्विन रामपाल यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अर्जुन रामपालची आई ग्विन रामपाल यांना ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. चार वर्षांपासून त्या ब्रेस्ट कॅन्सरशी लढा देत होत्या. हा कॅन्सर ट्रिपल निगेटिव्ह स्टेजचा होता. खरंतर त्यांची प्रकृती काहीशी सुधारत होती कारण यावर्षीच जुलै महिन्यात आई कॅन्सरमधून हळूहळू बरी होते आहे अशा आशयाचा एक ट्विट अर्जुन रामपालने केला होता. मात्र वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रविवारी म्हणजेच २८ ऑक्टोबरला त्यांचे निधन झाले.