अभिनेता अरमान कोहलीला अटक झाल्यानंतर २० तासांच्या आतच त्याच्या गर्लफ्रेंडने तक्रार मागे घेतली आहे. गर्लफ्रेंड निरू रंधावाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी त्याला मंगळवारी पोलिसांनी लोणावळा येथून अटक केली होती. आज (बुधवारी) त्याला वांद्रे कोर्टात हजर करण्यात आले. निरू आणि अरमान एकमेकांच्या समजुतीने हा वाद मिटवणार असल्याने त्याची रवानगी कारागृहात करण्याची गरज नाही असे अरमानच्या वकिलांनी कोर्टात सांगितले. यावेळी निरूदेखील कोर्टात हजर होती.

परस्पर समजुतीने ही तक्रार रद्द करण्यासंदर्भातील अरमानची याचिका कोर्टाने फेटाळली असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे अरमानच्या जामिनासाठी आता वकिलांकडून मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल करण्यात येणार आहे.

क्षुल्लक वादावरून अरमानने निरुला बेदम मारहाण केली होती. तिला उपचारासाठी कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर निरुच्या तक्रारीवरून सांताक्रूझ पोलीस ठाण्यात अरमानविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या अरमानला अखेर काल (मंगळवारी) लोणावळा येथून त्याच्या मित्राच्या फार्म हाऊसवरून अटक करण्यात आली. आता पुढील चौकशीसाठी त्याला कोठडी सुनावण्यात यावी अशी मागणी निरुच्या वकिलांकडून करण्यात आली.

अरमानविरोधात शस्त्र बाळगल्याप्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला जामिन मिळू नये यासाठी त्या कलमाचा समावेश करण्यात आल्याचेही त्याच्या वकिलांकडून सांगण्यात आले. सध्या कोर्टाने अरमानला न्यायालयीन कोठडी सुनावली असली तरी निरुने तक्रार मागे घेतल्याने तो लवकरच कोठडीतून सुटण्याची शक्यता आहे.