हॉलिवूड स्टार अरनॉल्ड श्वार्झनेगर यांच्यावर एका तरुणाने हल्ला केला आहे. अरनॉल्ड श्वार्झनेगर जीममध्ये लोकांसोबत गप्पा मारत असतानाच अचानक हा हल्ला करण्यात आला. कॅलिफोर्नियाचे माजी गव्हर्नर असणारे अरनॉल्ड श्वार्झनेगर जोहान्सबर्ग येथे आपल्या चाहत्यांसोबत स्नॅपचॅट व्हिडीओ रेकॉर्ड करत होते. यावेळी अचानक मागून एका तरुणाने हवेत उडी मारत त्यांना लाथ मारुन खाली पाडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या हल्ल्यात अरनॉल्ड श्वार्झनेगर यांना कोणतीही इजा झालेली नाही.

अरनॉल्ड क्लासिक अफ्रिका या वार्षिक कार्यक्रमाच्या निमित्ताने अरनॉल्ड श्वार्झनेगर यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांच्यावर हा हल्ला झाला. हा हल्ला कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला असून अचानकपणे झालेल्या या हल्ल्यामुळे अरनॉल्ड श्वार्झनेगर यांनाही थोडा वेळ काय झालं कळलं नाही. अरनॉल्ड श्वार्झनेगर यांच्यावर हल्ला केल्यानंतर तरुण खाली जमिनीवर पडताना दिसत आहे. यानंतर अरनॉल्ड श्वार्झनेगर यांचे अंगरक्षक तरुणाला ताब्यात घेऊन जाताना दिसत आहेत.

हल्ला करणाऱ्या तरुणाला अंगरक्षक ओढून घेऊन जात असताना ‘मला मदत करा, मला लॅम्बॉर्गिनी हवी आहे’ असं वारंवार ओरडत होता. ‘तुम्हा सर्वांप्रमाणे मलादेखील व्हिडीओ पाहिल्यानतंरच लाथ मारली असल्याचं लक्षात आलं. त्या मुर्खाने माझ्या स्नॅपचॅट स्टोरीत व्यत्यय नाही आणला हे नशीब’, अशी प्रतिक्रिया अरनॉल्ड श्वार्झनेगर यांनी दिली आहे.

अरनॉल्ड क्लासिक अफ्रिकाच्या निमित्ताने २४ हजार खेळाडून तीन दिवसांच्या स्पर्धेसाठी एकत्र येतात. अरनॉल्ड श्वार्झनेगर यांनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये चाहत्यांना हल्ल्याकडे जास्त लक्ष न देता खेळाडूंवर लक्ष द्या असं आवाहन केलं आहे. आयोजकांनी यासंबंधी स्टेटमेंट जारी केलं असून, हा हल्ला नियोजित असल्याचं लक्षात येत असल्याचं म्हटलं आहे. अरनॉल्ड श्वार्झनेगर यांनी आपण कोणतीही कायदेशीर करण्यास इच्छुक नसून, दुर्देवी घटना असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.