भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंग लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. अभिनेत्री, मॉडेल हेजल किचच्या प्रेमात क्लिन बोल्ड झालेला युवराज ३० नोव्हेंबरला हेजलसह विवाहबद्ध होईल. आयुष्यभराच्या पार्टनरशिपसाठी युवीने हेजलची निवड केली होती. बऱ्याच दिवसांपासून एकमेकांसोबत एकत्र वेळ घालविल्यानंतर युवराज आणि हेजल यांनी काही दिवसांपूर्वी गुपचूप साखरपूडा केला होता. साखरपुडा झाल्यानंतर युवराज पुढील वर्षी लग्न बेडीत अडकणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. पण युवी त्याच्या वाढदिवाच्या पूर्वीच हेजलला आपल्या घरी घेऊन येणार आहे. युवराजचा वाढदिवस १२ डिसेंबरला असतो. त्यामुळे त्याच्या वाढदिवसाआधीच युवी-हेजलच्या लग्नाचा बार वाजणार आहे.

युवराज सिंगच्या लग्नात वडील राहणार गैरहजर

[jwplayer YZIr9EbB]

दरम्यान, युवराज आणि हेजल या दोघांचे प्रेम फुलत असताना काही काळासाठी त्यांच्यात दुरावाही निर्माण झाला होता. हेजलने युवीचा फोन उचलणे बंद केले होते. हेजलचा प्रतिसाद मिळत नसल्याने युवीने तिला फेसबुक फ्रेंडलिस्टमधून देखील बेदखल केले होते. पण अखेर दोघांमधील वाद मिटला आणि आता ते सुखाने संसाराला सुरुवात करणार आहेत. फतेहगड साहेब जिल्ह्यातील दुफेरा गावातही युवराज आणि हेजलच्या लग्नाची जोरदार तयारी सुरु आहे. येथे ते धार्मिक गुरु अजित सिंग हंसालीवाले यांचा आशिर्वाद घेतील. युवराजच्या आई शबनम सिंग या धार्मिक गुरु संत अजित सिंग हंसालीवाले यांच्या भक्त आहेत. डेरा येथे युवी-हेजलचा विवाह शीख रितीरिवाजांनुसार होईल. या दोघांच्या आनंद कारज समारोहाला केवळ जवळचे मित्रमंडळी आणि नातेवाईक उपस्थित राहतील.

.. अशी आहे युवराज सिंग-हेजलच्या लग्नाची पत्रिका

[jwplayer rVTAAWE0]

इंडोनेशियातील बाली येथे ११ नोव्हेंबरला दोन्ही कुटुंबियांच्या उपस्थितीत युवी-हेजलचा साखरपुडा झाला होता. हेजल किच हिने सलमान खानच्या ‘बॉडीगार्ड’ या चित्रपटात करिना कपूरची मैत्रीण आणि सलमान खानच्या पत्नीची भूमीका साकारली होती. तसेच ‘बिग बॉस’ या रियालिटी शोच्या एका पर्वात ती सहभागी झाली होती.

* युवराज-हेजल यांची मेहंदी सिरेमनी (प्री-वेडिंग पार्टी) २९ नोव्हेंबरला चंदिगड येथील ललित हॉटेल येथे होईल.
* ३० नोव्हेंबरला शीख विवाह पद्धतीनुसार लग्न झाल्यानंतर या दोघांकडून रात्रीच्या भोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
* २ डिसेंबरला युवराज-हेजल गोवा येथे हिंदू विवाहपद्धतीनुसार लग्न करतील.
* ५ डिसेंबरला युवराज-हेजल दिल्लीमध्ये छत्तरपूर येथील फार्महाऊसवर संगीत पार्टीचे आयोजन करणार आहेत.
* ७ डिसेंबरला दिल्लीत त्यांचे रिसेप्शन होईल. यावेळी क्रिकेट आणि बॉलीवूडमधील प्रसिद्ध चेहरे उपस्थित राहतील.