डिजिटलचा प्रेक्षक वाढतोय याचा अंदाज येताच अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्स आणि त्यावरच्या धडाधड येणाऱ्या वेबसीरिज यांची एकच गर्दी झाली आहे. वेबसीरिज हे भविष्य आहे असे सांगत अनेक छोटे-मोठे चित्रपटकर्मी त्याकडे वळले. आणि आता एकूणच वेबसीरिजचं पीक इतकं फोफावलं आहे की त्यात दाखवला जाणारा सगळाच आशय प्रेक्षकांना रुचणारा नाही. मात्र सहज मोबाइलच्या एका क्लिकवर सगळं काही पाहू शकणाऱ्या या प्लॅटफॉर्मवरच्या आशयालाही सेन्सॉरचे बंधन नसल्याने जे चित्रपटातून दाखवू शकत नाही तोही आशय इथे दाखवला जाऊ लागला. पण इंडस्ट्री म्हणून वेगाने विकसित झालेल्या या प्लॅटफॉर्मवरच्या आशयालाही आता सेन्सॉरची गरज असल्याची कुजबूज लोकांमध्ये सुरू होती. सध्या मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात त्यासंदर्भात झालेली याचिका आणि त्यावरच्या सुनावणीत वेबसीरिजचा आशय प्रमाणित करण्यासाठी न्यायालयाने समिती स्थापण्याचे दिलेले आदेश यामुळे आता वेबसीरिजही कायद्याच्या कात्रीत येणार आहेत. सेन्सॉरशीपचा आजवर मुक्त असलेल्या या वेबविश्वावर काही परिणाम होईल का..

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दिव्या गणेशप्रसाद गोंटिया यांनी वकील श्याम देवाणी यांच्या करवी वेबसीरिज संदर्भात एक याचिका दाखल के ली होती. वेबसीरिज सध्या घरोघरी पाहिली जात असल्याने त्याचाही आशय प्रमाणित असला पाहिजे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती. या याचिकेची दखल घेत न्यायालयाने माहिती प्रसारण मंत्रालय आणि इंडियन ब्रॉडकास्टिंग फाऊंडेशनला वेबसीरिजचा आशय प्रमाणित करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. वेबसीरिजचा आशय दिवसेंदिवस बोल्ड, अश्लील होत चालला आहे. भावना दुखावणारा मजकूर, अश्लील भाषा आणि हिंसक दृश्ये यांनी भरलेला हा आशय असल्यामुळे त्याचे वाईट परिणाम होतील अशी चिंता या याचिकेत वर्तवण्यात आली होती. चित्रपट, मालिका, वृत्तपत्रे यांच्या आशयावर अंकुश ठेवण्यासाठी समिती असताना वेबसीरिजच्या आशयाचीही पाहणी करण्यासाठी एक समिती असावी, असे या याचिकेत नमूद करण्यात आले होते.

इंडियन ब्रॉडकास्टिंग फाऊं डेशन आणि माहिती प्रसारण मंत्रालयाकडून न्यायालयाच्या आदेशाचे पालन होईल, पण तशी समिती झालीच तर वेबविश्वावर याचे नेमके काय परिणाम होतील? कारण आता चित्रपटांप्रमाणेच वेबसीरिजनाही प्रदर्शित होण्यापूर्वी समितीसमोर प्रदर्शन करावं लागणार आहे. वेबसीरिजच्या आशयावरून झालेले वाद नवीन नाहीत. याआधी नेटफ्लिक्सच्या वेबसीरिजमध्ये माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याविषयी आक्षेपार्ह बाब असल्याने दिल्ली उच्च न्यायालयाने नेटफ्लिक्सला दणका दिला होता. नुकतीच जागतिक मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने वेबसीरिज पाहण्याचे व्यसन लागलेल्या बंगलोर स्थित एका मुलाचे प्रकरण उघडकीस आले ज्यात वेबसीरिजच्या आशयामुळे त्याचे मानसिक आरोग्य बिघडल्याचा दावा करण्यात आला आहे.

अल्ट बालाजी, अमेझॉन प्राइम व्हिडीयो, नेटफ्लिक्स, हॉटस्टार, वूट, झी ५, सोनी लीव्ह अशा व्हीडियो ऑन डिमांड ओटीटी प्लॅटफॉर्मवर एकापेक्षा एक वेबसीरिजचा धडाका लावणाऱ्या कलाकार-दिग्दर्शकांशी बोलताना तेही या निर्णयामुळे काय बदल होतील, याबद्दल गोंधळलेले असल्याचे लक्षात येते. चित्रपट, मालिकानंतर दमदारपणे वेब विश्वात पदार्पण केलेला अभिनेता बरुण सोबती म्हणाला, ज्या प्रकारे दूरचित्रवाणीवर मालिका दाखवल्या जातात, तशाच या वेबमालिका आहेत. मला अभिनेता म्हणून वेगवेगळ्या माध्यमात काम करायला आवडतं. वेबसीरिजच्या निर्मात्यांनी त्यांच्या आशयाप्रमाणे माझी एखाद्या वेबसीरिजसाठी निवड केली तर मला तो आशय कितपत आवडला आहे किंवा नाही, यावरून मी त्यात काम करायचं की नाही ते ठरवतो. कारण माझ्यासाठी आशय जास्त महत्त्वाचा आहे. मी आजवर तनहाइया, असुरा आणि द ग्रेट इंडियन डीसफंक्शनल फॅमिली या वेबसीरिज केल्या आहेत. त्यात आशयाच्या दृष्टीने वावगं काही वाटलं नाही. त्यामुळे ज्यांचे आशय चांगले आहेत त्यांना या निर्णयाने फारसा फरक पडेल असे वाटत नसल्याचे त्याने स्पष्ट केले.

हिंदी चित्रपटांनंतर इट्स नॉट दॅट सिम्पल या वेबसीरिजमधून स्वरा भास्कर मीरा या व्यक्तिरेखेतून प्रेक्षकांसमोर आली. स्त्रीने तिच्या लैंगिक इच्छेनुसार नवऱ्याव्यतिरिक्त परपुरुषाशी संबंध ठेवण्यात काही गैर नाही, असा बोल्ड आशय मांडणारी ही वेबसीरिज आहे. स्त्रीला तिचे लैंगिक सुख मिळवण्याचा हक्क आहे, असा विषय मांडताना मीराची व्यक्तिरेखा कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना हे शाश्वत सत्य सांगते, असं स्वरा म्हणाली. या वेबसीरिजमध्ये एका आईचा धाडसी विचार आहे. पण यात खटकण्यासारखं काही नाही, असं स्वरा म्हणते. आपल्या समाजात वर्षांनुवर्ष हेच सुरू आहे. समाजाच्या जाचक अटी पुरुषांवर कमी स्त्रियांवर जास्त आहेत, तेच वेबसीरिजमधून येतंय. लस्ट स्टोरीजसारखे विषय यात समाजात दबून राहिलेल्या आजवरच्या भावनाच व्यक्त झाल्या आहेत. आपण जर एखादी बोल्ड व्यक्तिरेखा करत असू तर आधी ती व्यक्तिरेखा आपल्याला पटली आहे की नाही, त्या व्यक्तिरेखेवर आपला विश्वास आहे की नाही, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मला एखाद्या व्यक्तिरेखेविषयी विश्वास वाटला तरच ती मी करते. वैयक्तिक स्तरावर आशय बघितल्याशिवाय कामच करत नसल्याचे हे कलाकार स्पष्ट करतात.

परमनंट रुममेट या पहिल्या भारतीय वेबसीरिजपासून ते ऑफिशिअल सीईओगिरी या प्रवासात अभिनेता सुमीत व्यासने वेबकिंग म्हणून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. वेबसीरिजनेच त्याला प्रसिद्धी मिळवून दिली. त्यामुळे या माध्यमाविषयी तो अतिशय हळवा आहे. त्याला या माध्यमाविषयी आदर आहे. याविषयी अभिनेता सुमीत व्यास म्हणतो, आता वेबसिरिज विश्वात प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. आधी खूप छोटय़ा पातळीवर वेबसीरिज व्हायच्या. आता नेटफ्लिक्स, अमेझॉनसारखी मोठी नावं यात आली आहेत. त्यामुळे नावाजलेले निर्माते यावर पैसा लावू लागले आहेत. प्रयोगशीलता आली आहे. वेबसीरिजची संख्या वाढते आहे. प्रेक्षकांना सत्य घटनांवर आधारित आशय बघायला आवडतो, म्हणून वेबसीरिजसुद्धा ग्लॅमर विषयांना फाटा देत सत्य घटनांवर बोलू लागल्याआहेत. मी जेव्हा लेखक म्हणून वेबसीरिज लिहितो, तेव्हा आसपासचं वातावरण, माझ्या अनुभवांवर आधारलेलं सगळं लेखणीतून उतरतं. कारण मला गोष्टी सांगायला खूप आवडतं. मी आजवर वेबसीरिजमध्ये ज्या व्यक्तिरेखा केल्या त्या प्रेक्षकांनी पसंत केल्या, आजवर एकदाही त्यावर नकारात्मक प्रतिक्रिया आली नाही.

बॅण्ड बाजा बारात ही वेबसीरिज भाषेच्या दृष्टिकोनातून थोडी बोल्डपणे मांडली होती. त्यातले संवाद काहीसे थेट होते, पण ते कृत्रिम वाटू नये, म्हणूनच काहीसे बोल्ड भाषेकडे झुकलेले होते. पण मला वाटतं प्रेक्षक समजूतदार आहेत. तरीही वेबसीरिजसाठी काम करणाऱ्या सर्वानीच म्हणजे लेखक, कलाकार, निर्माते यांचीही समाजाप्रती जबाबदारी आहे. आणि त्यांनी आशयाचा विचार करताना जबाबदारीचं भान राखलं पाहिजे, असं तो म्हणतो.

अमेझॉन प्राइम व्हिडीयोचे आशयप्रमुख विजय सुब्रमण्य म्हणाले की, प्रेक्षकांना दैनंदिन मालिकांव्यतिरिक्त दूरचित्रवाणीवर काही पाहायला मिळत नाही. त्यांच्यासाठी या वेबसीरिज आहेत. त्यामुळे सास-बहू मालिकांपेक्षा वेगळा आशय त्यांना पाहता यावा असा आमचा आग्रह असतो. दूरचित्रवाणी आता पारंपरिक मनोरंजनाचा प्रकारच रुळला आहे, वेबसीरिजने त्यापलीकडे जायला हवं. वेबसीरिज कशा असायला हव्यात, कशा नसाव्यात हे आम्ही आमच्या आतापर्यंतच्या वेबसीरिजमधून शिकतो आहोत. मला वाटतं प्रेक्षकांना कथेचं वेगळंपण आणि आशयातील वैविध्य आवडतं. कथेचा अस्सलपणा प्रेक्षकांना भावतो, त्यामुळे अशाच वेबसीरिज करण्याकडे आमचा कल आहे. सध्यातरी बोल्डपेक्षा आशयातील वेगळेपणावर आम्ही भर देत आहोत. बोल्ड हा शब्द वेबसीरिजच्या विश्वात सहजता किंवा कृत्रिमपणा येऊ  न देता व्यक्त होणं, भाषेचं प्रवाहीपण ज्यातून येतं अशाप्रकारचा आशय या अर्थाने घेतला जातो. त्यामुळे सरसकट वेबसीरिज या बोल्ड असतात, असे म्हणणे चुकीचे ठरेल, असं ते म्हणाले.

वूट या ओटीटी प्लॅटफॉर्मनेही नुकत्याच १८ वेबसिरिज एकत्रित लाँच केल्या. अमेझॉन, नेटफ्लिक्सला टक्कर देण्याच्या दृष्टिकोनातून हे पाऊल उचलल्याचं वरवर वाटत असलं तरी मुळात आशयाचं वेगळेपण किंबहुना प्रेक्षकांची वेगळं पाहण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठीच या वेबसिरिज आहेत, असं वूटच्या आशयप्रमुख मोनिका शेरगील यांनी सांगितलं. सध्या ओटीटी कंपन्यांमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेमुळे प्रत्येकावरच वेगळं काही देण्याचं दडपण आहे हेही त्या मान्य करतात. एकीकडे वेबसीरिज आपल्याला आजच्या काळाशी सुसंगत असा आशय मांडण्याचं स्वातंत्र्य आणि धाडस देते असे मत दिग्दर्शक अनुराग कश्यपने व्यक्त केले. त्याच्या मते सत्य सांगायला आणि मांडायला आजकाल जास्त ताकद लागते. नेटफ्लिक्सकडे वेगळे विषय मांडण्याचे धाडस आहे. ते निडर आहेत. त्यामुळेच सेक्रेड गेम्स करण्याचं सर्जनशील स्वातंत्र्य आपल्याला मिळाल्याचं तो म्हणतो. आता या नव्या सेन्सॉरशीपमुळे हे स्वातंत्र्य धोक्यात येईल का, ही चिंताही सगळ्यांना सतावते आहे.

वेबसीरिजकडे आधी मालिकांना पर्याय म्हणून पाहिलं गेलं, त्यानंतर हे दोन्ही पर्याय एकत्रित प्रेक्षकांना मिळाले आहेत, असा सूर लागला. त्यानंतर मालिकांपेक्षा वेबसीरिज बोल्ड झाल्यात अशी चर्चा रंगू लागली. पण या चर्चेने आता कायदेशीर वळण घेतल्याने इंडियन ब्रॉडकास्टिंग फाउंडेशन आणि माहिती प्रसारण मंत्रालय कोणती भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.