भक्ती परब

तिसरी घंटा झाली. प्रेक्षक आणि नटवृंदामधील रंगमंचावरील मखमली पडदा बाजूला झाला. तंत्रज्ञ सरसावले. नटमंडळी आपल्या व्यक्तिरेखेच्या रंगभूषा आणि वेशभूषेवर शेवटचा हात फिरवून सज्ज झाले. पहिल्या पात्राचा प्रवेश झाला. रसिकराज नाटय़कलेचा आस्वाद घेण्यात मग्न झाला. असे अनुभव सध्या राज्यभरातील नाटय़रसिकांना भरभरून घेता येतायेत. नाटय़सृष्टीत भरभराटीच्या दिवसांबरोबरच बदलाची नांदी सुरू झालीय. मराठीत सध्या झी समूह, बुक माय शोसारख्या कॉर्पोरेट कंपन्यांनी नाटय़निर्मितीत पाऊल टाकले आहे. त्यांची नाटके यशस्वी ठरल्याचे लक्षात आल्यानंतर आणखीही काही मोठी कॉर्पोरेट नावं नाटय़निर्मितीत उतरत असल्याची चर्चा नाटय़वर्तुळात सुरू झाली आहे. हा बदल कलाकार, तंत्रज्ञ यांना खरोखरच मानवलाय का..

अभिनेते वैभव मांगले म्हणाले की हा उत्तम बदल आहे. झी मराठी आणि बुक माय शो सारखी कंपनी नाटय़निर्मितीत उतरली आहे. ही मोठी गोष्ट आहे. यामुळे कलाकारांना चांगलं काम उपलब्ध होईल. दूरचित्रवाणीवर नाटकाची जाहिरात केल्यावर प्रेक्षकसंख्येत वाढ होते हा अनुभव निर्मात्यांना येतोय. अ परफेक्ट मर्डरसारखं बुक माय शो कंपनीची निर्मिती असलेल्या नाटकालाही प्रेक्षक गर्दी करतायेत. ते पुढे म्हणाले, नाटय़सृष्टीत कॉर्पोरेट कंपन्यांचं येणं ही फायद्याची गोष्ट आहे. कारण आता नाटय़व्यवसायाला शिस्त येईल. शिस्त आल्यामुळे नफ्या-तोटय़ाची गणितं कागदावर दिसतील. जी पूर्वी दिसत नव्हती. निर्मात्यांमध्येही चांगलं वातावरण निर्माण होईल. पारदर्शी व्यवहार असेल. आणि कलाकारांच्या, तंत्रज्ञांच्या मानधनात वाढही होईल. झीची प्रस्तुती असलेली नाटकं आल्यामुळे नाटकांचं बुकिंग वाढलं. नाटय़सृष्टीला ऊर्जितावस्था आली, असं मत मांगले यांनी मांडलं.

नाटय़सृष्टीत आणि इतर क्षेत्रातील बदल लक्षात घेता सध्या नवनिर्मितीपेक्षाही हा जतनाचा काळ आहे, असं या क्षेत्रातले जाणकार सांगतात. मराठी रंगभूमीला तर सुवर्णाक्षरांनी लिहावा असा प्रगल्भ आणि समृद्ध इतिहास आहे. हा इतिहास कोणी पुन्हा उलगडून दाखवल्यास प्रेक्षक त्यालाही तितकीच पसंती देतात. हे संगीत चि.सौ.कां.रंगभूमी, वऱ्हाड निघालंय लंडनला, आरण्यक, हॅम्लेट, नटसम्राटसारख्या नाटकांनी दाखवून दिलंय. यात प्रेक्षकांना आवडतं ते त्या गतकाळात रमणं आणि तितकंच त्या नाटकाचं दृश्यस्वरूप. याविषयी प्रकाश योजनाकार शीतल तळपदे म्हणाले, मानधनाचा मुद्दा हा ज्याच्या त्याच्या व्यवहाराचा भाग आहे. पण कॉर्पोरेट कंपन्या आल्यामुळे काही बदल निश्चितच झाले आहेत. हे बदल स्वागतार्ह आहेत. आधी पारंपरिक नाटय़निर्माते स्वत: पैसे खर्च करून नाटक जास्तीत जास्त चांगलं कसं होईल ते बघायचे. आताही कॉर्पोरेट कंपन्या त्यांची नाटकं दृश्यात्मकरीत्या कशी परिणामकारक होतील, याचा विचार करतात.पारंपरिक निर्मात्यांकडे नाटकाची प्रसिद्धी करण्यासाठी माध्यमे कमी होती. तर कॉर्पोरेट कंपन्यांकडे जाहिरातीचं दूरचित्रवाणीसारखं प्रभावी माध्यम असल्यामुळे ते नाटकाच्या निर्मितीत कुठलाही धोका पत्करण्यास तयार असतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

कॉर्पोरेट कंपनीची निर्मिती नसतानाही वन्स मोअर, संगीत देवबाभळी, अनन्या, डोन्ट वरी बी हॅप्पी, अमर फोटो स्टुडियो, एपिक गडबड, आमच्या हिचं प्रकरण यासारखी नाटकं आणि नुकतीच रंगभूमीवर आलेली खळी, दादा एक गूड न्यूज आहे, ऑपरेशन जटायू, व्हाय सो गंभीर ही नाटकंही प्रेक्षकांना आकर्षित करतायेत.

याविषयी दीडशेहून अधिक नाटकांसाठी नेपथ्य करणारे ज्येष्ठ नेपथ्यकार प्रदीप मुळये म्हणाले की चांगल्या नाटकांना प्रेक्षक येतोच हे तर त्रिकालबाधित सत्य आहे. इतर क्षेत्रातील निर्मिती संस्थांच्या येण्याने पारंपरिक निर्मातेही सजग झाले आहेत, ही मोठी गोष्ट आहे. विषयांच्या निवडीला प्राधान्य, नवे दिग्दर्शक, नवे निर्माते आणि कलाकार, तंत्रज्ञ यांच्यामुळे नाटय़सृष्टीला हा बदल फायद्याचा ठरतो आहे. अर्थात, जाहिरातीमुळे नाटकांचा प्रेक्षक वाढला असला तरी हा मुळातला नाटकाचा प्रेक्षक नाही. तो अधिकाधिक नाटकं पुढे पाहू लागला आणि टिकला तर त्याला नाटकाचा प्रेक्षक म्हणता येईल, याकडेही प्रदीप मुळये यांनी लक्ष वेधले.

कॉर्पोरेट कंपन्या नाटय़व्यवसायात आल्याने मराठी रंगभूमीवर आर्थिकदृष्टय़ा चांगले बदल होतील, परंतु त्या कॉर्पोरेट निर्मात्यांचा रंगभूमीकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, त्यावर ते अवलंबून आहे. त्यांच्या निर्मितीचा तामझाम बघता तंत्रज्ञांनी त्यांना कराव्या लागणाऱ्या कामानुसार मानधन जरूर वाढवून मागितले पाहिजे, असं मत या क्षेत्रातील जाणकार व्यक्तीने व्यक्त केले. नाटकाचे मानधन वेळेत मिळणे, आणि निर्मात्यांशी बोलून ठरलेल्या मानधनाची पूर्ण रक्कम मिळणे, यासाठी झगडा अजूनही करावा लागतो. कदाचित कॉर्पोरेट कंपन्यांच्या स्थिरावण्यामुळे ही स्थिती बदलेल आणि सगळ्यांना पूर्ण आणि वेळेत मानधन मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

बॅकस्टेज, नेपथ्यनिर्मितीचे काम करणारे उल्हास सुर्वे मात्र म्हणतात की आधीच्या आणि आताच्या परिस्थितीमध्ये कुठलाही बदल झालेला नाही. तर नेपथ्यकार प्रकाश परब यांनी आपल्या ४० वर्षांच्या अनुभवातून सांगितलं की, पारंपरिक नाटय़निर्मातेही आमच्यासाठी झटायचे. नाटकाचा शो हाऊ सफुल्ल नसला तरी आमचे मानधन वेळेत द्यायचे. त्यांनी कधीच टाळाटाळ केली नाही. नोटाबंदीच्या काळातही त्यांनी चांगली साथ दिली. आमच्या बॅकस्टेज तंत्रज्ञांची युनियन निर्मात्यांशी बोलून मानधन ठरवते. आता हे मानधन ६६० रुपये ठरलं आहे. त्यामुळे सेट लावण्याचं काम करणाऱ्या कामगाराला आठवडय़ातून ३ ते ४ नाटकाचे सेट लावण्याचं काम मिळतं. यापेक्षा अधिक काम तो करू शकत नाही. वेळ आणि ठिकाणे वेगवेगळी असतात, पण काळानुसार मानधनात वाढ व्हायला हवी, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

चित्रपट, मालिका आणि वेबसीरिज या माध्यमांसमोर मराठी नाटक टिकले ते मराठी प्रेक्षकांच्या नाटय़रसिकतेमुळे. आता त्यात भर पडतेय जाहिरातीचं दूरचित्रवाणीसारखं माध्यम वापरणाऱ्या कॉर्पोरेट् धोरणामुळे.. त्यामुळे केवळ कॉर्पोरेट्सच्या येण्यामुळेच बदल झालेत असं म्हणता येत नसलं, तरी त्यांच्या येण्यामुळे एकूणच गोष्टी बदलल्या आहेत हेही नाकारता येणारे नाही. मराठी नाटय़क्षेत्रात इतर काही बडे समूहसुद्धा येण्याची तयारी करत आहेत. त्यांच्या येण्याने होणारे बदल सकारात्मक असावेत, रंगभूमीवर आणि नाटय़क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वासाठी ते लाभदायी ठरावेत, अशी आशा नाटय़क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केली आहे.

हक्काच्या प्रेक्षकोंमुळे..

सध्या निर्माते वेगवेगळ्या विषयांना हात घालत आहेत. आमचं एका लग्नाची पुढची गोष्ट हे नाटक व्यावसायिकरित्या खूप छान चाललं आहे. पण संगीत देवबाभळी आणि अनन्या सारखं नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आणण्याचं धाडस निर्मात्यांनी केलं. प्रेक्षकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. आता मनोरंजनाची वेगवेगळी माध्यमं आलेली असतानाही प्रेक्षक रांगेत उभं राहून नाटकाचं तिकीट काढतो. किंवा बुक माय शोवर तिकीट बुक करतो. त्यामुळे मराठी प्रेक्षकांची नाटकांची आवड किती आहे हे लक्षात येतं. नाटकाचा मराठीमध्ये स्वतंत्र प्रेक्षकवर्ग असल्यामुळे मराठी रंगभूमी समृद्ध आहे, त्यामुळेच झी, बुक माय शो सारख्या कंपन्यांना नाटकात यावं असं वाटलं. इथे त्यांना हक्काचा प्रेक्षकवर्ग मिळेल अशी खात्री वाटली तेव्हाच त्यांनी यात पाऊ ल टाकलं, असं अभिनेत्री कविता लाड—मेढेकर म्हणाल्या.