रेश्मा राईकवार, भक्ती परब

केबल नेटवर्कचा गोंधळ बरा होता की काय.. असं म्हणायची वेळ यावी इतके युद्ध सध्या टीव्हीवरच्या मालिकांपेक्षाही त्याच्या पडद्यावर झळकणाऱ्या नानाविध सूचनांमुळे सुरू आहे. टाटा स्कायची सेवा घेणाऱ्या ग्राहकांच्या टीव्हीवरून अचानक सोनी एंटरटेन्मेट समूहाच्या २२ वाहिन्या गायब झाल्या. त्या गायब होण्यामागचे कारण शोधेपर्यंत सोनी समूहाने टाटा स्कायने आपल्याला काही न सांगता अचानक वाहिन्या बंद केल्याचे सांगितले. त्यानंतर टाटा स्कायनेही सोनी समूहाने पैसे वाढवले असून अंतिमत: ग्राहकालाच याचा भरुदड सोसावा लागणार म्हणून वाहिन्या दाखवणार नसल्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. आमच्या वाहिन्या दिसत नसल्याने ग्राहकांचीच निराशा होते आहे, असा दावा सोनी वाहिनीने केला आहे. असाच प्रकार याआधी झी टीव्ही – हॅथवे, स्टार समूह – एअरटेल वादात झाला होता. वाद कोणाचाही असो, प्रत्येक वेळी परिस्थिती तीच असते आणि यात भरडला जातो तो प्रेक्षकच..

झी मराठी वाहिनीवर ‘का रे दुरावा’ ही मालिका येणार, असे प्रोमो वाहिनीवर झळकत होते. मग त्याच्या जाहिराती वृत्तपत्रांतूनही येऊ लागल्या. ही मालिका १८ ऑगस्ट २०१४  पासून सुरू झाली. याच्या जाहिरातीत मालिकेतील कलाकारांचे दृश्य आणि खाली अशी सूचना येत होती की, झी मराठीसह इतर झी समूहाच्या वाहिन्या दिसत नसतील तर तुमच्या हॅथवे केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. लोकांना त्या वेळी प्रेक्षक म्हणून आणि ग्राहक म्हणून एकाच वेळी दोन धक्के बसले होते. त्यानंतर जवळपास महिनाभर हॅथवे केबलधारकांना झी समूहाच्या सर्व वाहिन्यांना मुकावे लागले होते. आणि ग्राहकांना त्यांचे पैसेही परत मिळाले नाहीत, वाहिन्यांच्या समूहांचे आणि डीटीएच (डायरेक्ट टु होम) सेवा देणाऱ्या कंपन्यांमध्ये असे काही वाद होतात, हे प्रेक्षकांनी तेव्हा पहिल्यांदा अनुभवले. वाहिन्या आणि डीटीएच कंपन्यांमध्ये आर्थिक कारणांवरून वाद आधीही होत होते, मात्र गेल्या काही वर्षांत हे वाद तीव्र झाले असून सातत्याने या वादाची शिकार प्रेक्षकांना व्हावे लागते आहे.

हा वाद नेमका केव्हा सुरू झाला, त्यासाठी थोडे मागे जावे लागेल. २०१० ते २०११ च्या सुमारास भारताच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने कंडिंशनल अ‍ॅक्सेस सिस्टीम (कॅस) लागू करण्याचा नियम केला होता. त्यानुसार इंडियन ब्रॉडकास्टींग फाऊंडेशनने जाहिराती देण्यास सुरुवात केली. त्यात वाहिन्यांचे लोकप्रिय कलाकार सेट टॉप बॉक्स लवकरात लवकर बसवून घ्या आणि सर्व वाहिन्यांचा विनाअडथळा लाभ घ्या, अशा सूचना जाहिरातीतून देऊ लागले. तेव्हाही प्रेक्षकांचा गोंधळ उडाला होता, पण हळूहळू त्यांना कळू लागले की आपल्याला आता सेट टॉप बॉक्स बसवला पाहिजे. सेट टॉप बॉक्समुळे केबल नेवटवर्कच्या अंदाधुंद कारभारावर अंकुश लागणार होता. परिणामी प्रेक्षकांना भरमसाट रक्कम न मोजता त्यांच्या बजेट आणि आवडीनुसार वाहिन्यांची निवड करणे शक्य होणार होते. यामुळे सुरुवातीला बिथरलेले केबल व्यावसायिक पुढे कायदेशीर लढाईनंतर डीटीएच कंपन्यांशी हातमिळवणी करून स्थिरावले.

‘बार्क’च्या अहवालानुसार दर आठवडय़ात कुठली तरी वाहिनी प्रथम क्रमांकावर येते, हिंदीमध्ये तर एक वाहिनी सलग वर्षभर प्रथम क्रमांकावर असते. वाहिन्या ‘टीआरपी’च्या जोरावर ‘डीटीएच’ कंपन्यांकडून आपली किंमत वाढवून घेतात. आणि मग कंपन्यांना वाहिन्यांचे मोठय़ा रकमेचे पॅकेज बनवावे लागतात जे अंतिमत: त्यांच्या ग्राहकांच्या दृष्टीने हिताचे नसते. इंडियन ब्रॉडकास्टिंग फाऊंडेशनच्या नियमानुसार तुम्हाला ज्या वाहिन्या पाहायच्या आहेत, त्याच वाहिन्यांची तुम्ही केबल ऑपरेटरकडे मागणी करा. थोडक्यात तुमच्या आवडत्या वाहिन्यांचीच तुम्ही किंमत मोजा, इतर अनावश्यक वाहिन्यांना बाय करा. पण प्रत्यक्षात असे घडलेच नाही. कारण केबल नेटवर्क आणि ‘डीटीएच’ कंपन्यांनी १५० पासून ५०० रुपयांपर्यंत वेगवेगळी पॅकेजेस बनवून त्यानुसार वाहिन्यांची विभागणी केली. त्या त्या परिसरात कुठले भाषिक ग्राहक आहेत, कोणत्या वाहिन्या कधी लोकप्रिय आहेत, अशा सगळ्या गोष्टींचा विचार करून ही पॅकेजेस दिली जातात. त्यामुळे त्या त्या पॅकेजमध्येच ग्राहकाला आपले समाधान शोधावे लागते आहे. कमीतकमी ३५० रुपयांपर्यंतचे पॅकेज घेतल्याशिवाय नेहमीच्या हिंदी-मराठी मुख्य वाहिन्याही प्रेक्षकांना पाहता येत नाहीत. आणि त्यातही वेगवेगळ्या सेवा घेणाऱ्या ग्राहकांच्या वाटय़ाला सध्या वेगवेगळा अनुभव येतो आहे.

‘सोनी’च्याच वाहिन्यांचा विचार करताना सोनी एंटरटेन्मेटवर केबीसी सुरू असल्याने त्यांना धक्का लावण्यात आला नाही. शिवाय, वाद झाल्यानंतर तुम्ही स्वतंत्रपणे मिस कॉल द्या, असे आवाहन टाटा स्कायने केले आहे. असाच प्रकार एअरटेल आणि स्टार समूह यांच्यातील वादाच्या वेळी घडला. स्टार समूहाने आपले दर वाढवल्याची तक्रार एअरटेलने केली. तर आम्ही दर वाढवलेले नाही उलट एअरटेल हजार रुपये आकारत असून २०० रुपयांत आमच्या वाहिन्या पाहायच्या असतील तर टाटा स्काय आणि अन्य डीटीएच कंपन्यांकडे वळा, असा सल्ला स्टार समूहाने आपल्या ग्राहकांना दिला होता. अखेर आयपीएल जवळ आल्याने दोघांनीही आपापल्या पद्धतीने करार पूर्ण करत हा वाद संपवला. मात्र त्या वेळीही चिडून अनेक लोकांनी एअरटेलला निरोप देत अन्य सुविधांचा विचार सुरू केला होता.

डीटीएच कंपन्यांशी याविषयी बोलायचा प्रयत्न केला असता, आमच्यात आणि कुठल्याही वाहिनीत असे वाद सुरू नाहीत, एवढेच सांगून गप्प राहणे या कंपन्यांनी पसंत केले आहे. ‘हॅथवे’चे कार्यकारी संचालक राजन वरूनगुप्ता यांच्या मते तर टेलीव्हिजन आणि त्यांतील स्पर्धा यांच्यापासूनच आम्ही दूर गेलो आहोत. त्यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर लक्ष केंद्रित केले असून टीव्ही आणि इंटरनेट याचा एकत्रित लाभ घेण्याच्या दृष्टीने त्यांनी नवा सेट टॉप बॉक्स बाजारात आणला आहे. या बॉक्सच्या माध्यमातून लाइव्ह टीव्ही, नेहमीच्या वाहिन्या आणि ऑनलाइन ओटीटी प्लेअर्सना आम्ही एकत्रित केले आहे. आम्ही वाहिन्यांच्या समूहांशीसुद्धा चर्चा केली, ओटीटी समूहांशीही टायअप करण्यासाठी चर्चा केली आहे, असे त्यांनी सांगितले. वाहिन्यांच्या समूहातील स्पर्धा, वेबसीरिजची वाढती लोकप्रियता यामुळे प्रेक्षक कुठल्याही मनोरंजनापासून वंचित राहू नयेत, त्यांना दोन्ही माध्यमे तितक्याच सोयीने पाहता यावीत यासाठी हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. एकीकडे हॅथवेने एक पाऊल पुढे टाकले आहे तर दुसरीकडे अजून तरी डीटीएच कंपन्यांनी ओटीटी आशयाची चिंता करायची गरज नाही. अजूनही ग्रामीण आणि शहरी भागात टेलीव्हिजन पाहणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने त्यांना चांगली सेवा कशी देता येईल, यावरच भर द्यायला हवा, असे डिश टीव्हीसारख्या अन्य डीटीएच कंपन्यांचे म्हणणे आहे. या सगळ्या गोंधळात ज्या ग्राहकाच्या नावाने हा मनोरंजनाचा खेळ सुरू आहे तो मात्र अजूनही उपाशीच आहे..

*  प्रेक्षकांना त्यांच्या बजेटमध्ये वाहिन्या निवडण्याचा पर्याय आजही सहजी उपलब्ध झालेला नाही. उलट वाहिन्यांची संख्या आणि लोकप्रियता जसजशी वाढत चालली आहे, तसतसे आपल्या आवडत्या वाहिन्या एकाच पॅकेजमध्ये पाहायला मिळणेही अवघड होत चालले आहे. व्यवसाय वाढवण्याच्या दृष्टीने वाहिन्यांना आपल्या लोकप्रियतेनुसार दर वाढवणे गरजेचे होऊन बसते. तेच ‘डीटीएच’ कंपन्यांनाही प्रत्येक वेळी करार करताना या वाढीव दरानुसार वाहिन्या घेताना आपल्या नफ्या-तोटय़ाचा विचार करावा लागतो आणि त्यामुळे त्यांच्यातील करार फिस्कटतात.

*  वाहिन्यांचे समूह आणि सेवा पुरवणाऱ्या नेटवर्कमध्ये सतत वाद-विवाद होत राहतात, नवे करार होत राहतात. पण तोवर वाहिन्यांची खंडित झालेली सेवा मान्य करून त्याचा परतावा ग्राहकांना मिळत नाही. त्यांच्या वाटय़ाला फक्त सूचनाच येत राहतात. असे करा म्हणजे वाहिन्या सुरू होतील, तसे करा म्हणजे अडथळा येणार नाही. मिस कॉल द्या.. अशा हजार सूचनांनी ग्राहकांना सध्या भंडावून सोडले आहे. सोनी आणि टाटा स्काय वादातही दोन्हीकडची मंडळी एकमेकांवर चिखलफेक करण्यातच गुंतली आहेत. ग्राहकांनी आपापल्या परीने समाजमाध्यमांवर रोष व्यक्त केला असला तरी नेमके काय घडलेय हे अजूनही त्यांच्यापर्यंत पोहोचलेले नाही.