रेश्मा राईकवार

‘सिम्बा’ अधिक ‘सिंघम’ अशा दोन पोलिस व्यक्तिरेखा, गोव्याचे पोलिस स्टेशन, बाकी रोहित शेट्टी शैलीची ठायी ठायी होणारी ओळख असा सगळा घरचा, परिचयाचा मामला असला तरी रणवीर सिंगचा योग्य वापर करत मनोरंजनाची मात्रा कुठेही कमी पडणार नाही, हे ठरवून केलेला धडाकेबाज असा हा चित्रपट आहे. सर्वसाधारणपणे आपल्या चित्रपटात हिरो हा हिरोसारखाच दिसला पाहिजे, वागला पाहिजे. त्यामुळे गोष्ट कुठलीही, कशीही असली तरी सिम्बा हा हिरो आहे आणि रोहित शेट्टीच्या चित्रपटाचा हिरो आहे हे लक्षात घेतले पाहिजे. मग बाकीची कुठलीही वास्तवाशी जवळ जाणारा वगैरे असे विचार मनाच्या जवळपासही भटकू न देता चित्रपट पाहिलात तर ‘गोलमाल’ प्रमाणे ‘सिंघम’ फ्रँचाईझी पुढे नेण्याचा हा शेट्टी फॉम्र्युला हिट ठरला आहे.

सिंघम आणि सिम्बा या दोघांची तुलना इथे साहजिक आहे. कारण एक मुळातच प्रामाणिक पोलिस अधिकारी आहे आणि दुसरा पैसा कमवण्यासाठी म्हणून पोलिस अधिकारी बनला आहे. संग्राम भालेराव उर्फ सिम्बाची शिवागडहून मिरामार पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. मिरामारमध्ये दुर्वा रानडे (सोनू सूद )या स्थानिक गुंडाच्या कारभारात ढवळाढवळ करायची नाही, असा स्पष्ट आदेश घेऊन पोलिस ठाण्यात दाखल झालेला सिम्बा आपला कार्यारंभ दुर्वापासूनच करतो. त्यामुळे लगेच एक चांगला-एक वाईटवाला संघर्ष सुरू होईल तर तसे नाही. इथेच दिग्दर्शक म्हणून रोहित शेट्टीची निवड आणि मांडणी यशस्वी ठरली आहे. कारण सिम्बा हा भ्रष्ट पोलिस अधिकारी आहे, त्याची मस्ती, त्याची ताकद सगळे पैशाभोवती फिरते, तो थेट टाळ्या मिळतील, असे संवाद फेकतो. मारामारीपेक्षा काकू, आई, वहिनी सगळ्यांना पटवत, गोड बोलत कामे करून घेणारा सिम्बा म्हणून आता या घडीला तरी रणवीर सिंगशिवाय योग्य पर्याय नाही. सिंघमप्रमाणे यशस्वी मसाला द्यायचा मात्र तेच तेच पाहतोय हे सहजी वाटू नये यासाठी मुळात नायकाच्या व्यक्तिरेखेला वळण देणे गरजेचे होते ते दिग्दर्शकाने केले आहे. आणि तीच गोष्ट अभिनेता म्हणून रणवीरलाही माहिती असल्याने अजय देवगणच्या सिंघम प्रतिमेला धक्का न लावता ज्यात आपण प्रभावी आहोत त्याचा वापर करत आपली व्यक्तिरेखा ठसवणे एवढेच त्याच्या हातात होते आणि त्याने ते त्याच तडफेने केले आहे.

भ्रष्ट पोलिसाचे स्थित्यंतर होण्यासाठी तेवढीच ताकदीची महत्वाची घटना गरजेची होती. इथे ती आकृतीवर (वैदेही परशुरामी) झालेल्या बलात्काराच्या घटनेमुळे होते. देशभरात दरवर्षी वाढत चाललेल्या बलात्काराच्या घटना आणि बलात्कारींचे मोकाट सुटणे हा विषय केंद्रस्थानी घेण्यात आला आहे. अर्थात, इथे त्यावर सखोल भाष्य नाहीच, तो धागा फक्त नायकाच्या परिवर्तनासाठी वापरण्यात आला असला तरी एकूणच चित्रपटाचे वळण त्यामुळे गंभीर होते. त्याचा तोल दिग्दर्शकाने सुटू दिलेला नाही. सिम्बा या चित्रपटाला स्वतंत्र एकाच कथेपुरती मर्यादित न ठेवता फ्रँचाईझी म्हणून त्याला पुढे नेण्याच्या दृष्टीने रोहित शेट्टी यांनी या चित्रपटाची मांडणी केली असल्याने कथेत नाविन्य नसले तरी ती शेवटपर्यंत प्रेक्षकाला गुंतवून ठेवते. रणवीर सिंगबरोबर सिध्दार्थ जाधव, विजय पाटकर, नंदू माधव असे एकसे एक मराठी कलाकार आहेत. वेगवेगळ्या भूमिकेत अकरा मराठी कलाकार आणि रणवीर, सोनू सूद, सारा अली खान, मध्येमध्ये सिध्दार्थ जाधव, अगदी न्यायाधीश म्हणून समोर येणारी अश्विनी काळसेकर सगळ्यांच्याच तोंडी मराठी संवाद येत असल्याने मराठी प्रेक्षक जास्तच सुखावले तर नवल नाही. सारा अली खानचा हा दुसरा चित्रपट आहे. पहिल्याच चित्रपटात तिने आपण तोडीस तोड असल्याचे सिध्द केले होते. इथे खरे म्हटले तर दोन-चार प्रसंग आणि दोन गाणी वगळता तिला करण्यासारखे काही नाही. मात्र जेवढा वेळ ती पडद्यावर आहे तेवढय़ा वेळातला तिचा सहजवावर तेवढाच प्रभावी ठरला आहे. याशिवाय, आशुतोष राणा आणि सोनू सूद या दोघांनाही खूप दिवसांनी चांगल्या भूमिकेत पाहणे ही पर्वणी ठरली आहे. बाकी गाण्यांना फारसा अर्थ नाही. ती रणवीर सिंगसाठीच दिग्दर्शित केली गेली आहेत. या चित्रपटात गाडय़ाही फारशा उडवलेल्या नाहीत. पण शेट्टी स्टाईल मनोरंजन, जबरदस्त कलाकार असल्याने सिम्बा कंटाळवाणा होत नाही. याशिवाय, देवगण आणि सिंग समोरासमोर येतात तेव्हा काय घडते, या प्रश्नासह पुढचा चित्रपट सिंघम ३ असणार की सिम्बा २ की आणखी काही.. रोहित शेट्टीने जाता जाता उत्तराची झलक दिली आहे, बघा काय ते!

सिम्बा

कलाकार – रणवीर सिंग, सारा अली खान, सोनू सूद, सिध्दार्थ जाधव, आशुतोष राणा, वैदेही परशुरामी, नंदू माधव, अरूण नलावडे, सौरभ गोखले, सुचित्रा बांदेकर, अश्विनी काळसेकर, नेहा महाजन, उदय टिकेक र, विजय पाटकर आणि अजय देवगण.