सुहास जोशी

एखाद्या छोटय़ाशा घटनेचा जर नीट मागोवा घेतला तर अनेकदा अंतिमत: खूप मोठी अशी गुंतागुंत उलगडण्यास मदत होते. आंतरराष्ट्रीय लागेबांधे असलेल्या गुन्हेगारी कथानकात अशा गोष्टी यापूर्वी आपण रुपेरी पडद्यावर पाहिलेल्या आहेतच. त्यामुळेच असे कथानक रोमांचक आणि उत्कंठावर्धक होण्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागते. त्यावरच कथानकाचे यश अवलंबून असते. ‘द नाइट मॅनेजर’ या मिनीसीरिजमध्ये हे यश काही प्रमाणात मर्यादित असले तरी ती पाहावी अशी नक्कीच आहे. मुळातच ती मर्यादित भागांची असल्यामुळे कथानक उगाच ताणण्याचा प्रयत्न येथे होत नाही हा त्यातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणता येईल.

ही गोष्ट आहे हॉटेलमध्ये रात्रपाळीचे काम पाहणाऱ्या व्यवस्थापकाची. त्याने आजवर ज्या ज्या हॉटेलमध्ये नोकरी केली आहे, त्या सर्व ठिकाणी तो ठरवून रात्रपाळीचे काम घेत असे. मात्र इजिप्तमधील एका हॉटेलमध्ये असताना शस्त्रांच्या बेकायदेशीर विक्री संदर्भातील काही कागदपत्रे त्याच्या हाती लागतात. ती कागदपत्रे तो संबंधितांपर्यंत पोहोचवतो. मात्र ती कागदपत्रे त्याला ज्या महिलेने दिलेली असतात तिचा जीव मात्र तो वाचवू शकत नाही. काही कालावधीनंतर तो जेव्हा स्वित्झर्लंडमधील हॉटेलमध्ये काम करत असतो तेव्हा नेमका त्या शस्त्रांच्या व्यवहारासंबंधातील मुख्य व्यक्ती तेथे येते. आणि हा नाइट मॅनेजर पुन्हा सतर्क होतो. या वेळी त्याची ही सतर्कता केवळ माहिती पुरवण्याइतपतच मर्यादित राहत नाही. तर तो त्यापलीकडे जातो. मात्र त्याच वेळी या शस्त्रांच्या व्यवहारात अनेक लोक सामील असतात. आणि त्याचा संबंध थेट राष्ट्रहितासाठी वगैरे म्हणूनदेखील केला जात असतो. परिणामी नाइट मॅनेजरचं आयुष्य पूर्णत: बदलतं आणि सतत धोक्याच्या सावटाखालीच राहू लागतं.

एखाद्या चित्रपटाचं कथानक त्यामध्ये आणखीन बारकावे मांडून सादर करावं तसं ही लघुमालिका सादर केलेली आहे. पण त्यात पाणी घालून ती कथा वाढवत राहणं हा प्रकार यात अजिबात केलेला नाही ही सर्वात जमेची बाजू. साधारणपणे अशा कथांमध्ये जो एक ठरावीक साचा असतो, तो यामध्ये दिसत नाही. त्यात अनेक चांगले बदल केले आहेत. उगाचच नायक सर्व कलागुणसंपन्न असल्याचं दाखवून, सर्व घटना केवळ त्याला पूरकच राहतील अशी रचना येथे नाही. तुलनेने किमान नाटकीयता, मात्र उत्सुकता टिकवून ठेवणे असाच ढाचा येथे आहे. त्याचबरोबर एखाद्या प्रशिक्षित गुप्तचराची टिपिकल मांडणीदेखील येथे नाही. जे काही आहे ते स्वत:च्या अंत:प्रेरणेचा भाग म्हणून घडत जाते.

अर्थात अशा अनेक जमेच्या बाजू असल्या तरी काही गोष्टी मात्र लगेचच खटकत राहतात. एक यशस्वी असा शेतकी उत्पादनांचा विक्रेता हा त्या व्यापाराच्या आडून शस्त्रांचा आंतरराष्ट्रीय व्यापार करणारा गुन्हेगार असतो. तो इतक्या खुलेआम हे सर्व करत असतो तरी त्या संपूर्ण घटनांमध्ये कोणत्याच गुप्तचरांना काहीच सुगावा लागत नसतो. इतकेच नाही तर मध्यपूर्वेतल्या मातीत मिसळून जाईल इतकी अमेरिकी यंत्रणा तेथे कार्यरत असताना त्यांना यातलं काहीच कळत नसतं. आणि कळत असूनही दुर्लक्ष केले जात असेल तर ते दोन्हीकडच्या घरभेद्यांमुळेच असणार हे नक्की. असे घरभेदी अगदीच मोजके दाखवले आहेत. तुलनेने शस्त्रांचा बेकायदेशीर व्यापार हा त्यामानाने कैकपटीने अधिक होताना दिसतो. त्याच वेळी हा शस्त्र व्यापारी एखाद्या नवख्या इसमाला इतक्या जवळ येऊ  देतो की एखाद्या टिपिकल बॉलीवूडी चित्रपटातील कथाच आपण पाहत असल्याचे कधी कधी वाटू लागते. मर्यादित प्रमाणात का होईना पण येथे कर्मधर्मसंयोगाच्या घटना घडतातच. हे असे कर्मधर्मसंयोग टाळता आले तर बरे झाले असते.

बाकी तांत्रिक बाबतीत मालिका उत्तमच आहे. अभिनयात जेवढं काही करता येईल तेवढं सर्वानी उत्तम वठवलं आहे. अर्थात त्यापलीकडे काही दाखवायला कलाकारांना फारसा वावदेखील नाही. मर्यादित कथानकात, पन्नास मिनिटे, तासभराच्या सहा भागांत सारी गोष्ट संपून जाते हेच याचे वैशिष्टय़. त्यामुळेच दोन घटका करमणूक म्हणून पाहायला हरकत नाही.

द नाइट मॅनेजर

ऑनलाइन अ‍ॅप अ‍ॅमेझॉन प्राइम

सीझन पहिला