News Flash

रणबीरच्या प्रेमात!

रणबीर कपूर आणि त्याच्या प्रेमकथा यांच्या चर्चा वारंवार उफाळून येत असतात.

(संग्रहित छायाचित्र)

रणबीर कपूर आणि त्याच्या प्रेमकथा यांच्या चर्चा वारंवार उफाळून येत असतात. रुपेरी पडद्यावर तब्येतीने आपले चित्रपट करणारा रणबीर कपूर गेली दीड-दोन वर्षे तरी पडद्यावर दिसलेला नाही. त्यामुळे माध्यमांपासून दूर असलेल्या रणबीरबद्दल लोकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. अर्थात, सध्या ‘ब्रह्मास्त्र’ वगळता त्याच्या इतर चित्रपटांची फारशी माहिती मिळत नसल्याने मग गाडी रणबीर आणि आलिया भट्टच्या लग्नाच्या विषयावरच वळते. या दोघांचे लग्न अमुक एका महिन्यात होणार आहे, मग काही दिवसांनी अमुक एका डेस्टिनेशनला होणार आहे, अशा चर्चाना एकच ऊत आला होता. अगदी आलियाला पुरस्कार मिळाल्यानंतरही तिला तिच्या यशाविषयी न विचारता लग्नाबद्दल विचारलं गेलं आणि तिची सटकली. तिने सगळ्यांचा चांगलाच समाचार घेतला. लग्न सोडून रणबीर आणि आपण इतर अनेक गोष्टी करतो आहोत आणि त्याबद्दल खरंतर लोकांनी बोलायला हवं, अशा अर्थाचे खडे बोलही तिने सुनावले. अर्थात, हे प्रेमपुराण सांगण्याचे कारण म्हणजे एकटी आलियाच रणबीरच्या प्रेमात आहे, असे नाही. तर सध्या आणखी एक व्यक्ती आहे जी रणबीरवरच्या या प्रेमाबद्दल जाहीरपणे बोलते आहे. आणि ती व्यक्ती आहे अभिनयाचा बेताज बादशाह अमिताभ बच्चन. अमिताभ बच्चन आणि रणबीर कपूर हे दोघेही सध्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचे मुंबईत चित्रीकरण करत आहेत. या चित्रपटात गुरु-शिष्यांची भूमिका साकारताना हे दोघे दिसणार आहेत. आणि गुरु-शिष्यांच्या नात्यातले काही महत्त्वाचे प्रसंग सध्या चित्रित होत असल्याने सेटवर हे दोघेच आहेत. आलिया उशिराने चित्रीकरणात सहभागी होणार आहे. पहाटेपासूनच दृश्यांची तालीम, मग प्रत्यक्ष चित्रीकरण अशा लांबलचक प्रक्रियेतही इतक्या उत्स्फूर्ततने, हुशारीने सहभागी होणाऱ्या रणबीरकडे पाहून अमिताभ यांनी लहानग्या रणबीरचे ‘अजूबा’च्या सेटवरचे एक छायाचित्र समाजमाध्यमांवर पोस्ट केले आहे. आजोबा शशी कपूर यांच्याबरोबर सेटवर आलेला, मोठाल्या डोळ्यांनी आपल्याकडे पाहणारा लहानगा रणबीर कुठे आणि आता या सेटवर त्यांच्याबरोबरीने अभिनय करणारा रणबीर या त्याच्या दोन्ही रूपांबद्दल कौतुकच वाटत असल्याचे अमिताभ यांनी म्हटले आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात रणबीर, आलिया आणि अमिताभ हे तिघेही प्रमुख भूमिकेत आहेत. या तिघांबरोबरच नागार्जुन, मौनी रॉय आणि डिंपल कपाडिया यांच्याही यात महत्त्वाच्या भूमिका असून शाहरुख खानही पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. हे ‘ब्रह्मास्त्र’ यावर्षी तरी चित्रपटगृहांवर पडेल म्हणजे प्रदर्शित होईल, अशी आशा आहे.

शाहरूख आणि दुसरा व्यवसाय

अतिशय महत्त्वाकांक्षा ठेवून केलेल्या ‘झीरो’ चित्रपटाने तिकीटबारीवर झिरो कामगिरी केली आणि सुपरस्टार म्हणून बिरुद मिरवणाऱ्या शाहरुख खानच्या पोटात चांगलाच गोळा आला. खरं तर, आपली रुळलेली यशराजी वाट सोडून नवं काही करण्याच्या प्रयत्नात असलेल्या शाहरुख खानला गेली काही वर्षे सातत्याने अपयशालाचा सामोरं जावं लागलं आहे. इम्तियाज अली, राहुल ढोलकिया, आनंद एल. राय यांच्यासारखे नावाजलेले दिग्दर्शकही शाहरुखला वेगळ्या अवतारात प्रेक्षकांसमोर आणण्यात अपयशी ठरले. त्यामुळे नेमकं काय करायचं? सलमान खानने जसं प्रभुदेवाला पकडलं आहे, तसं आपणही रोहित शेट्टीचा हात धरून ठेवावा की आपले चित्रपटांचे प्रयोग सुरू ठेवावेत, या गोंधळात असलेल्या शाहरुख खानने वर्षभर तरी हिंदी चित्रपटांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. गेले वर्षभर त्याने कुटुंबीयांना आणि खास करून मुलांना वेळ द्यायचा आहे म्हणून कोणताही नवीन चित्रपट साईन केलेला नाही. चित्रपट नाही त्यामुळे साहजिकच शाहरुखही माध्यमांपासून लांबच आहे. मात्र गेल्या आठवडय़ात शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी दोघेही एका कार्यक्रमाच्या निमित्ताने माध्यमांसमोर आले होते. गौरी खानच्या डिझायनर ब्रॅण्डच्या एका कार्यक्रमाला शाहरुखने हजेरी लावली होती. यानिमित्ताने, शाहरुख खानलाही डिझाईनिंगमध्ये रस आहे का, असा प्रश्न गौरीला विचारण्यात आला. त्यावर शाहरुखचा डिझाईनिंगचा खूप चांगला अभ्यास आहे, त्याला डिझाईनिंगची दृष्टीही आहे, असं सांगतानाच सध्या ‘मन्नत’च्या इंटेरिअर डिझाईनिंगमध्ये शाहरुखच्याच सल्ल्यानुसार बदल केले जात असल्याची माहिती तिने दिली. या सगळ्याची माहिती देऊनच ती थांबली नाही, तर शाहरुखची गंमत करण्याचा मोहही तिला यावेळी आवरता आला नाही. त्यामुळे गेले वर्षभर नाही तरी शाहरुख चित्रपटांपासून दूरच आहे, तर त्याने डिझाईनिंगच्या व्यवसायाकडे दुसरे करिअर म्हणून पाहण्यास काही हरकत नाही, असा सल्लाही आपण त्याला दिला असल्याचे तिने उघड केले. अर्थात, शाहरुख या दुसऱ्या व्यवसायात रस घेवो वा न घेवो.. तो आता कुठल्या चित्रपटात दिसणार, हाच त्याच्या चाहत्यांसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे. ‘स्त्री’, ‘गो गोवा गॉन’ आणि ‘शोर इन द सिटी’ सारख्या चित्रपटांमागचं डोकं असलेली दिग्दर्शक द्वयी राज निदिमोरु आणि कृष्णा डीके यांच्या नव्या अ‍ॅक्शन-कॉमेडी-थ्रिलर अशा मिक्स मसाला चित्रपटासाठी शाहरुखने होकार दिल्याचे कळते आहे. मात्र अजून तरी शाहरुखने अशी कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2020 3:23 am

Web Title: article on amitabh bachchan in love with ranbir abn 97
Next Stories
1 नाट्यरंग : ‘भूमिकन्या सीता’ शोषितेचं आक्रंदन
2 चित्ररंजन : अस्सल मातीतला चित्रपट
3 टेलिचॅट : मालिकांच्या ऋणात..
Just Now!
X