लहान मुलांची दिखाऊ उपस्थिती, नियोजनाचा अभाव, पशाची चणचण आणि रटाळ, निष्फळ चर्चा यांमुळे सोलापूूरच्या पहिल्या बालनाटय़ संमेलनाचा पोरखेळ झाला़, असे म्हणावे लागेल. घरी एखादा पाहुणा आला की लहान मुलांना ‘नकला करून दाखव पिंटू’ अशी फर्माईश घरातली मोठी माणसे नेहमीच करतात.. सोलापूरचे पहिलेवहिले बालनाटय़ संमेलन बरेचसे याच धर्तीवर झाले. मुलांनी स्टेजवर जाऊन ठरवलेला नाच सादर केला, गाणी म्हटली की त्यांचे काम संपले. संमेलनावर राज्य गाजवले ते मोठय़ांनीच. मुलं शोभिवंत वस्तू म्हणून मांडली गेली.
खरे म्हणजे बालरंगभूमीशी संबंधित अनेक प्रश्न या पहिल्या संमेलनात ऐरणीवर येतील, बालरंगभूमीच्या पुढच्या वाटचालीसाठी योग्य आणि पोषक पर्यावरण कसे तयार करता येईल? याचे प्रारूप संमेलनात मांडले जाईल अशी अपेक्षा होती, ती अर्थातच फोल ठरली.
साठ-सत्तर वर्षांपूर्वी थोर दिग्दर्शक पाश्र्वनाथ आळतेकर यांनी किशोरवयीन मुला-मुलींसाठी नाटय़ वर्ग सुरू केले होते. ही परंपरा सुधा करमरकर, रत्नाकर मतकरी, सुलभा देशपांडे यांनी १९६०-७० च्या दशकांत समर्थपणे पुढे नेली. विजया मेहता यांनी ‘रंगायन’तर्फे रत्नाकर मतकरी यांचे ‘निम्मा शिम्मा राक्षस’ हे लहान मुलांचे नाटक सादर करून त्या काळात पु. शि. रेगे, मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष आणि श्री. पु. भागवत अशा दिग्गजांची वाहवा मिळवली होती असे बुजुर्ग रंगकर्मी आवर्जून सांगतात. बाल रंगभूमीने भक्ति बर्वे, मीना सुखटणकर, दिलीप प्रभावळकर असे गुणी कलावंत मराठी रंगभूमीला दिले. ‘चंद्रशाला’चे ‘दुर्गा झाली गौरी’ हे नाटक तर आजही रसिकांच्या स्मरणात आहे. अशा प्रदीर्घ आणि समृद्ध परंपरेचा मागमूसही सोलापूरच्या बालनाटय़ संमेलनात दिसला नाही हे दुर्दैव.
मुळात संमेलनाच्या नियोजनातच ढिसाळपणा दिसून आला. दोन दिवसांचे कार्यक्रम तीन वेगवेगळ्या ठिकाणी सादर करण्यात आल्यामुळे कुठेही सुसूत्रता नव्हती. मुख्य मंडपात चर्चा-परिसंवाद झडत होते. शिवाय, सत्कार सोहळेही अधूनमधून सुरू होते ते आणखी वेगळे. कार्यक्रम दोन दोन-तीन तीन तास लांबत होते आणि त्याचा फटका कोवळ्या वयाच्या बालकांना पडत होता. लहान मुलांना तासन्तास खोळंबून ठेवण्यात येत होतं. मुलांचे कार्यक्रम तिसऱ्याच सभामंडपात ठेवण्यात संयोजकांनी काय शहाणपणा दाखवला ते त्यांचे त्यांनाच ठाऊक. याचा परिणाम असा झाला की पालक आणि शिक्षक मंडळी सोडली तर मुलांच्या कलागुणदर्शन कार्यक्रमांना विशेष उपस्थिती नव्हती. परिसंवादातच अडकून पडल्यामुळे संमेलनाध्यक्ष कांचन सोनटक्के, ‘अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदे’चे अध्यक्ष मोहन जोशी, मराठी नाटय़ संमेलनाच्या विद्यमान अध्यक्ष फैयाझ शेख अशा दिग्गजांना लहान मुलांच्या कार्यक्रमांना हजेरी लावणं जरा जडच गेलं.
नाटय़ निर्मात्या लता नार्वेकर यांनी आपल्या भाषणात हाच मुद्दा मांडला. बालरंगभूमीच्या पुढील वाटचालीसाठी चांगला प्रेक्षक तयार करण्याची गरज आहे असं सांगून त्या म्हणाल्या, ‘‘आपण हे सगळं लहान मुलांसाठी करतो आहोत. परंतु सभागृहात बालकांची उपस्थिती अत्यल्प आहे. ही परिस्थिती काही चांगली नाही. उत्तम प्रेक्षक तयार करणं ही आपली पहिली जबाबदारी आहे,’’ असं लता नार्वेकर यांनी ठासून सांगितलं. उद्घाटनाच्या दिवशी ‘बालनाटय़ िदडी’ सकाळी तब्बल दीड तास उशिरा सुरू झाली. पुढचा गोंधळ तर आणखीनच ‘थोर’ होता. उद्घाटन समारंभात सादर करावयाचं स्वागतनृत्य उद्घाटनानंतर चार तासांनी पार पडलं. तोपर्यंत लहान नर्तक मुली (एकूण संख्या चाळीस) िवगेत जांभया देत बसल्या होत्या. मुलांच्या कोवळ्या संवेदनांचा असा चुराडा व्हावा हे उपस्थित रसिकांना आणि बालकलाकारांच्या पालकांना निश्चितच पसंत पडलं नाही.
सोलापूरच्या राजकीय नेत्यांनी तर बालसंमेलनाकडे पूर्णपणे पाठ फिरवून आपल्या संवेदनशून्यतेचं जाहीर प्रदर्शनच केलं. खरं म्हणजे निमंत्रणावर सोलापूरचे ‘हेवी वेट’ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार िशदे यांचं प्रमुख पाहुणे म्हणून नाव छापलं होतं. परंतु साहित्यप्रेमी, कलासक्त वगरे वगरे अशी सार्वजनिक प्रतिमा मिरवणारे िशदे संमेलनाकडे चुकूनही फिरकले नाहीत. ते एका खासगी समारंभासाठी गोव्याला गेले होते, असं नंतर समजलं. त्यांच्या कन्या आणि सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे या संमेलनाच्या स्वागताध्यक्ष.. त्याही कुठे दिसल्या नाहीत. सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुखसुद्धा दोन दिवस अनुपस्थित होते, तर सोलापूरच्या एकूण अकरांपकी फक्त दोनच आमदार मंडपात दिसले. काँग्रेस-भाजपमधल्या धुसफुशीचे सावट संमेलनावर पडलं आहे, असं काही स्थानिकांनी सांगितलं.
‘बालरंगभूमी काल, आज, उद्या’असं भंपक शीर्षक असलेल्या परिसंवादात सबगोलकारी चर्चा झाली यातच सगळं आलं. परंतु हे सांगितल्यावर हेही नमूद केलं पाहिजे की, दहा हजार मुलांना व एक हजार शिक्षकांना एकत्र आणणं ही प्रशंसनीय गोष्ट आहे. आणि कायम स्मरणात राहील ती ‘बाल कलावंत रजनी’,’ दीडशे बाल कलाकारांचं तबलावादन’, ‘ड्रामेबाज’ आंतरराष्ट्रीय बोलक्या बाहुल्यांचा कार्यक्रम संस्मरणीय झाला. दोन दिवस लहानग्यांची ऊर्जा आणि उत्कटता पाहून ‘लहानपण दे गा देवा’ असंच म्हणावंसं वाटलं असलं तरी या लहानग्यांसाठी संमेलन भरवणाऱ्या मोठय़ांना मात्र ‘शहाणपण देगा देवा..’ अशीच प्रार्थना करावी लागणार आहे.