पाच महिन्यांच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर मालिका सुरू झाल्यावर सुरक्षेची काळजी घेत गेले पाच महिने कलाकार आणि तंत्रज्ञ सेटवरच तळ ठोकून आहेत. संपूर्ण दिवस सेटवरच व्यतीत होत असल्याने तेच त्यांचे आता दुसरे घर बनले आहे तर सहकालाकार कुटुंबीय.

या दुसऱ्या कुटुंबीयांसोबतही कलाकार आणि तंत्रज्ञांनी धूमधडाक्यात दिवाळी साजरी केली आहे. काही मालिकांचे चित्रीकरण दिवाळी सुरू होण्याआधीच जास्त भाग चित्रित करून घेण्यात आले. त्यामुळे इतक्या दिवसांनंतर सेटवरची दिवाळी साजरी करून घरच्यांबरोबर दिवाळी साजरी करण्यासाठी काही कलाकारांना सुट्टी मिळाली आहे. तर काही मालिका अगदी नव्याने सुरू झाल्या असल्याने त्यांना मात्र सेटवरच दिवाळीची मजा लुटावी लागते आहे.

दिवाळीचा हा आनंदाचा सण कुठेही साजरा करत असलो तरी त्याचा गोडवा सगळ्यांपर्यंत पोहोचतोच. इथे तर घराघरात दडून बसलेल्या कलाकारांच्या चाहत्यांची दिवाळीही मालिकांमधला हा आनंद पाहून द्विगुणित झाल्याशिवाय राहत नाही. ‘कारभारी लय भारी’, ‘सहकुटुंब सहपरिवार’, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’, ‘रंग माझा वेगळा’, ‘कॉमेडी बिमेडी’, ‘जीव झाला येडापिसा’, ‘सुंदरा मनामध्ये भरली’, ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकांतील कलाकारांनी सेटवरच दिवाळी साजरी केली.