News Flash

‘बाई’ रेखाटताना

आपल्या कलेतून ‘ती’चे वेगवेगळे पदर निर्भीडपणे दाखवत बुरसटलेल्या समाजव्यवस्थेला छेद देणाऱ्या कलावंतांशी संवाद..

(संग्रहित छायाचित्र)

नीलेश अडसूळ 

इथे ‘स्त्री’ हा शब्द वापरणे सोपेच आहे, पण ‘बाई’ असा उल्लेख जाणीवपूर्वक केला आहे. कारण अजूनही त्या शब्दाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदललेला नाही. ‘स्त्री’ या शब्दातून आपण प्रस्थापित उदात्तीकरण साधले असले तरी परिस्थिती, भावना आणि वेदना एकच आहेत. आजही नजर आजूबाजूला फिरवली तर लक्षात येईल, ‘बाई’चा संघर्ष अजून थांबलेलाच नाही. आजही तिला ‘मोकळ्या श्वासा’साठी झगडावे लागते आहे. हीच महिलादिनी खेदाची बाब. म्हणूनच आपल्या कलेतून ‘ती’चे वेगवेगळे पदर निर्भीडपणे दाखवत बुरसटलेल्या समाजव्यवस्थेला छेद देणाऱ्या कलावंतांशी संवाद..

समाजाचे डोळे उघडण्यासाठी ते लिहिते, बोलते झाले, सादरकर्ते झाले. ‘परिवर्तन’ ही मनीषा उराशी बाळगून त्यांनी नाटक केले, चित्रपट केले, मालिका केल्या. केवळ सादर करून ते थांबले नाहीत तर पुरोगामी विचारांची रुजुवात आणि गती धावत्या जगासोबत कायम ठेवली. अशाच काही कलावंतांच्या मनातली आणि विचारांतली ‘बाई’ शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न. स्त्री विश्वाचे निरनिराळे पदर उलगडण्याचे काम इथल्या साहित्यिकांनी आणि कलाकारांनी केले आहे. काळाच्या पुढच्या स्त्रियाही याच माध्यमातून लोकांसमोर आल्या. इथे दोन टोके पाहायला मिळतात, एक शोषणकर्त्यांचे आणि एक त्या विरुद्ध लढा देणाऱ्यांचे. त्यामुळे काळाच्या पुढचा विचार मांडणाऱ्यांना त्या त्या काळात विरोधही पत्करावा लागला आहे. तरीही ‘बाई’ जाणून घेणे आणि उलगडणे थांबले नाही. विशेष म्हणजे यात पुरुषांनीही योगदान दिले. ‘बाई’चे अंतर्मन चितारणे हा एक प्रकारचा लढाच आहे, जो गेली कित्येक वर्ष सातत्याने सुरू आहे. बदल किती झाला, कसा झाला याच्या मोजमापाचे परिमाण आपल्या हाती नाही, पण बदल घडवण्याची उमेद इथल्या प्रत्येक विचारी, विवेकी आणि सर्जनशील माणसांमध्ये आहे आणि ती वाढतेच आहे.

‘प्रेक्षकांना विचारांपर्यंत आणण्याची प्रक्रिया’

एखाद्या कलाकृतीतून थेट परिवर्तन कोणत्याही कलाकाराला किंवा लेखकाला अपेक्षित नसते. पण आपली कलाकृती पाहून लोकांना विचार करायला भाग पाडणे हे मात्र उद्दिष्ट असते. एकापर्यंत जरी विचार पोहोचला तरी तो पुढे पोहोचवत जातो. असेच विचार पोहोचवणारे मी साकारलेले नाटक म्हणजे ‘चारचौघी’. या अशा चारचौघी होत्या ज्या चार चौघींच्या पलीकडचा विचार करायला लावणाऱ्या होत्या. आई आणि तीन मुली. त्यातही प्रत्येकीच्या मागे एक वेगळी गोष्ट जी चौकटीबाहेर डोकावू पाहते. त्यातही तिसरी मुलगी विनी, जे पात्र मी साकारत होते. ती एकाच वेळी दोन पुरुषांशी लग्न करायचे ठरवते. हा तिचा निर्णय ऐकून त्या वेळी नाटय़गृहात लोक अचंबा व्यक्त करायचे. काहींचा विरोधही असायचा पण काही लोक मात्र ‘आम्हालाही असं वाटतं’ हे  नाटकानंतर येऊन सांगयचे. काळाच्या पुढचा विचार स्वीकारायला वेळ लागतो, पण आपण जर ते धाडस केले तर लोकही करतात. अशा कलाकृती जेव्हा पाहतो तेव्हा आपणच आपली नाती, कुटुंबव्यवस्था पडताळून पाहायची असते. त्या त्या काळातील स्त्रियांचे प्रश्न आणि स्थित्यंतरे नाटकाने मांडली आहेत. त्यातही ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही प्रवाहांच्या व्यथा वेगळ्या आहेत. आजच्या महिला दिनाचा विचार केला तर पुरुषांनी नाही तर स्त्रियांनीही मानसिकता बदलणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी स्त्रियाच स्त्रियांच्या प्रगतीला विरोध करतात. तर कुठे स्त्रिया मिळालेल्या स्वातंत्र्याचे अवडंबर माजवतात. आपल्याकडे बदल नक्कीच घडतो आहे पण तो पूर्णत्वास येत नाही.

प्रतीक्षा लोणकर, अभिनेत्री

‘भूमिकांनी धाडस दिलं’

माझ्या पहिल्या भूमिकेपासून ते आजपर्यंत मला बऱ्याच चाकोरीबाहेरच्या भूमिका करता आल्या. ‘मुक्ता’ चित्रपटातील ‘मुक्ता’, ‘दोघी’मधली ‘कृष्णा’ किंवा वडिलांच्या स्वार्थामुळे राखीव जागा असल्याने निवडणुकीला उभी राहणारी, पण नंतर स्वत:च्या विचारांनी काम करणारी ‘घराबाहेर’मधील तरुणी. या प्रत्येकीने मला हिम्मत दिली आहे. आताचेच उदाहरण म्हणजे ‘देऊळ’. ग्रामीण चित्रपट असला तरी त्यातली वहिनी स्वत:साठी जगणारी आहे. नवरा गावातील पुढारी असला तरी ती नवऱ्याला वाहून घेणारी नाही. म्हणून नवऱ्याला ओवाळण्यापेक्षा ती तिच्या कामाला प्राधान्य देते. दैनंदिन आयुष्यात या भूमिकाच मला साथ देतात. प्रश्न विचारण्याची, आक्षेप नोंदवण्याची ताकद मला ‘दोघी’मधल्या कृष्णाने दिली. जेव्हा कुटुंबातील चार व्यक्ती एकच विचार मांडतात तेव्हा त्याला दुजोरा देण्याऐवजी जर चूक असेल तर त्याविषयी बोलले पाहिजे. ‘कच्चा लिंबू’मधील नायिका शैला काटदरे ही ८० च्या दशकातील असली तरी वैयक्तिक स्वातंत्र्याविषयी तिला असलेले आत्मभान अधोरेखित करणारे आहे. कमी समज असलेल्या विशेष मुलाचे संगोपन करताना तिच्या आयुष्यापुढचे प्रश्न ती ओळखते, मांडते आणि सुखासाठी भांडतेही. अशा धाडसी स्त्रिया भूमिकांमधून माझ्या वाटय़ाला आल्या. भावनिक समज देऊन जाणारी ‘गुलाबजाम’मधील राधा आगरकरही मला गवसली. काळाच्या पुढचा विचार करताना साकारलेल्या भूमिका जगण्याचे धाडस देऊन जातात.

सोनाली कुलकर्णी, अभिनेत्री

‘विचार घरातून बदलायला हवे..’

एखाद्या व्यक्तीकडे बाई किंवा पुरुष या भेदाने पाहणेच मला गैर वाटते. माझ्या आई-वडिलांनी कधीही हा भेद माझ्या बाबतीत केला नाही. सातच्या आत घरात, अमुक-तमुक करायला हवे किंवा मुलगी म्हणून कसलीही बंधने माझ्या वाटय़ाला आली नाहीत. त्यामुळे महिलांच्या प्रश्नांबाबत काही काळ मी अनभिज्ञ होते. पण नंतर त्याची तीव्रता आणि विविध स्तरांतील महिलांचे वेगवेगळे प्रश्न मला कळत गेले. ज्या दिवशी मी दिग्दर्शक म्हणून उभी राहिले त्या वेळी मी ‘दिग्दर्शक’ आहे एवढीच संकल्पना माझ्या डोक्यात होती. ‘महिला दिग्दर्शक’ अशा शब्दांचा मी विचारही केला नाही. महिला दिनाचे उदात्तीकरण करण्यापेक्षा महिलांना समानतेची वागणूक कशी देता येईल याचा विचार व्हायला हवा. प्रथम ती कुटुंबातून मिळायला हवी, जेणेकरून ‘मुलगी म्हणजे काही तरी वेगळे’ हे समीकरण तयार होणार नाही. ‘स्त्रियांनी लिहिलेल्या स्त्रियांच्या कथा’ अशी संकल्पना घेऊन १९९६ला मंगेश कदम माझ्याकडे आला होता. तेव्हा मी त्याला हेच सांगितले होते की, सोशिक, त्रासलेल्या, स्त्रियांच्या रडारड कथा मी साकारणार नाही. याऐवजी ‘ती’ किती समर्थपणे जगू शकते याची कथा मी मांडेन आणि ते करून दाखवले. पुढे ‘प्रपंच’ मालिकेतही मी तेच केले. घरातली मोठी बाई चुलीपुढे रांधण्याऐवजी ती समाजसेवेत कशी वाहून गेली आहे हे लोकांपुढे आणले. त्या कुटुंबात अनेक स्त्रिया होत्या, पण स्वत:चे अस्तित्व शाबूत ठेवून त्या जगत होत्या, हा विचार या मालिकेने दिला जो आजही महत्त्वाचा वाटतो.

प्रतिमा कुलकर्णी, दिग्दर्शिका

‘बाईचे अस्तित्व अधोरेखित करताना..’

माझ्या लेखणीतून ‘बाई’ उलगडताना त्या कधीच साहाय्यक व्यक्तिरेखेत किंवा सपोर्टिव्ह काही तरी हवे म्हणून येत नाहीत. त्या प्रत्येक पात्राला तिचे अस्तित्व, तिचे विचार असतातच. त्या तिथे असण्यामागे त्यांचा स्वतंत्र प्रवास असतो, मग ते नाटक असो किंवा कथा. आपल्याकडे बऱ्याचदा असे होते की, बाईपणापुढे आपण नाना विशेषणे लावतो. बाई म्हणजे आई, बहीण, माया, दया वगैरे. पण या पलीकडे स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची बाई दाखवण्याचा माझा प्रयत्न असतो. तिला आपण उगाच चौकटीत बांधतो. ‘आम्ही स्त्रीप्रधान चित्रपट करत आहोत त्यामुळे तुम्ही तो लिहाल का’ हल्ली अशीही विचारणा वारंवार होते, ज्याला माझा साफ नकार असतो. कारण स्त्रीप्रधान चित्रपट असे लेबल असले तरी त्यात त्या बाईची प्रतिमा सीमित केलेली असते. पुरुष पात्रांच्या बाबतीत असलेली व्यामिश्रता, खोली स्त्री पात्रांबाबत दाखवली जात नाही. पण जेव्हा मी लिहिले तेव्हा, स्त्री पात्रांनाही तितकी खोली आणि अस्तित्व देते. ‘छापा-काटा’ नाटकातील आई ही ‘आई’ या चौकटीच्या पलीकडे जाऊन स्वत:चे विचार मांडते जे समाजाला खटकणारे आहेत. ‘मृगाचा पाऊस’सारखी एकांकिका एका लहान मुलीचे तरल भाव सांगते जिला पहिली पाळी आली. आणि अशा वेळी मोठे होणे म्हणजे काय, तिचे जग कसे बदलते याची ही कथा होती. जे मांडायचे ते स्पष्ट आणि स्वच्छ मांडले होते. मी ठरवून हे लिहीत नाही पण जे लिहिते त्यातल्या स्त्री पात्राला स्वत:चे महत्त्व आणि अस्तित्व असते.

इरावती कर्णिक, लेखिका

‘अनोखे ‘स्त्रीपण’’

‘न्यूड’सारखा चित्रपट केल्यानंतर लोकांनी मला धाडसी म्हटले, पण मला तसे वाटत नाही, उलट ज्या स्त्रियांनी स्वत: विवस्त्र होऊन अनेक चित्रकार घडवले त्या धाडसी आहेत. एक आई आपल्या उदरनिर्वाहासाठी, लेकरांसाठी विवस्त्र होते ही भावनाच विचार करायला भाग पाडणारी आहे. त्या स्त्रियांना वंदन करण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला आहे. मुळात महिलांविषयी आपले विचार अत्यंत संकुचित आहेत. एखाद्या स्त्रीने तोकडे कपडे घातले तरी लोक तिच्यावर शेरेबाजी करतात. रस्त्यावरून चालताना कमी कपडय़ातील मुलगी दिसली तर आपण निरखतो, पण घरातली स्त्री मात्र आपल्याला पूर्ण कपडय़ात लागते. त्यामुळे स्त्रियांकडे पाहण्यासाठी आधी दृष्टी बदलायला हवी. हा चित्रपट अनेकांना पचणार नाही हे चित्रीकरण करतानाच माझ्या लक्षात आले होते, पण कलाकार त्या स्त्रियांकडे ज्या स्वच्छ दृष्टिकोनातून पाहतात तो दृष्टिकोन मला समाजाला द्यायचा होता. ‘बालक पालक’ चित्रपटातही हा अनुभव मला आला. त्यातली दोन मुले ब्ल्यू फिल्म पाहतात ते लोकांना खटकत नाही, पण त्यांच्यासोबत दोन मुलीही ते पाहात असतात हे लोकांना खटकते. यावर बरीच चर्चा झाली, वाद झाले. यावरून आपली विचारधारा कळते. ‘नटरंग’मध्येही गुणा कागलकर स्त्रीचे पात्र साकारतो म्हणून तो हिणवला जातो. ‘मित्रा’ कादंबरीतील नायिका १९७६ मध्ये आपल्या मित्रापुढे ती समलिंगी असल्याची कबुली देते, हेही धाडसच होते. स्त्रियांविषयी दुटप्पी भूमिका घेऊन ‘लेबल’ लावण्याची पद्धत थांबायला हवी. मुळात ‘स्त्री’ ही एक प्रचंड मोठी शक्ती आहे. फक्त ती जाणून घेण्यात आपण कमी पडतो.

रवी जाधव, दिग्दर्शक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 7, 2021 12:00 am

Web Title: article on interact with artists who break through the rusty society by fearlessly showing the different positions of women through their art abn 97
Next Stories
1 वयाच्या ५७व्या वर्षी अभिनेत्याने केले पाचव्यांदा लग्न
2 मुलीच्या जन्मानंतर दत्तक घेतलेल्या मुलांना सोडले? जय आणि माही विजवर नेटकऱ्यांनी केले आरोप
3 नवरीवानी नटली आलिया तर रणबीर झाला म्हातारा, पण कशासाठी?
Just Now!
X