निलेश अडसूळ

प्रेक्षकांना कौटुंबिक रडगाण्यांच्या पलीकडे घेऊ न जाण्यासाठी वाहिन्यांनी कायमच ‘रिअ‍ॅलिटी शो’चे हत्यार पुढे केले आहे. सद्य घडीला काही अपवाद वगळता सगळ्याच प्रादेशिक वाहिन्यांवर एक तरी ‘रिअ‍ॅलिटी शो’ असतोच. विशेष म्हणजे गीत, नृत्य किंवा विविध कलांचा आधार घेऊ न साकारलेल्या या मालिकांमुळे केवळ शहरी भागातीलच नाही तर ग्रामीण भागातीलही मुलामुलींना आपले कलागुण दाखवण्याची संधी मिळते. असेही काही कार्यक्रम सध्या मराठी वाहिन्यांवर सुरू आहेत.

‘झी युवा’ या युवा वाहिनीवर ‘डान्सिंग क्वीन’ या नृत्यावर आधारित कार्यक्रमात सामान्य कलाकार नाहीत तर चक्क मालिका आणि चित्रपट विश्वातील कलाकारांमध्ये स्पर्धा रंगत आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि मयूर वैद्य या कार्यक्रमाचे परीक्षक आहेत, तर अद्वैत दादरकर सूत्रसंचालकाच्या भूमिकेत आहे. सूत्रसंचालनात अद्वैतला साथ देणारी ‘गंगा’ तृतीयपंथी असून मराठी मालिका विश्वात पहिल्यांदा एका तृतीयपंथी व्यक्तीला सूत्रसंचालनाची संधी मिळाली आहे. सध्या दोन स्पर्धक या स्पर्धेतून बाद झाले असून धनश्री कडगावकर, गायत्री दातार, पूर्वा शिंदे, अंकिता भगत, गिरिजा प्रभू, आयुषी भावे, नेहा खान, क्षमा देशपांडे, शैला टिके, अपेक्षा लोंढे, दीपाली नायगावकर, कृतिका गायकवाड या कलाकारांमध्ये पुढील स्पर्धा रंगणार आहे. गेल्या भागात मालिकेत सूत्रसंचालन करणाऱ्या तृतीयपंथी गंगाचा आजवरचा खडतर प्रवास अभिनेत्री धनश्री कडगावकर हिने आपल्या नृत्यातून साकारला. या भागाला प्रेक्षकांनी विशेष पसंती दिली.

नीलेश साबळे, तेजपाल वाघ, अभिजित खांडकेकर, योगिनी चौक आणि असे कितीतरी कलाकार ज्या कार्यक्रमातून पुढे आले तो म्हणजे ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’. हा कार्यक्रम पुन्हा एकदा ‘झी मराठी’ वाहिनीवर सुरू झाला आहे. शहरापासून ते गावागावापर्यंत अभिनयाचे स्वप्न मनी बाळगून असणाऱ्या प्रत्येकाला व्यासपीठ देणाऱ्या या मंचावरून लवकरच महाराष्ट्राला नवा सुपरस्टार मिळणार आहे. पहिल्या दोन भागांत ३६ दर्जेदार स्पर्धकांमध्ये चुरशीचा सामना दिसून आला, परंतु ही चुरस आगामी काळात दाखवणे गरजेचे आहे, कारण येत्या भागात ‘एलिमिनेशन राऊंड’ होणार आहे. आता ३६ स्पर्धकांपैकी नक्की कोण घरी जाणार हे आगामी भागात कळेल.

तर ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘मी होणार सुपरस्टार’ या कार्यक्रमात चार भिंतींआड दडलेला अनेकांचा आवाज प्रेक्षकांसमोर येत आहे.  मिका सिंग, शान, सुखविंदर सिंग, उदित नारायण, शाल्मली खोलगडे आणि नकाश अझीझ अशा हिंदीतील दिग्गज  गायक-गायिकांनी या कार्यक्रमाची अगदी जंगी सुरुवात करून दिली. येणाऱ्या भागात अभिनेत्री दीपिका पदुकोण स्पर्धकांना भेट देणार असल्याने कार्यक्रमात एकामागून एक सेलिब्रिटींचे सत्र सुरू आहे. या विशेष भागात आदर्श शिंदे आणि राहुल देशपांडे दीपिकासाठी खास रोमँटिक गाण्यांची मैफल रंगवणार आहेत.

‘कलर्स मराठी’वरील ‘सूर नवा ध्यास नवा’ या मालिकेच्या दुसऱ्या पर्वालाही भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. वयाचे बंधन नसलेल्या संकल्पनेमुळे लहानांपासून ते मोठय़ांपर्यंत सर्व कलाकारांना एकाच मंचावर ऐकण्याची संधी या कार्यक्रमातून मिळाली. प्रत्येक आठवडय़ात एक संकल्पना घेऊ न त्यावर गाणी सादर केली जातात. नुकत्याच झालेल्या भागात कल्याणजी आनंदजी यांच्या गीतांना उजाळा देण्यात आला. पुढील भागांमध्ये  ‘तू म्हणशील तसं’ या नाटकाची टीम स्पर्धकांच्या भेटीला येणार आहे. प्रशांत दामले, भक्ती देसाई आणि संकर्षण कऱ्हाडे या भागात धमाल करणार आहेत. प्रशांत दामले आणि संगीत हे समीकरण रसिकांसाठी विशेष असल्याने या भागात प्रशांत दामले काय गाणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

एकंदर वाहिन्या आणि त्यावरच्या रिअ‍ॅलिटी कार्यक्रमांची संख्या पाहता इतर वाहिन्यांपेक्षा मराठीत तसे कमी कार्यक्रम सुरू आहेत. परंतु दर काही महिन्यांनी रिअ‍ॅलिटी कार्यक्रमांची नवनवीन मेजवानी वाहिन्यांवर आणावीच लागते, त्यामुळे नव्या वर्षांत अजून काहीतरी नवं पाहायला मिळेल. आज मोठय़ा प्रमाणात असा प्रेक्षक आहे जो वाहिन्यांवर केवळ रिअ‍ॅलिटी कार्यक्रम पाहतो. त्यामुळे रिअ‍ॅलिटी कार्यक्रम म्हणजे कौटुंबिक आशयाला कंटाळणारा प्रेक्षकवर्ग वाहिन्यांकडे वळवण्याचे उत्तम समीकरण आहे, हेही नाकारून चालणार नाही.