भक्ती परब

प्रत्येक वेळी गुरूने कारस्थान करून राधिकाला त्रास द्यायचा आणि राधिकाने त्याला प्रत्येक वेळी माफ करायचं, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिका बंदच करा. ‘सुखांच्या सरींनी हे मन बावरे’ या मालिकेचं लेखन एक लेखिका करते आहे, तरीही तिघी तिघी खलनायिका का दाखवल्या आहेत? ‘मोलकरीण’ मालिकेत तर दुखचा डोंगर कोसळल्यासारखी परिस्थिती, ‘घाडगे अ‍ॅण्ड सून’मध्ये अक्षय आणि अमृता या दोघांच्या एकत्र येण्याची किती लांबणं लावली गेली? मालिकांच्या बाबतीत प्रेक्षकांमध्ये सध्या अशा टोकाच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत. लोकलच्या प्रवासात कुणाच्या मोबाइलमध्ये डोकावलं तर ‘जिवलगा’, ‘तुला पाहते रे’, नाही तर ‘फुलपाखरू’ मालिका सुरू असलेली दिसते. मालिकांमध्ये येणारी वळणं नियमित मालिका पाहणाऱ्या प्रेक्षकाला तोंडपाठ असतात. फक्त ते वळण असं का दाखवलं आणि इतकं का लांबलं, याच मुद्दय़ाला धरून मग टोकाच्या चर्चा रंगताना दिसतात.

‘झी टॉकीज’, ‘नाइन एक्स झक्कास’सारख्या वाहिन्या सोडल्यास मराठी मनोरंजन वाहिन्या पाचच आहेत. या पाच वाहिन्यांवर गेल्या दोन वर्षांत विविध आशय-विषयाच्या मालिका बघायला मिळाल्या. पण या मालिकांमध्ये आपापसात स्पर्धा रंगताना अभावानेच पाहायला मिळते. गेल्या काही वर्षांपासून पाहिलं तर ‘झी मराठी’ वाहिनीच्याच मालिका पहिल्या पाच कार्यक्रमांच्या यादीत असतात. इतर वाहिन्यांवरील मालिका पहिल्या पाच मालिकांमध्ये आपले स्थान पटकावताना दिसत नाहीत. ‘झी मराठी’ सोडून इतर वाहिन्यांवर पाहिलं तर ‘स्टार प्रवाह’वरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, ‘जिवलगा’, ‘विठुमाऊली’ यांसारख्या काही दोन-तीन मालिकांवर जरा जास्त मेहनत घेतली तर त्या स्पर्धेत तरी येऊ शकतील. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘घाडगे अ‍ॅण्ड सून’, ‘सुखांच्या सरींनी हे मन बावरे’, ‘जीव झाला येडापिसा’, ‘बाळुमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिका पहिल्या पाचमध्ये येऊ शकतात. परंतु मालिकांच्या मांडणीत एकूणच गडबड झाली आहे. या मालिकांच्या वेळात ‘कलर्स मराठी’ वाहिनी पाहणारा प्रेक्षकवर्ग निर्माण झाला आहे. परंतु त्या प्रेक्षकाला या मालिकांमधल्या उणिवाच जास्त दिसतात.

‘बिग बॉस २’ हा कथाबाह्य़ कार्यक्रम गेल्या वर्षीच्याच वळणावर जातो आहे. स्पर्धक घरात आल्यापासून गेल्या वर्षीच्या काही स्पर्धकांसारखं वागत होते. पण पहिल्या वीकेण्डच्या डावानंतर महेश मांजरेकर यांनी खडसावल्यावर सध्या स्पर्धक अधिकच आक्रमक रंग दाखवू लागले आहेत. पराग आणि रुपाली यांचं वागणं गेल्या वर्षीच्याच बिग बॉसची आठवण करून देणारे आहे. मुळात बिग बॉसने दिलेला खेळ कसा खेळायचा, हेच स्पर्धकांना समजत नाही आहे. गेल्या वर्षीच्या बिग बॉसमध्ये हीच चूक झाली होती. एखादा खेळ (टास्क) खेळायला दिल्यावर तो खिलाडूवृत्तीने, युक्तीने, प्रेक्षकांचं धमाल-मनोरंजन करत, स्वत त्याचा आनंद घेत स्पर्धकांनी खेळला असता तर कार्यक्रम बघताना रंगत आली असती. एक तर घरात इतकी भांडय़ाला भांडी लागत असताना बिग बॉसच्या घरातील भांडणं प्रेक्षकांना असह्य़ वाटू लागली आहेत. याविषयी या रविवारी तरी मांजरेकर यांनी समजून सांगावे. बिग बॉसच्या घरात दिले जाणारे टास्क कसे खेळणे अपेक्षित आहे, हे एकदा स्पर्धकांना सांगितलं गेलं पाहिजे, अशीही प्रेक्षकांची मागणी आहे.

‘सोनी मराठी’ आणि ‘झी युवा’ या दोन वाहिन्यांनी अजून त्यांच्या मालिकांवर मेहनत घ्यायला हवी. ‘फुलपाखरू’, ‘वर्तुळ’, ‘तू अशी जवळी रहा’, ‘एक घर मंतरलेलं’ या मालिका प्रेक्षकांना आवडतात. पण त्यासाठी खास वेळ काढून ती वाहिनी पाहावी, हे चित्र अजून दिसत नाही. ‘एक होती राजकन्या’, ‘ती फुलराणी’, ‘कोण होणार करोडपती’, ‘सारे तुझ्याचसाठी’, ‘हम बने, तुम बने’ या मालिकांमुळे ‘सोनी मराठी’ वाहिनी ‘स्टार प्रवाह’ आणि ‘झी युवा’ या दोन वाहिन्यांना आव्हान देऊ शकते. परंतु एकूण सादरीकरणात रंजकता यायला हवी. प्रेक्षकांना साध्या, आजूबाजूला वावरणाऱ्या व्यक्तिरेखा मालिकांमध्ये पाहायला आवडतात. परंतु त्याचबरोबर एक शैलीही (स्टाईल) असायला हवी. एखादी व्यक्तिरेखा आत्मविश्वासाने बोलणं आणि तिने त्या व्यक्तिरेखेच्या शैलीतून प्रभाव पाडणं यातला फरक मराठी मालिकांमध्ये अधोरेखित होत नाही.

मराठी कलाकारांसाठी रंगभूषा, वेशभूषा करणाऱ्या मंडळींनी या कलाकारांची समाजमाध्यमांवरील छायाचित्रं पाहावीत, म्हणजे आपण आपलं रंगभूषा आणि वेशभूषेचं कौशल्य दाखवताना कलाकारांचं व्यक्तिमत्त्व किती गुदमरून टाकतोय, हे लक्षात येईल. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये मालिका पाहणाऱ्या प्रेक्षकांच्या नजरेतून ही गोष्ट सुटत नाही, हे मालिकांच्या निर्मितीसंस्थांनी लक्षात घेतलं पाहिजे.

‘कोण होणार करोडपती’चं सूत्रसंचालन नागराज मंजुळे करणार यावरून जेवढी उत्सुकता निर्माण झाली होती, ती उत्सुकता पहिला भाग पाहिल्यानंतर कमी होऊ लागली आहे. या कार्यक्रमाचं कॉर्पोरेट वातावरण टिकवून ठेवताना नागराज मंजुळेंच्या वेशभूषेत आणि प्रश्न विचारताना बसण्याच्या बैठकीत काही बदल करता आला असता तर प्रेक्षकांना हा कार्यक्रम अधिक आपला वाटला असता.

‘मी तुझीच रे’ ही नवी मालिका लवकरच ‘सोनी मराठी’ वाहिनीवर दाखल होतेय. या मालिकेच्या प्रोमोने प्रेक्षकांचं मस्त मनोरंजन केलं. अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता संग्राम साळवी मुख्य भूमिकेत असलेल्या या मालिकेच्या प्रोमोतील अमृताचे संवाद ऐकून अनेकांना तिचे टीक टॉकवरील व्हिडीयो आठवले.

पुढील आठवडय़ात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मालिकेत आईचं जाणं आणि सावत्र आईचं येणं या प्रसंगातून भीवाच्या लहानग्या मनावर कसा परिणाम होणार याची उत्कंठावर्धक गोष्ट पाहायला मिळणार आहे. ‘जिवलगा’ मालिकेत काव्या आणि निखिलच्या प्रेमप्रकरणाबद्दल विधीला कळलंय. त्यामुळे घर सोडून जाणाऱ्या विधीला निखिल थांबवू शकेल का? विधी आपला निर्णय बदलणार का?, हे पाहायला मिळेल. ‘कलर्स मराठी’वरील ‘सुखांच्या सरींनी हे मन बावरे’ मालिकेत सिद आणि अनूचं नातं निर्णायक वळणावर येऊन ठेपलं आहे. सिदचा निर्णय काय असेल, हे येत्या भागांमध्ये पाहायला मिळेल. एकूणच टोकाच्या प्रतिक्रिया देणाऱ्या प्रेक्षकांना पुढील आठवडय़ात आकर्षित करणारी अनेक वळणं मालिकांमध्ये पाहायला मिळणार आहेत.