कलाकार पडद्यासमोर जरी हसताना आणि प्रेक्षकांना हसवताना दिसत असला तरी त्याच्या वैयक्तिक आयुष्यात कोणते चढ-उतार सुरू आहेत याची कल्पनासुद्धा प्रेक्षकाला अनेकदा नसते. अनेकदा कौटुंबिक आयुष्यात एखादा दु:खाचा प्रसंग ओढावलेला असतो, परंतु ते बाजूला सारून कलाकाराला पडद्यासमोर हसरा चेहरा आणावा लागतो. असाच एक प्रसंगा ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी ‘दोन स्पेशल’ या कार्यक्रमात सांगितला. वडील शेवटच्या घटका मोजत असतानाही त्यांनी कशाप्रकारे एका विनोदी चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं, याबद्दल अशोक मामांनी या कार्यक्रमात सांगितलं.

अशोक मामा म्हणाले, “वडिलांची तब्येत नाजूक होती आणि त्याच दिवशी मी सकाळपासून एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होतो. शूटिंगदरम्यान थोडा जरी वेळ मिळाला तर लगेच भावाला फोन करून वडिलांच्या तब्येतीची विचारपूस करत होतो. त्यांची तब्येत खालावतेय, हेच तो मला दर वेळी सांगत होता. अखेर काही वेळाने वडिलांची प्राणज्योत मालवल्याचं समजलं. त्यावेळी माझे सीन राहिले होते. राहिलेल्या तीन-चार दृश्यांचं शूटिंग पूर्ण करूनच मी तिथून निघालो. कारण त्यादिवशी मला चित्रपटाच्या टीमचं नुकसान करायचं नव्हतं. काही वेळा आपलं स्वत:चं दु:ख बाजूला सारुन दुसऱ्यांचा विचार करावा लागतो. विदुषकाची दुसरी बाजू ही आहे.”

अनेकदा कलाकाराला त्या परिस्थितीची जाण ठेवत स्वार्थ बाजूला ठेवून काम करावं लागतं आणि अशोक मामांनी सांगितलेल्या प्रसंगावरून याच गोष्टीची प्रचिती येते. ‘दोन स्पेशल’च्या या भागात अशोक सराफ यांच्यासोबत निर्मिती सावंतने हजेरी लावली होती. दोघांनी या कार्यक्रमात कलाकाराची दुसरी बाजू उलगडून सांगितली.