ऐतिहासिक कथानकांची मोठ्या रंजकतेनं मांडणी करण्यासाठी ओखळला जाणारा चित्रपट दिग्दर्शक म्हणजे आशुतोष गोवारिकर. ‘जोधा अकबर’, ‘मोहेंजोदारो’ यांसारख्या चित्रपटांनंतर गोवारिकर आता आणखी एक महत्त्वाची ऐतिहासिक घटना रुपेरी पडद्यावर आणत आहेत. पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर भाष्य करणारा चित्रपट ‘पानिपत- द ग्रेट बेट्रेयल’ ते प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहेत. मात्र या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये सध्या काही अडचणी आल्या आहेत.

‘डेक्कन क्रॉनिकल’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘पानिपत’च्या निर्मितीसाठी आर्थिक अडचणी येत आहेत. यामुळे शूटिंग रखडली जात आहे. तर दुसरीकडे सिनेमॅटोग्राफर किरण देवहंस यांनी मध्यातच काम सोडून दिलं आहे. ते पुन्हा या चित्रपटासाठी काम करण्याची शक्यता फारच कमी असून जोपर्यंत नवा सिनेमॅटोग्राफर रुजू होत नाही तोपर्यंत शूटिंग लांबणीवर जाणार आहे. या सर्व अडचणींमुळे योग्य वेळेत चित्रपटाची शूटिंग पूर्ण होईल की नाही याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत.

वाचा : चोराच्या उलट्या बोंबा! रस्त्यावर कचरा फेकणाऱ्याच्या आईने ‘विरुष्का’लाच झापलं

या चित्रपटासाठी कर्जत इथल्या एनडी स्टुडिओत शनिवाड्याची प्रतिकृती उभारली गेली आहे. आशुतोषच्या या चित्रपटातून अभिनेता संजय दत्त, अर्जुन कपूर आणि अभिनेत्री क्रिती सनॉन महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. ६ डिसेंबर २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असं म्हटलं जात होतं. मात्र आता त्यासाठी आणखी अवधी लागणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.