अर्जुन कपूर याने साकारलेल्या सदाशिवराव पेशवे या भूमिकेवषयी सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलेले असतानाच चित्रपटाच्या निर्मात्यांवर कथा चोरीचा आरोप करण्यात आला आहे. लेखक विश्वास पाटील यांनी हा आरोप केला असून ‘पानिपत’ कादंबरीतून चोरल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

यासंदर्भात पाटील यांनी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, निर्माते रोहित शेलाटकर आणि रिलायन्स एंटरटेन्मेट यांच्यावर बौद्धिक संपदा कायद्याअंतर्गत मुंबई उच्च न्यायालयात वाङ्‌मय चोरीची याचिका दाखल केली आहे. शिवाय पाटील यांच्या वकिलांनी सात कोटी रुपये नुकसान भरपाईची मागणी देखील केली आहे.

चित्रपटाला लेखक म्हणून विश्वास पाटील यांचे नाव दिले जाईल आणि हा चित्रपट त्यांच्या कादंबरीवर आधारित असल्याचेही लिहिले जाईल, असे चित्रपटाचे निर्माते रोहित शेलाटकर यांच्या प्रतिनिधींनी पाटील यांना सांगितले होते. परंतु प्रत्यक्षात मात्र तसे झाले नाही. पाटील यांच्या संमतीशिवाय कादंबरीतील सर्व संवाद चित्रपटात वापरले गेले.

चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर खरे चित्र समोर आल्याने विश्वास पाटील यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शकांवर आणि निर्मात्यांवर कायदेशीर कारवाई केली आहे. ‘पानिपतची तिसरी लढाई कादंबरीवरीच्या रुपात लिहायला मला सहा वर्षे लागली. यावर प्रचंड अभ्यास करून पराभवाच्या लढाईचे मी विजयात रुपांतर केले. परंतु लेखकाला अंधारात ठेवून त्याचे साहित्य अशा पद्धतीने वापरणे गैर आहे. म्हणून ही याचिका दाखल केल्याचे विश्वास पाटील यांनी सांगितले. या संदर्भात चित्रपटाचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळू शकला नाही.