04 June 2020

News Flash

चित्रनगरीः अवताराची गोष्ट

' शाळा ' मधली जोशी-शिरोडकर ही जोडी , ' ताऱ्यांचे बेट ' मधली मुलं , ' बालकपालक ' मधली चिऊ , डॉली , अव्या ,

| December 26, 2014 09:34 am

‘ शाळा ‘ मधली जोशी-शिरोडकर ही जोडी , ‘ ताऱ्यांचे बेट ‘ मधली मुलं , ‘ बालकपालक ‘ मधली चिऊ , डॉली , अव्या , विशू , भाग्या , ‘ चिंटू-२ ‘, ‘धग’, ‘एलिझाबेथ एकादशी’,  ही एकापाठोपाठ एक उदाहरणं पाहिली की मोठ्या पडद्यावर बच्चे कंपनीची गाडी जोरात आहे हे लक्षात येतं. मुलांच्या मध्यवर्ती भूमिका असलेल्या चित्रपटांना तुफान प्रतिसाद मिळताना दिसतोय. छोट्यांचा हा करिश्मा लक्षात घेत ‘अवताराची गोष्ट’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे.
देवाने अवतार घेतल्याच्या अनेक गोष्टी आपल्याला माहीत असतात. अशाच प्रकारे जर एखाद्याला आपण एखाद्या सुपरहीरोचा अवतार असल्याचं वाटू लागलं तर काय धमाल होईल? असचं काहीसं घडतं ते कौस्तुभच्या (मिहिरेश जोशी) आयुष्यात. चौथी इयत्तेत शिकत असलेला कौस्तुभ लहानपणापासून आजीकडून (सुलभा देशपांडे) पौराणिक गोष्टी ऐकून मोठा झालेला असतो. त्यातून विष्णू अवताराच्या कथा तर त्याच्या विशेष आवडीच्या. कारण, कलयुगात विष्णू हा ‘कल्की अवतार’ घेणार असं आजीने त्याला सांगितलेलं असतं. शाळेत वर्गमित्रांच्या दादागिरीला घाबरणा-या कौस्तुभला आपणचं कल्की अवतार आहोत असं वाटू लागतं. आपल्याला जितकं घाबरवलं जाईल तशी आपल्यात शक्ती येत जाईल अशी त्याची धारणा असते. त्याला यात साथ देणारा मित्र मंग्या (यश) त्याला देव अशी हाक मारत असतो. तसेच, कौस्तुभच्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडतात ज्यामुळे त्याला आपण देव असल्याचचं वाटू लागतं. आपण देवाचा अवतार आहोत हे पटल्यावर तो ही गोष्ट त्यांच्या घरातील भाडेकरू अमोदला (आदिनाथ कोठारे) सांगतो. मात्र, नास्तिक असलेला अमोद यावर दुर्लक्ष्य करत कौस्तुभ कल्की अवतार असल्याचे मान्य करतो आणि त्याचे मन दुखावत नाही. आपण अवतार असल्याच्या आनंदात कौस्तुभ एक साहस करून बसतो आणि या साहसामुळे त्याचे संपूर्ण जगचं पालथून जाते.
टीव्ही आणि इंटरनेटच्या या युगात लहान मुलांना सुपरहीरोंचं अनुकरण करण्याची इच्छा असते. मग त्यांचा तो सुपरहीरो कोणीही असू शकतो. टीव्हीवरच्या पुराण कथेतल्या देवांपासून ते कार्टुनपर्यंत कोणाच्याही जागी ते स्वत:ची कल्पना करू शकतात. यावर चित्रपटातं भाष्य करण्यात आले आहे. चित्रपटाचा विषय पाहिला तर तसा वेगळा मात्र तरीही बालीश वाटतो. दोन तासांचा हा चित्रपट पाहताना आपण लहान मुलांची गोष्टीची पुस्तके वाचल्यासारखे वाटते. त्यामुळे लेखक आणि दिग्दर्शकाचा प्रयत्न कुठेतरी फसल्यासारखा वाटतो. मुलांचे भावविश्व उलगडताना विषय जास्त ताणला जात नाही ना याकडे कुठेतरी दुर्लक्ष्य झाले आहे. चित्रपटांच्या कलाकारांविषयी बोलायचं झालं तर दिग्दर्शकानं सांगावं आणि कलाकारांनी ते करावं असं समीकरण इथे पाहायला मिळतं. त्यामुळे कलाकारांचा अभिनय हा त्यांच्या बाजूने योग्य असा म्हणता येईल. हे सगळं सोडलं तर चित्रपटातील गाणी उत्तम झाली आहेत. शान, जसराज यांच्या आवाजामुळे ती अधिक श्रवणीय झाली आहेत. एकंदरीत ‘अवताराची गोष्ट’ हा एक बाल चित्रपट झाला आहे. त्यामुळे छोट्यांना तो नक्कीच भावेल. पण, मोठ्यांसाठी हा एक निव्वळ बालपट आहे.

अवताराची गोष्ट
दिग्दर्शक, लेखक- नितीन दीक्षित
निर्माता- सचिन साळुंखे
कलाकार- सुलभा देशपांडे, आदिनाथ कोठारे, मिहिरेश जोशी, यश कुलकर्णी, लीना भागवत, आशिष विद्यार्थी, सुनील अभ्यंकर, रश्मी खेडेकर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2014 9:34 am

Web Title: avatarachi goshta review
Next Stories
1 …हे तिघेच ‘पीके’सारखे चित्रपट करु शकतात-संजय दत्त
2 पाहाः आयुष्यमान खुरानाचा थक्क करणा-या ‘हवाईजादा’ चित्रपटाचा ट्रेलर
3 फर्स्ट लूकः सुशांत सिंग राजपूतचा ‘धोनी लूक’!
Just Now!
X