‘विकी डोनर’ चित्रपटाने बॉलीवूड पदार्पण करणा-या आयुष्यमान खुराना सध्या लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. आयुष्यमानने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात छोट्या पडद्यापासून सुरु केली. मात्र आता तो छोट्या पडद्यावर कमी आणि मोठ्या पडद्यावर जास्त झळकताना दिसतो. विशेष म्हणजे आयुष्मानचा कल आता वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका करण्याकडे असल्याचं पाहायला मिळत आहे.

नुकताच आयुष्यमानच्या ‘बधाई’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून हा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत आहे. या चित्रपटाबरोबरच त्याचा आगामी ‘अंधाधून’ हा चित्रपटही प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. या दोन्ही चित्रपटांमध्ये त्याने वेगळ्या धाटणीच्या भूमिका वठविल्या आहेत. त्यामुळे सध्या तो त्याच्यातील कलाकाराला नवनवीन संधी देत असल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीमध्ये त्याने कलम ३७७ वर चित्रपटनिर्मिती झाली तर त्यात झळकायला आवडेल अशी इच्छा व्यक्त केली आहे.

‘समलैंगिकता गुन्हा नसल्याचा ऐतिहासिक निर्णय काही दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्यामुळे या निर्णयाचा सर्व स्तरातून स्वागत करण्यात आलं. त्यातच या मुद्द्यावर भाष्य करणाऱ्या चित्रपटाची निर्मिती व्हावी अशी माझी इच्छा आहे. इतकंच नाही, तर या विषयावर आधारित चित्रपट तयार झाला तर मला त्यात काम करायला आवडेल’, असं आयुष्मान म्हणाला.

पुढे तो असंही म्हणाला, ‘कलम ३७७ प्रकरणी सर्वोच्च न्यायलयाने दिलेला निर्णय खरंच एक ऐतिहासिक निर्णय आहे. या निर्णयामुळे भारत आता एका प्रगतीच्या वाटेवर वाटचाल करत असल्याचं पाहायला मिळत आहे. न्यायलयाने दिलेल्या निर्णयामुळे न्यायव्यवस्थेवर असलेल्या विश्वास आता आणखीनच वाढला आहे’.

दरम्यान, आता आयुष्यमानही बॉलिवूडमध्ये खऱ्या अर्थाने सक्रिय झाला असून आपलं स्थान निर्माण करण्यासाठी आवश्यक गोष्टींचा तो विचार करताना दिसत आहे. आयुष्यमानचा आगामी ‘बधाई’ हा चित्रपट येत्या १९ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये त्याच्याबरोबर सान्या मल्होत्रा, नीना गुप्ता, गजराव राव आणि सुरेखा सीकरी प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत.