17 December 2017

News Flash

..म्हणून ९ वर्षांनंतर पुन्हा चर्चेत आला ‘कटप्पाचा’ तो व्हिडिओ

ही बाब वाटते त्यापेक्षा जास्त गंभीर आहे.

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: April 21, 2017 7:16 PM

कटप्पा

‘बाहुबली २’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या काही दिवस आधीपासूनच या चित्रपटाबद्दलची उत्सुकता पाहायला मिळत आहे. पण, ऐन प्रदर्शनाच्या मोक्यावरच या चित्रपटासमोर काही अडचणी उभ्या राहिल्या आहेत. कर्नाटकमध्ये या चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध केला जात असल्यामुळे सध्या बाहुबलीच्या टिममध्येही अस्वस्थतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.

अभिनेता सत्यराज म्हणजेच कटप्पा याने २००८ मध्ये केलेल्या एका वक्तव्यामुळे सध्या त्याला कर्नाटकातील काही संघटनांच्या विरोधाला सामोरे जावे लागले होते. याप्रकरणी सत्यराज याने माफीही मागितली आहे. पण, नेमके ९ वर्षांनंतरच सत्यराज यांच्या त्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल होण्याचे कारण काय? असाच प्रश्न अनेकांना पडत होता.

या सर्व प्रकरणी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सद्यपरिस्थितीला दाखवण्यात येणाऱ्या वादापेक्षाही ही बाब जास्त गंभीर आहे. ‘बाहुबली’ या चित्रपटाचा पहिला भाग २०१५ला प्रदर्शित झाला होता. पण त्यावेळी मात्र कोणत्याही प्रकारचा वाद समोर आला नव्हता. मग आताच असे होण्यामागचे कारण काय? असा प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येत आहे. बाहुबली चित्रपटाच्या पहिल्या भागाने कर्नाटकातही चांगले प्रदर्शन केले होते. बाहुबलीला मिळणारे यश पाहता त्याचा परिणाम स्थानिक कन्नड भाषेतील चित्रपटांवर झाला होता. आता ‘बाहुबली २’ प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा तिच परिस्थिती उद्भवू शकत असल्यामुळे कन्नड भाषेतील चित्रपटांसमोर कोणत्याही प्रकारची अडचण उभी राहू नये यासाठी ‘बाहुबली २’च्या विरोधात ही आंदोलनं करण्यात येत असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

याप्रकरणी आणखी माहिती देत सूत्र म्हणाले की, ‘कर्नाटकातील चित्रपट वितरक या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी पूर्ण तयारी दाखवत आहेत. किंबहुना त्यांनी चित्रपटाशी संलग्न व्यक्तींशी याविषयी चर्चाही केली होती. पण ही चर्चा असफल ठरली. त्यामध्येच सत्यराज यांच्या कावेरी पाणीवाटप वक्तव्याला नव्याने हवा मिळाली आहे. त्यामुळे ‘बाहुबली २’ विरोधात हे सर्व प्रकरण रचवण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, परिस्थितीचे गांभीर्य पाहता अभिनेता सत्यराज यांनी ९ वर्षांपूर्वी केलेल्या ‘त्या’ वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे. त्यामुळे आता हा चित्रपट कर्नाटकात प्रदर्शित होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. एएनआयच्या ट्विटर अकाऊंटवरुन ही माहिती देण्यात आली आहे. सत्यराज म्हणाला की, ‘मी कर्नाटकच्या विरोधात नाही. ९ वर्षांपूर्वी दिलेल्या विधानाबद्दल मी तुमची माफी मागतो.’

First Published on April 21, 2017 7:16 pm

Web Title: baahubali 2 controversy this is why the 9 year old video of sathyaraj surfaced now katappa ss rajamouli prabhas