१९९२ मध्ये बाबरी मशीद पाडल्या प्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. लखनऊच्या विशेष सीबीआय न्यायालयाने आज निकाल दिला. बाबरी मशीदप्रकरणी निकाल येणार असल्याने संपूर्ण देशाचं निकालाकडे लक्ष लागलं होतं. बाबरी मशीद पाडण्याचा पूर्वनियोजित कट नव्हता, बाबरी पाडण्याची घटना अचानक घडली असं निरीक्षण यावेळी न्यायाधीशांनी नोंदवलं. न्यायालयाच्या या निर्णयावर बॉलिवूड अभिनेता जिशान अय्युब याने नाराजी व्यक्त केली आहे. “ज्या मुद्द्याचं १८ वर्ष भांडवलं केलं त्याच प्रकरणातून निर्दोष सुटका झाली” असा उपरोधिक टोला त्याने लगावला आहे.

जिशान अय्युब सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. देशभरात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर तो रोखठोक प्रतिक्रिया देतो. यावेळी त्याने बाबरी मशीद प्रकरणावरुन भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. “गेली १८ वर्ष ज्या मुद्द्याचा हत्यारासारखा वापर केला. मतं मिळवली. देशाचं विभाजन केलं. ज्या हिंसेला छातीठोकपणे देशात पसरवलं. त्याच प्रकरणातून निर्दोष मुक्तता मिळवली. खरंच कमाल आहे.” अशा आशयाचं ट्विट जिशानने केलं आहे. या उपरोधिक ट्विटच्या माध्यमातून त्याने न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने न्यायालयापुढे ३५१ साक्षीदार आणि सुमारे ६०० कागदपत्रं पुरावा म्हणून सादर केले होते. ४८ जणांविरोधात आरोप निश्चित करण्यात आले होते मात्र त्यापैकी १६ जण खटला सुरु असताना मरण पावले. १६ व्या शतकातील ही मशीद पाडण्यासाठी आरोपींनी कारस्थान रचले आणि कारसेवकांना मशीद पाडण्यासाठी फूस लावली असा सीबीआयचा युक्तिवाद होता.

न्यायालयात निकाल सुनावला जात असताना लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, कल्याण सिंह, सतीश प्रधान आणि महंत नृत्यगोपाल दास यांच्याव्यतिरिक्त सर्वजण उपस्थित होते. अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना प्रकृतीच्या कारणास्तव गैरहजर राहण्याची मुभा देण्यात आली. तर उमा भारती यांना करोनाची लागण झाली असून, कल्याण सिंह सध्या उपचार घेत आहेत. एकूण २६ आरोपी कोर्टात हजर होते. यामध्ये साध्वी ऋतंभरा, चंपत राय, विनय कटियार, ब्रिजमोहन शरण सिंग आणि इतर जणांचा समावेश होता.