मराठ्यांच्या इतिहासातील एकमेव महिला सरसेनापती उमाबाई दाभाडे यांचा चरित्रपट उलगडणारा ‘भद्रकाली’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. शिवराज्याभिषेक दिनी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून २०२२ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘भद्रकाली’ म्हणजे काय, ते नाव सरसेनापती उमाबाई यांना कसे प्राप्त झाले याचा जाज्वल्य इतिहास या चित्रपटातून दिग्दर्शक प्रसाद ओक मांडणार आहेत.

इतिहास आपल्याला कितीही आवडत असला तरी त्यातली मोजकीच पाने आपल्याला ठाऊक असतात. परंतु त्याच इतिहासाच्या तळाशी जाऊन काळाच्या आड दडलेल्या प्रसंगांना, योद्ध्यांना जगासमोर आणण्याचे काम काही लेखक-दिग्दर्शक करत आहेत. यामध्ये लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि अभिनेते दिग्दर्शक प्रसाद ओक यांचे महत्त्वाचे योगदान आहे. हीच द्वयी एकत्र येऊन ‘भद्रकाली’ या भव्य आणि नेत्रदीपक चित्रपटाची निर्मिती करत आहे. चित्रपटाचे लेखन दिग्पाल यांनी केले असून, दिग्दर्शन प्रसाद ओक करणार आहेत. विशेष म्हणेज ‘अजय-अतुल’ यांचे संगीत या चित्रपटाला लाभणार आहे. तर या भव्य चित्रपटाची निर्मिती निर्माते पुनीत बालन करणार आहेत.

‘अडीच-तीन वर्षांपूर्वी दिग्पाल ही संहिता लिहीत होता. त्या दरम्यान आम्ही एकत्र काम करत होतो. ‘फर्जंद’मध्ये बहिर्जी नाईकांची भूमिका करताना आमच्या अनेक चर्चा, अभ्यास होत होता. ‘हिरकणी’ प्रदर्शित झाल्यानंतर त्याने ही संहिता माझ्याकडे सोपवली. माझे ‘चंद्रमुखी’चे काम सुरू असतानाच आम्ही ‘भद्रकाली’चीही तयारी सुरू केली. ‘हिरकणी’च्या वेळी अजय-अतुल यांनी संगीत करावे ही माझी इच्छा अपूर्ण राहिली होती, ती ‘भद्रकाली’च्या निमित्ताने पूर्ण होते आहे. त्यामुळे दिग्पाल, मी आणि अजय-अतुल एकत्र आल्याने एक भव्य नजराणा प्रेक्षकांसमोर येईल अशी आशा आहे. विशेष म्हणजे हे साकारताना निर्माते म्हणून पुनीत बालन यांची भक्कम साथ मिळाली. हा प्रत्येकासाठीच महत्त्वाकांक्षी आणि स्वप्नवत चित्रपट असून चित्रीकरणाची तयारी अंतिम टप्प्यात आहे,’ असे दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी सांगितले.

‘हिरकणी’ चित्रपटाचा अनुभव पाठीशी आहेच. पण हिरकणीची कथा लोकांना ज्ञात असल्याने ती नाट्यरूप आणि प्रभावीपणे मांडणे हे उद्दिष्ट होते. या कथेबाबत तसे नाही. सरसेनापती उमाबाईसाहेबांचा इतिहास अनेकांना ठाऊक नाही, त्यांच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आहेत जे पाहून लोक अवाक् होणार आहेत, ते मांडण्याचे आव्हान असणार आहे. दाभाडे आणि छत्रपती घराण्याचे नाते, त्या सरसेनापती कशा झाल्या, भद्रकाली उपाधी कशी मिळाली याची उत्तरे या चित्रपटात दडली आहेत. विशेष म्हणजे एक महिला योद्धा लढाया करते आहे, मैदानी झुंज देते आहे हे मराठीत प्रथमच दिसेल. हा अनमोल वारसा समर्थपणे प्रेक्षकांसमोर आणण्याचा माझा प्रयत्न असेल.   – प्रसाद ओक, दिग्दर्शक

‘फर्जंद’ चित्रपटाच्या दरम्यानच ही संहिता लिहिली होती. सत्यशीलराजे दाभाडे यांची भेट झाली तेव्हा त्यांनी उमाबाईसाहेबांचे चरित्र सांगणारे एक पुस्तक भेट दिले होते. ते वाचताना हा इतिहास लोकांसमोर आणायला हवा असा विचार मनात आला. त्या मराठा साम्राज्यातील एकमेव सरसेनापती असणे ही आपल्यासाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे. विशेष म्हणजे त्या वेळीही स्त्रिया विचारांनी स्वतंत्र होत्या, निर्भीड होत्या याचे हे प्रतीक आहे. उमाबाईसाहेबांनी खुल्या मैदानातून मुघलांना उलथून लावले आहे. असे अनेक रंजक प्रसंग, आठवणी त्यांच्या आयुष्यात आहेत. अशा काळाच्या पुढे असलेल्या स्त्रीचे चरित्र लोकांसमोर यायला हवे, विशेष म्हणजे विचारांनी स्वतंत्र असलेली स्त्री बदल घडवू शकते, हे दाखवायचा उद्देश होता. मी ‘अष्टक’ची निर्मिती करत असल्याने हा चित्रपट एका समर्थ दिग्दर्शकाकडे द्यायचा होता. ‘हिरकणी’च्या निमित्ताने प्रसाद हा चित्रपट करू शकतो या विश्वासाने आम्ही काम सुरू केले. मुळात तो इतिहासावर श्रद्धा असणारा दिग्दर्शक असल्याने ती कलाकृती उत्तम होणार याची खात्री आहे.  – दिग्पाल लांजेकर, लेखक