03 March 2021

News Flash

ही अभिनेत्री साकारणार डॉक्टर आनंदीबाईंची भूमिका

‘आनंदी गोपाळ’ची घोषणा झाल्यापासून आनंदीबाईंच्या भूमिकेत कोण असेल याचं कुतूहल प्रेक्षकांना होतं.

१५ फेब्रुवारीला आनंदीबाईचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे.

डॉ. आनंदीबाई जोशी हे नाव आजही मोठ्या आदरानं महाराष्ट्रातच नाही तर जगभरात घेतलं जातं. भारतातल्या त्या पहिल्या महिला डॉक्टर आहेत. त्यांच्या प्रेरणादायी जीवनसंघर्षावर आधारित ‘आनंदी गोपाळ’ हा चित्रपट पुढील महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या बायोपिकमध्ये अभिनेता ललित प्रभाकर गोपाळ जोशी यांच्या भूमिकेत आहे. ‘आनंदी गोपाळ’ची घोषणा झाल्यापासून आनंदीबाईंच्या भूमिकेत कोण असेल याचं कुतूहल प्रेक्षकांना होतं. अखेर आनंदीबाईंच्या भूमिकेवरून पडदा उठला आहे.

अभिनेत्री भाग्यश्री मिलिंद ‘आनंदी गोपाळ’मध्ये आनंदीबाईंची भूमिका साकारणार आहे. २०१३ मध्ये आलेल्या ‘बालकपालक’ या चित्रपटात भाग्यश्री प्रमुख भूमिकेत होती. १५ फेब्रुवारीला आनंदीबाईचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे. आनंदी बाईंची भूमिका साकारण्याचं मोठं आव्हानं भाग्यश्रीवर असणार हे नक्की. हे आव्हान भाग्यश्री कसं पेलतं हे पाहण्यासारखं ठरेल.

वयाच्या केवळ अठराव्या वर्षी बोटीनं परदेशी जाणारी पहिली स्त्री, हालअपेष्टा सहन करीत वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणारी पहिली स्त्री. फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही कुचेष्टा, अवहेलना, अपमान सहन करीत हाती घेतलेले जीवित कार्य जिद्दीने पूर्ण करणारी स्त्री म्हणून त्या आजही आनंदीबाई ओळखल्या जातात. श्री. ज. जोशी यांनी ‘आनंदी गोपाळ’ यांच्यावर कादंबरी लिहिली होती. या कादंबरीवर आधारित नाटकही रंगभूमीवर आलं होतं.

वयाच्या दहाव्या वर्षी आनंदीबाईचं लग्न गोपाळराव जोशी यांच्याशी झालं. मी आनंदीबाईंना माझ्या मनाप्रमाणे शिकवेन अशी अट गोपाळरावांनी आनंदीबाईच्या वडिलांना घातली होती. आनंदीबाईच्या शिक्षणात आजींचा अडसर नको म्हणून गोपाळरावांनी कोल्हापूरमध्ये बदली करून घेतली. कोल्हापूरमध्ये मिशनऱ्यांशी ओळख वाढल्यावर तिथे प्रथम गोपाळरावांच्या मनात आलं की आनंदीला अमेरिकेला पाठवून तिचं शिक्षण करावं. मात्र शिकण्याच्या कार्यात झोकून देताना खूप अपमानास्पद शेरे त्यांना ऐकावे लागतं. परंतु तिकडे दुर्लक्ष करून आनंदी आपला अभ्यास निष्ठेने करीत राहिल्या.

त्यांचा हा जीवनसंघर्ष तब्बल १३२ वर्षांनंतर मराठी रसिकप्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2019 9:53 am

Web Title: bhagyashree milind play role of anandibai joshi in biopic anandi gopal
Next Stories
1 Photo : ‘कलंक’च्या सेटवरील आलियाचा फोटो व्हायरल
2 ‘अहिल्या’ घडवणार एक महिला कॉन्स्टेबल ते आयपीएस पोलीस अधिकारी हा प्रवास
3 ‘श्री कामदेव प्रसन्न’ मराठी वेब सीरिजमध्ये भाऊ कदम, सागर कारंडे
Just Now!
X