अमेरिकेत जाऊन उत्तमपैकी वैद्यकीय व्यवसाय करायचा आणि अमेरिकेचे कायमस्वरूपी नागरिक बनण्याचे अनेक  भारतीय तरुणांचे स्वप्न असते. त्या दृष्टीने प्रयत्न करणारे डॉक्टर आधी उच्च शिक्षणासाठी तेथे जातात आणि कालांतराने अमेरिकेतच स्थायिक होतात. अशाच मताच्या एका तरुण डॉक्टरचे मतपरिवर्तन कसे होते ते ‘भाकरखाडी सात किलोमीटर’ हा चित्रपट अधोरेखित करतो. चित्रपटातून देशप्रेमाची नव्हे पण सकारात्मक अशी उदात्त भावना निर्माण करण्याचा उत्तम यशस्वी प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे.
डॉ. समीर देशमुख हा शल्यविशारद बनल्यानंतर शहरातील एका नामांकित रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली नोकरी करतोय. डॉक्टर म्हणून अतिशय प्रामाणिकपणे काम करत असतानाच वेळप्रसंगी वैद्यकीय व्यवसायाची ठरीव चाकोरी सोडून त्याबाहेर जाऊन रुग्णांना सेवा देण्याचाही डॉ. समीर देशमुख प्रयत्न करतो. इथे काही दिवस अनुभव घेऊन त्याच वेळी अमेरिकेतील विद्यापीठामध्ये उच्च शिक्षणासाठी त्याचा प्रयत्न सुरू असतो. अमेरिकन विद्यापीठाकडून प्रवेशाचे पत्र मिळेपर्यंत वैद्यकीय अनुभव घ्यायचा म्हणूनच तो केवळ काम करीत असला तरी ते काम तो मनापासून करतो. तज्ज्ञ डॉक्टरांच्या नेतृत्वाखाली अनेक शस्त्रक्रिया करण्यात डॉ. समीर देशमुखचा हातखंडा असतो. अशातच एका गंभीर आजारपण असलेला मुलगा रुग्णालयात दाखल होतो. डॉ. मेहता त्याच्यावर यशस्वी मूत्रपिंड शस्त्रक्रिया करतात. परंतु अचानक दोन दिवसांसाठी बाहेरगावी जातात आणि त्या रुग्णाची जबाबदारी ते डॉ. समीर देशमुखवर सोपवितात. त्या रुग्णाची प्रकृती गंभीर बनते आणि तातडीने त्याच्यावर दुसरी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय डॉ. समीर घेतो. परंतु ती शस्त्रक्रिया यशस्वी होत नाही आणि रुग्ण दगावतो. त्यातच हा रुग्ण एका बडय़ा राजकीय नेत्याचा असल्यामुळे त्याचे परिणाम वाईट होतात. डॉ.समीर देशमुखची चौकशी होते. दोषी ठरवून त्याला दूरच्या खेडेगावात तीन वर्षे प्राथमिक आरोग्य अधिकारी म्हणून काम करण्याची शिक्षा केली जाते. अमेरिकेत जाण्याचे समीरचे स्वप्न भंग पावते. सात दिवसांत समीर भाकरखाडी या दुर्गम खेडय़ात जातो. आपल्याकडून चूक झालीच कशी याची टोचणी, अमेरिकेचे स्वप्न अपूर्ण राहिल्यामुळे अस्वस्थता आणि लोकांच्या रोषाची बळी ठरलेल्या आपल्या आईची काळजी यामुळे समीर उद्विग्न होतो. भाकरखाडीसारख्या आडगावातल्या गैरसोयी, तिथल्या रुग्णांची प्रचंड संख्या, अपुरा औषधसाठा या सगळ्याला तोंड देत देत एक दिवस तो उत्तम आरोग्य अधिकारी, गावकऱ्यांची काळजी घेणारा डॉक्टर बनतो.
भाकरखाडी हे इतके आडगाव असते की तिथे पोहोचण्यासाठी सात किलोमीटर चालण्याची वेळ समीरवर येते. आतापर्यंत शहरातील सुखासीन आयुष्य जगलेल्या समीरला हे सात किलोमीटर म्हणजे आपल्या आयुष्याचे वाटोळे झाल्याची निशाणी वाटते. वैद्यकीय व्यवसायावरील या चित्रपटाचे म्हणूनच हे शीर्षक समर्पक ठरते. वैद्यकीय व्यवसाय करताना तरुण डॉक्टरांनी डॉक्टर बनताना घेतलेली शपथ, कायद्याची बंधने आणि त्यासाठी लागणारे पुरेसे व्यावसायिक धोरण जबाबदारीने स्वीकारून काम करणे अपेक्षित आहे हे जसे दिग्दर्शक सुचवितो त्याचबरोबर स्वप्न भंगले आणि आडगावी डॉक्टरला काम करावे लागले तरी त्या अनुभवातूनही बरेच काही शिकता येते. जीवनाचा नवीन मार्ग, आशादायी प्रवास आणि सकारात्मकता मिळत असते हेही चित्रपट अधोरेखित करतो. अनिकेत विश्वासरावने प्रथमच रूपेरी पडद्यावर डॉक्टरची भूमिका केली असून उत्तम पद्धतीने डॉ. समीर देशमुख या व्यक्तिरेखेची मानसिक आंदोलने, उद्विग्नता, अस्वस्थता दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. वीणा जामकरने रेणू या भूमिकेद्वारे पुन्हा एकदा आपण दिग्दर्शक सांगेल ती भूमिका चांगलीच वठवितो हे सिद्ध केले आहे. मेलोड्रामा या प्रकाराकडे न झुकता लेखक-दिग्दर्शकांनी चित्रपटाची मांडणी केली आहे. वैद्यकीय क्षेत्रात घडणाऱ्या गोष्टी दाखविताना वैद्यकीय भाषा, वैद्यक  क्षेत्राची कार्यपद्धती, डॉक्टर-रुग्ण संबंध यावरही चित्रपट कळत नकळत भाष्य करतो. दुर्गम भागांतील सरकारी वैद्यकीय काम कसे चालते याचेही दर्शन प्रेक्षकांना घडविण्यात दिग्दर्शक यशस्वी ठरला आहे.

भाकरखाडी सात किलोमीटर
निर्माता – डॉ. दिनेश वैद्य
सहनिर्माते – प्रियंका कामत
दिग्दर्शन – उमेश नामजोशी
कथा व गीते – डॉ. दिनेश वैद्य
पटकथा – उमेश नामजोशी, नंदू परदेशी
संवाद – नंदू परदेशी
छायालेखन – प्रसाद भेंडे
संगीत – कमलेश भडकमकर
संकलन – जयंत जठार
कलावंत – अनिकेत विश्वासराव, वीणा जामकर, रेणुका शहाणे, भारत गणेशपुरे, अनंत जोग, उदय टिकेकर, सुयश टिळक, अपूर्वा नेमळेकर, विकास पाटील, विजय निकम, मच्छिंद्र गडकर व अन्य.