अभिनेत्री भूमी पेडणेकर सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टीव असते. उत्तम अभिनयासोबतच भूमी अनेक सामाजिक समस्यांवर तिची भूमिका मांडत असते. तसचं ती अनेक सामाजिक कार्यांमध्ये भाग घेताना दिसते. भूमीच्या या कार्यामुळेच तिचे चाहते तिला कायम पसंत करतात.

नुकताच भूमीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत भूमी जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसतेय. भूमी पेडणेकर सध्या हरिद्वारमध्ये ‘बधाई दो’ या तिच्या आगामी सिनेमाचं शूटिंग करतेय. मात्र शूटींगमधून वेळ काढत भूमीने एक घरं गाठलं. या घराचा व्हिडीओ शेअर करत तिने भूतकाळातील सुंदर आठवणींना उजाळा दिलाय.

2015 सालात आलेल्या ‘दम लगाके हैशा’ या सिनेमातून भूमीने बॉलिवू़डमध्ये एण्ट्री केली होती. आयुष्यमान खुरानासोबत भूमी या सिनेमात झळकली. या सिनेमाला आज 6 वर्ष पूर्ण होत आहेत. हरिद्वारमध्येच या सिनेमाचं शूटिंग करण्यात आलं होतं. कारकिर्दीतील पहिल्या सिनेमाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी भूमीने गंगाकाठी असलेलं घर गाठल्याचं दिसतंय. ज्या घरात 30 दिवस राहून ‘दम लगाके हैशा’ या सिनेमाचं शूटिंग पार पडलं त्या घराला भूमीने भेट दिली. भूमीच्या अचानक येण्याने या घरात राहणाऱ्या सदस्यांनाही धक्का बसला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Bhumi (@bhumipednekar)

या व्हिडीओत भूमीने तिच्या पहिल्या सिनेमातील पहिला सीन जिथे दिला तिथे जात सहा वर्षांपूर्वीचा तो क्षण जागा केला. त्याचसोबत सर्व खोल्यांना भेट देत गंगा नदीचे आशिर्वाद घेतल्याचं दिसतंय. ” जुन्या आठवणींचा प्रवास..मी त्या जागेला भेट दिली जिथे हे सर्व सुरु झालं होतं.” असं कॅप्शन भूमीने या व्हिडीओला दिलं आहे. तसचं कॅप्शनमधून तिने पुन्हा एकदा ‘दम लगाके हैशा’ सिनेमाच्या संपूर्ण टीमचे आभार मानले आहेत. “प्रत्येक परिस्थितीत माझा हिरो नंबर-1” असं म्हणत तिने अभिनेता आयुष्यमान खुरानाचं कौतुक केलंय. भूमीच्या या व्हिडीओला चाहत्यांनी मोठी पसंती दिलीय.

यासोबतच अभिनेता आयुष्यमान खुराना यानेदेखील इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.   ‘दम लगाके हैशा’ सिनेमाला सहा वर्ष पूर्ण झाल्याने त्याने सिनेमातील काही क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.  तर या सिनेमाने मला पुढचा मार्ग दाखवला. हा सिनेमा माझ्या करिअरमधला सर्वात स्पेशल सिनेमा आहे असं त्याने या पोस्टमध्ये म्हंटल आहे.

भूमीने शुभमंगल सावधान, बाला, टॉयलेट-एक प्रेम कथा अशा वेगळ्या धाटणीच्या सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. सध्या ती ‘बधाई दो’ या सिनेमाचं शूटिंग करतेय.