जाहिरातीमध्ये वकिलाचे कपडे घातल्याबद्दल बॉलिवूडचे ‘महानायक’ अमिताभ बच्चन यांना नवी दिल्ली बार काउन्सिलने नोटीस पाठवली आहे. एका खासगी जाहिरातीमध्ये महानायक अमिताभ बच्चन यांनी वकिलाचे कपडे घातले आहेत. त्यावर आक्षेप घेत बार काउन्सिलने कायदेशीर नोटीस पाठवली आहे. अमिताभ बच्चनशिवाय एव्हरेस्ट मसाला कंपनी, युट्यूब आणि त्यासंदर्भातील मिडीया हाऊसला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

कोणत्याही परवानगीशिवाय एव्हरेस्ट मसाल्याच्या जाहिरातीमध्ये अमिताभ बच्चन यांनी वकिलाचा गणवेश वापरला आहे. खासगी जाहिरातीमध्ये वकीलाचा गणवेश घालण्यापूर्वी वापकर्त्यांनी योग्य ती काळजी घेतली नाही. त्यामुळे संबधित जाहिरातदार कायदेशीर कारावाईसाठी पात्र ठरतात, असे बार काउन्सिलचे मत आहे.

ही जाहिरात तातडीने बंद करावी. तसेच यापुढे कोणत्याही खासगी जाहिरातीमध्ये वकिलाचा गणवेश वापरला जाणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच याबाबत नवी दिल्ली बार काउन्सिल, मुख्य बार काउन्सिल आणि इतर राज्यातील बार काउन्सिलला याचे हमीपत्र लिखीत स्वरूपात देण्यात यावे.

याबाबत अमिताभ बच्चन आणि संबधित जाहिरातदाराला दहा दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. भविष्यात पुन्हा वकिलांच्या गणवेशाचा वापर करणार नाही असे लिखीत स्वरूपात द्यावे, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावे लागेल असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.