छोट्या पडद्यावरील वादग्रस्त शो बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वाला नुकतीच सुरुवात झाली आहे. यंदाच्या पर्वामध्ये मराठी कलाविश्वातील अनेक लोकप्रिय चेहरे पाहायला मिळत आहेत. पहिल्या दिवसापासून रंजक वळणावर जात असलेल्या या पर्वाकडे पहिल्या पर्वातील कलाकारांचंही लक्ष लागलं आहे. त्यामुळेच पहिल्या पर्वातील स्पर्धक आस्ताद काळे याने दुसऱ्या पर्वात सभागी झालेल्या अभिनेता माधव देवचके याला सोशल मीडियाच्या माध्यमातून एक पत्र लिहिलं आहे.
‘सरस्वती’ या मालिकेमध्ये आस्ताद काळे याने राघव ही व्यक्तीरेखा साकारली होती, तर माधव देवचकेने याच मालिकेत आस्तादच्या लहान भावाची कान्हाची भूमिका वठविली होती. त्यामुळे या मालिकेच्या सेटवर दोघांची चांगलीच गट्टी जमली होती. विशेष म्हणजे मालिकेमध्ये जसं राघव- कान्हाचं एकमेकांवर निस्सिम प्रेम होतं. तसंच प्रेम या दोघांच्या मैत्रीतही आहे. त्यामुळेच आस्तादने माधवसाठी एक खास पत्र लिहीलं आहे.
आस्तादने इन्स्टाग्रामवर माधवसोबतचा एक फोटो शेअर केला असून त्याच्या कॅप्शनमध्ये माधव याच्या स्वभावाविषयी आणि त्यांच्या मैत्रीविषयी लिहीलं आहे. ”हा असाच आहे…आयुष्यातल्या अनेक गोष्टींची कमाल clarity आहे याला…जीवाला जीव लावतो…म्हणूनच जवळच्याचं काही चुकलं तर हक्कानी खूप ओरडतोसुद्धा….सगळ्यांचा लाडका कान्हा…आमचा लाडका माध्या,मॅडी….भीड गड्या….”, असं आस्तादने या फोटोला कॅप्शन दिलं आहे.
आस्ताद काळेशी ह्याविषयी संपर्क साधल्यावर तो म्हणतो, “मालिकेमुळे माझे माधवशी आयुष्यभरासाठी ऋणानुबंध जुळले. तो मला माझ्या सख्या भावासारखा आहे. माधव उत्तम क्रिकेटर असल्याने त्याच्यात स्पोर्टमॅन स्पिरीट आहे. त्यामुळे तो टास्कमध्येही चांगला खेळेल, असा मला विश्वास आहे,” असं आस्तादने सांगितलं.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 1, 2019 11:12 am