‘नमस्कार, मी बिग बॉस..’ असे शब्द लवकरच तुमच्या कानावर पडणार आहेत. कारण, हिंदी टेलिव्हिजन जगतातील प्रसिद्ध रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ आता मराठीतही येणार आहे. ‘बिग बॉस’च्या ११ व्या पर्वाची नुकतीच सांगता झाली. ‘भाभीजी घर पे है’ फेम शिल्पा शिंदेला रविवारी बिग बॉसची विजेती घोषित करण्यात आले. टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध ‘बहूराणी’ म्हणजेच हिना खानला दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. पण, या अंतिम फेरीच्या सोहळ्यात सलमान खानने केलेल्या एका घोषणेने सर्वांचे लक्ष वेधले. ती घोषणा होती ‘बिग बॉस मराठी’ची.

वाचा : शिल्पा शिंदे ठरली ‘बिग बॉस ११’ची विजेती; हिना खान दुसऱ्या स्थानावर

‘बिग बॉस ११’च्या विजेत्याचे नाव जाहिर केल्यानंतर सलमानने मराठी प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी सांगितली. लवकर बिग बॉसचा आवाज मराठीतही घुमणार असल्याचे त्याने जाहिर केले. शोची प्रसिद्धी आणि मराठी प्रेक्षकांचा विचार करता ‘एन्डमॉल शाइन इंडिया’च्या निर्मात्यांनी बिग बॉस हा शो मराठीतही आणण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही महिन्यांमध्येच शोला सुरुवात होणार असल्याची माहिती एन्डमॉल शाइन इंडियाच्या सुत्रांनी दिली आहे.

वाचा : झहीरने सागरिकाचा वैतागलेला फोटो पोस्ट केल्यानंतर युवराजने घेतली फिरकी

लोणावळ्यामध्येच मराठी बिग बॉसचे घर असणार आहे. कलर्स मराठी वाहिनीवर येत्या एक दोन महिन्यांमध्ये बिग बॉस मराठी पाहवयास मिळेल. विशेष म्हणजे, हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपले स्थान निर्माण करणारा अभिनेता रितेश देशमुख सुत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात कोणते सेलिब्रिटी स्पर्धक दिसणार हे पाहणे नक्कीच औत्सुक्याचे राहिल.