बिहार निवडणुकीच्या निकालात नेमकी सत्ता कुणाला मिळणार हे चित्र स्पष्ट होण्यासाठी विलंब लागतो आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वतोपरी काळजी घेऊन मतमोजणी केली जाते आहे त्यामुळे हा वेळ लागतो आहे. अशात राजदचे खासदार मनोज झा यांनी बिहारमध्ये आमचीच सत्ता येणार असा दावा केला आहे. एवढंच नाही तर निवडणूक निकाल प्रक्रिया लांबल्याने नितीश कुमार यांचा पराभव काहीसा लांबणीवर पडेल. मात्र इथल्या जनतेला परिवर्तन हवं आहे आणि ते परिवर्तन घडेल असंही झा यांनी म्हटलं आहे.

बिहारमध्ये महाआघाडीचीच सत्ता येईल थोडा वेळ वाट बघा असंही वक्तव्य मनोज झा यांनी काही वेळापूर्वी केलं होतं. आता पुन्हा एकदा नितीश कुमार यांचा पराभव होणारच फक्त तो काही वेळासाठी लांबणीवर पडेल इतकंच या आशयाचं ट्विट मनोज झा यांनी केलं आहे.

सकाळी काय म्हणाले होते मनोज झा?

आज सकाळीच मनोज झा यांनी महाआघाडी बिहारची निवडणूक एकतर्फी जिंकेल असा दावा केला होता. बिहारमध्ये अटीतटीची लढत होत नाही. येथील जनता एकतर्फीच निकाल देते, असे झा यांनी म्हटले होते. मात्र मतमोजणीच्या सुरुवातीच्या दोन तासांनंतर महाआघाडीकडे असणारी आघाडी कमी होत गेली. त्यामुळे नितीश कुमारच पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री होणार, या आशेने जदयूच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली होती.