बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येला आता एक महिन्यांपेक्षा अधिक वेळ होऊन गेला आहे. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत ३८ जणांची चौकशी केली आहे. मात्र सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान भाजपाचे आमदार मनोज तिवारी यांनी सुशांतच्या मृत्यूप्रकरणी एफआयआर दाखल करावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मनोज तिवारी यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक ट्विट केलं. या ट्विटद्वारे त्यांनी मुख्यमंत्र्यांचं लक्ष सुशांत प्रकरणाकडे वळवण्याचा प्रयत्न केला. “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सुशांतच्या मृत्यूला आज ४३ दिवस झाले. मात्र अद्याप पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर देखील दाखल केलेला नाही. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की सुशांत प्रकरणी एफआयआर दाखल करावी. मला खात्री आहे सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही माझ्या विनंतीचा स्विकार कराल.” अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे. त्यांचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी सुशांतच्या मृत्यूची CBI चौकशी करावी अशी विनंती गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती. यासाठी त्यांनी अनिल देशमुख यांची भेटही घेतली होती. “सुशांत सिंह राजपुत याच्या मृत्यू प्रकरणाची योग्य चौकशी व्हावी, ही संपूर्ण देश, विशेषत: तरुणांची भावना आहे. मी गृहमंत्री अनिल देशमुख यांना विनंती केली, की राष्ट्रीय भावना विचारात घेऊन सीबीआय चौकशी सुरु करावी” अशा आशयाचं ट्विट करुन पार्थ पवार यांनी या भेटीबाबत माहिती दिली होती.