|| सुहास जोशी

तंत्रज्ञान त्याच्या स्वत:च्या वेगाने मानवी जीवनात अनेक बदल करत असते, पण त्याच वेळी मानवी भावभावना त्या तंत्रज्ञानाला कशा प्रतिसाद देतात, त्यात किती गुंततात, त्यातून त्यांची सुटका होते का, त्या गुंतण्यातून नवीन काही गुंता निर्माण होतो का, अशा वेळी त्या त्या व्यक्तीत दडलेल्या प्रवृत्ती, सुप्त आकांक्षा कशा काम करतात याचं एक वेगळं चित्रण ब्लॅक मिरर या वेबसीरिजने गेल्या काही वर्षांत मांडायला सुरुवात केली. अतिशय मर्यादित म्हणजे अगदी चार ते पाच अशा स्वतंत्र भागांची सीरिज अल्पावधीतच लोकप्रिय झाली. नुकताच या सीरिजचा पाचवा सीझन केवळ तीन भागांसहित प्रदर्शित झाला. तुलनेने आधीचे सीझन पाहताना जी उत्कंठा, उत्सुकता जाणवायची ती यामध्ये दिसून येत नाही. तंत्रज्ञानातून निर्माण झालेल्या भावभावनांच्या गुंत्याला तोंड देताना अनेकदा त्यावर ठोस उपाय न मांडता कथेचा शेवट होणे हा आधीच्या सर्व सीझनचा महत्त्वाचा मुद्दा होता. मात्र पाचव्या सीझनमध्ये बहुतांश भर हा ‘शेवट गोड करी’ या धर्तीवर बेतलेला दिसतो.

नुकताच आलेला पाचवा सीझन हादेखील आधीच्या सीझनप्रमाणे अगदीच मर्यादित भागांचा सीझन आहे. सध्या त्यामध्ये केवळ तीनच भाग म्हणजे तीनच कथा आहेत. तिन्हींची जातकुळी अर्थातच निराळी आहे. तरुण वयात अगदी जिवश्च कंठश्च असे दोघे मित्र अनेक वर्षांनी भेटतात. आणि तरुणपणी एकत्र व्हिडीओ गेम खेळण्याची आठवण ठेवून त्यापैकी एक जण जुनाच पण नव्या तंत्रज्ञानावर आधारित व्हिडीओ गेम भेट देतो. तो व्हिडीओ गेम केवळ पडद्यावर खेळला न जाता थेट त्या दोघांच्या मनातच खेळला जातो. त्याच वेळी बदललेल्या भावभावनांची जाणीव प्रत्यक्ष जगण्यात दिसत नाही. परिणामी गुंता वाढत जातो. दुसऱ्या कथेत एक टॅक्सी ड्रायव्हर एका ठरावीक कंपनीतील लोकांनाच घेऊ न जाण्याचा प्रयत्न करत असतो. त्यातून एकाचे अपहरणदेखील करतो. त्या कंपनीने तयार केलेल्या समाजमाध्यम यंत्रणेविरुद्ध त्याला प्रचंड राग असतो. त्याचे रूपांतर या अपहरणात झालेले असते. तर तिसऱ्या कथेत एका प्रसिद्ध तरुण अशा गायिकेच्या नावाने कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या बाहुल्या तयार केल्या जातात. पण त्याच वेळी ती गायिका स्वत:च एका जाळ्यात अडकलेली असते. तिच्या भावभावना नियंत्रित केल्या जात असतात. कृत्रिम बुद्धिमत्ता असलेली बाहुली आणि गायिकेचा प्रवास यातील तिढा यातून दिसतो.

या कथांचे यापेक्षा अधिक वर्णन करणे म्हणजे कथेचा गाभाच सांगण्यासारखे आहे. पण हा गाभा कथानक सुरू झाल्यानंतर काही काळातच उलगडला जातो. त्यानंतरची कथा म्हणजे कथानकाचा शेवटाकडचा प्रवास इतकेच. नेमके येथेच गडबड झाली आहे. प्रेक्षकाला त्या गुंत्यात गुंतायला पुरेसा वेळ मिळत नाही. अगदी सरळपणे कथा उलगडली जाते आणि त्यानंतर तिचा प्रवास हा काहीसा पठडीबाज पद्धतीने होत राहतो. दरवेळी प्रेक्षकाला हजार प्रश्न पडायलाच हवेत असा अट्टहास नसला तरी ज्या खुबीने आधीच्या सीझनमध्ये हा विषय हाताळला जातो तसा या सीझनमध्ये तो हाताळला जात नाही हे नक्की.

अनेक ठिकाणी तर पठडीबाज पद्धतीमुळे पुढे काय होईल याची जाणीव होऊ  लागते. त्यामुळे उत्सुकतेऐवजी केवळ औपचारिकता शिल्लक राहते. विशेषत: शेवटच्या कथेत तर अगदी टिपिकल बॉलीवूड चित्रपटच दिसू लागतो. ही प्रेक्षकशरणता असावी का असे न राहवून म्हणावे लागेल.

ब्लॅक मिरर या वेबसीरिजने गेल्या काही वर्षांत अतिशय दर्जेदारपणे अनेक विषयांना हात घातला आहे. किंबहुना तंत्रज्ञानाच्या वेगवान प्रगतीतून निर्माण होऊ  शकणाऱ्या शक्यता वापरून त्यांची सांगड मानवी भावनांना हात घालून दडलेल्या प्रवृत्तींवर थेट प्रकाश टाकला आहे. महत्त्वाचे म्हणजे हे सर्व करताना त्यात आक्रस्ताळेपणा किंवा दृश्य परिणामांचा वापर करून चमत्कृतीपूर्ण गोष्टी दाखवण्याचा मोह टाळलेला आहे. हेच या संपूर्ण मालिकेचे वैशिष्टय़. त्या मुद्यांवर हा पाचवा सीझन पुरेसा उतरत नाही हे नमूद करावे लागेल.

पाचव्या सीझनमध्ये नावीन्यपूर्ण प्रयोग आहेतच, पण ते सारे ज्या पद्धतीने भिडणे अपेक्षित आहे त्या पद्धतीने भिडत नाही. अर्थात चित्रीकरण, सेट, दिग्दर्शन, अभिनय या मुद्दय़ांवर सीझन नेहमीप्रमाणे चांगलाच आहे. पण मूळ कथेत जो ट्वीस्ट असायला हवा त्याची येथे कमतरता आहे. त्यामुळे ब्लॅक मिररची मूलभूत संकल्पना या सीझनमध्ये दूरच राहते. अर्थात तरीदेखील इतर वेबसीरिजच्या मानाने ती उजवीच ठरते हे नक्की.

  • ब्लॅक मिरर
  • सीझन – पाचवा
  • ऑनलाइन अ‍ॅप – नेटफ्लिक्स