News Flash

BLOG : थ्री-डी स्वरुपातील ‘पद्मावती’च्या निमित्ताने…

चित्रपट हे सतत नवीन तंत्रज्ञानाचा शोध घेणारे माध्यम आहे.

दीपिका पदुकोण, पद्मावती

चित्रपटाची गोष्ट (अर्थात थीम) त्याच्या तंत्रापेक्षाही मोठी आणि महत्त्वाची आहे, हे कायमस्वरुपी सत्य आहे. काही वेळेस तात्कालिक रसिकांनी नवीन तंत्राला पूर्णपणे नाकारून गोष्टीचे महत्त्व विषद केले. आपल्याकडचा पहिला सिनेमास्कोप चित्रपट ‘कागज के फूल’ (१९६४ – गुरुदत्त दिग्दर्शित अविस्मरणीय कलाकृती) व पहिला सत्तर एम एमचा चित्रपट ‘अराऊंड द वर्ल्ड’ दुनिया की सैर (१९६९ – पांछी दिग्दर्शित जगभरचे दर्शन घडवणारा चित्रपट) याना मोठ्याच अपयशाला सामोरे जावे लागले. आपले प्रेक्षक चौकटीबाहेर पडायला पटकन तयार होत नाहीत. कारण त्याना तंत्र नव्हे तर गोष्टीत व त्याहीपेक्षा मांडणीत रस असतो. एखा दृश्यासाठी कोणता कॅमेरा वापरला, किती कॅमेरे वापरले, कसे वापरले याकडे ते लक्ष देत नाहीत. ते दृष्य पडद्यावर कसे रंगलय याला महत्व असते. म्हणूनच तर तंत्राचा अति वापर करण्यात आलेले ‘रानी और लालपरी’, ‘रझिया सुल्तान’ असे महाखर्चिक चित्रपट रसिकांनी नाकारले.

हा झाला छोटासा फ्लॅशबॅक…

‘बाहुबली’ चे दोन्ही भाग येईपर्यंत रसिकांची पिढी बदलली. ही ‘फास्ट फूड’ पिढी मोबाईल व सोशल नेटवर्किंग साइटवर कधी लहानाची मोठी होते लक्षातही येत नाही. आता मल्टिप्लेक्सचे युग आहेच. केवढा तरी मोठा पडदा व उत्तम प्रोजेक्शन हे सर्वात मोठे आकर्षण. पूर्वी वातानुकूलित व्यवस्था असणारी एकपडदा चित्रपटगृहे मोजकीच होती. अनेक चित्रपटगृहात पडदाही पस्तीस, काही ठिकाणी तर सोळा एम एम पडदा असे. त्यावरची दृश्ये अस्पष्ट दिसत, साऊंड सिस्टीमही दोषपूर्ण असे. ग्रामीण भागात तर काही चित्रपटगृहात पावसाळ्यात गळे. तात्पर्य तेव्हा नवीन तंत्राचा चित्रपट रुजायला पूरक स्थिती नव्हती. म्हणूनच तर आपल्याकडचा पहिला त्रिमिती अर्थात 3 Dimension चित्रपट ‘छोटा चेतन’ ( 1985) खणखणीत यशस्वी ठरुनही त्यानंतर ‘शिवा का इन्साफ’, (फॅन्टसी) ‘सामरी’ ( भूतपट), ‘महाशक्तीमान’ (तलवारबाजी) असे काही मोजकेच 3D चित्रपट आले. ‘छोटा चेतन’ मूळात तमिळ भाषेतील चित्रपट. तो हिंदीत डब झाला. म्हणजेच 3D कडे वळण्याचे श्रेय हिंदी चित्रपटसृष्टीला जात नाही. दशकभरानंतर याच ‘छोटा चेतन’मध्ये उर्मिला मातोंडकरचे नृत्य समाविष्ट करून तो रिपिट रनला आणला . एव्हाना रसिकांची नवीन पिढी आल्याने यालाही यश लाभले. पण जे खणखणीत यशस्वी त्याचाच फॉर्मुल्या ‘फॉलो’ करणार्‍या हिंदी चित्रपटसृष्टीने 3D च्या वाटेस जाणे टाळले. याचे एक महत्त्वपूर्ण कारण म्हणजे अशा चित्रपटासाठी याच तंत्राला साजेशी गोष्ट व पटकथा हवी. कॅमेरामनला या तंत्राचे ज्ञान शिकून घ्यायला हवे. मग चित्रपटगृहात चष्मा सुविधा कटकटीची असते. त्यासाठी वेगळा स्टाफ हवा.

पण काळ व तंत्र इतके व असे बदलले की प्रदर्शनाची तारीख देखील निश्चित झालेल्या ‘पद्मावती’ ला नियमित रूपासह (ते प्रामुख्याने सिंगल स्क्रीन थियेटर) 3D करण्याचा व्यावसायिक निर्णय होऊन त्याचा 3D स्वरूपातील पहिला ट्रेलरही आला.

‘पद्मावती’ 3Dत येईपर्यंतचा या तंत्र व प्रेक्षकांचा बदलता प्रवास नेमका कसा आहे?

चित्रपट हे सतत नवीन तंत्रज्ञानाचा शोध घेणारे माध्यम आहे. 3D च्या बाबतीत दोन उल्लेखनीय गोष्टी घडल्या. आता तयार चित्रपटावर तांत्रिक सोपस्कार करून तो 3D करता येतो. अर्थात ते खूप खर्चिक आहेच. ‘मगर फिल्म दिलसे बनती है, पैसे से नही|’ हा या व्यवसायाचा स्वभावच आहे. त्यातून ‘शोले’ (1975) हा सर्वकालीन बहुचर्चित चित्रपट तब्बल अडतीस वर्षानी 3D करण्यात आला. तो या स्वरूपात किती प्रभावी व धारदार अनुभव देतोय हे जाणून घेण्यासाठी आवर्जून पाहिला. पण 3D तंत्रज्ञानात तो थोडासा कोंडल्यासारखा वाटला. आणि त्याला यावेळेस गल्ला पेटीवर फारसे यशही मिळाले नाही. पण आता 3D दूरदर्शन संचही जगभरात पसरत असल्याने अशा जुन्या चित्रपटाचे 3D रुप तेथे उपयोगी पडेल. म्हणजेच 3D टीव्ही ही नवीन वितरण व्यवस्था निर्माण झालीय. शाहरुख खानच्या ‘देवदास’वरही 3D संस्कार झालेत. ‘बाहुबली’चे दोन्ही भागही 3D साठी प्रचंड पूरक आहेत. तसे त्यावर संस्कार होतीलच अशी अपेक्षा आहे. दरम्यान काही विदेशी 3D चित्रपट आपल्याकडे प्रदर्शित होऊ लागले. काही अॅनिमेशन चित्रपट 3D त आलेत. नवीन पिढीला 3D चित्रपटाची सवय व आवड निर्माण होण्याजोगे वातावरण वाढले. चित्रपटाचे नवीन तंत्रज्ञान रुजण्यासाठी असे सकारात्मक वातावरण निर्माण होणे गरजेचे असतेच. तेच मग व्यावसायिक धाडस करण्यास प्रेरणा देतात. आजच्या चित्रपट रसिकांची तंत्रज्ञानाबद्दल ओरडही नाही. ते झगमगाटी भव्य दिव्य काही पाहू इच्छितात हे ‘बाजीराव मस्तानी’च्या तडाखेबाज यशाने सिध्द झाल्याचे उदाहरण आजही ताजेच आहे. असेच अति भव्य सेट, सौंदर्यालंकार, बहारदार नृत्याविष्कार व हे सगळेच 3D त पाह्यचेय हीच ‘पद्मावती’ची मोठीच खासियत ठरणार आहे. ‘पद्मावती’च्या 3D प्रदर्शनास अत्यंत पूरक असेच सामाजिक-सांस्कृतिक-आर्थिक वातावरण निर्माण झालयं ही खूपच महत्वपूर्ण वस्तुस्थिती आहे. बदलत्या काळानुसार झालेला हा मोठाच बदल आहे. चित्रपटाचा तांत्रिक प्रवास हा तसा दुर्लक्षित राहिलेला विषय आहे. अवघ्या वीस मिनिटाचा ‘राजा हरिश्चंद्र’ (1913) हा पहिला चित्रपट ते ‘पद्मावती’ या प्रवासात तंत्र व प्रेक्षकांची आवडनिवड या दोन्हीतील बदल मोठाच पल्ला आहे. आजचा प्रेक्षक थीमसह तंत्राचाही आनंद, अनुभव, आस्वाद घेऊ इच्छितोय हेच ‘पद्मावती’ 3D च्या आगमनाच्या निमित्त जाणवतेय…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2017 2:47 pm

Web Title: blog padmavati in 3d
Next Stories
1 ‘पद्मावती’च्या ‘क्लायमॅक्स’मधील दृश्य पाहिले का?
2 ‘या’ क्रिकेटरला भेटायला दुबईला गेली होती अर्शी खान, गहना वशिष्ठचा धक्कादायक खुलासा
3 ‘बिग बॉस ११’मध्ये लवकरच कपिल शर्माची एण्ट्री
Just Now!
X